(१) दंडकारण्य आर्यागमना पूर्वी निव्वळ किर्र रान होतें. त्यांत कोणत्या च माणसांची वसती बिलकुल नव्हती.
(२) माणसांची जर वसती असेल तर ती (१) पशुतुल्य पूर्ण रानटी, किंवा (२) अर्धवट रानटी, किंवा (३) किंचित सुधारलेल्या माणसांची असेल. पशुतुल्यांना गांवें व अर्थात् ग्रामनामें नसतात. अर्धवट रानट्यांना गांवें असलीं तर ग्रामनामें असतील. आणि किंचित सुधारलेल्या माणसांची वसती असेल, तर ग्रामनामें त्यांच्या भाषेतील असू शकतील. आर्य वसाहती करण्यास दक्षिणारण्यांत जेव्हां शिरले तेव्हां तेथील पूर्वीच्या माणसांकडून नद्या, पर्वत, ओढे, गांवें, प्रांत, प्रदेश, इत्यादींची त्या माणसांच्या भाषेतील नांवें आर्यांच्या काना वर पडून तीं च नांवें आर्य कमजास्त प्रचलित करतील. (४) चांगले बरे च सुधारलेले लोक जर आर्यपूर्व असतील, तर ग्रामनामें त्या लोकांच्या भाषेतील च शंभरांपैकी ९९ १/२ हिश्शांनी रहातील. एखाद दुसरे नांव संस्कृत येईल. (६) जगांतील वसाहतकर्माच्या अर्वाचीन सार्वत्रिक अनुभवानें सिद्ध झालेल्या ह्या गृहीतगोष्टी घेऊन, महाराष्ट्रांतील ग्रामांच्या नांवांचा अभ्यास कर्तव्य आहे. मराठी भाषा आज बाराशें वर्षे ज्या प्रदेशांत प्रामुख्यानें प्रचलित आहे, त्या प्रदेशाला, सध्यांच्या शोधा पुरता, मी महाराष्ट्रदेश ह्मणतों. ह्या शोधाचा समग्र अभ्यास म्हणजे महाराष्ट्रांतील यच्चयावत सर्व गांवांच्या नांवांचा अभ्यास. पैकीं प्रथम एका तालुक्याच्या एका तर्फेतील सर्व ग्रामांच्या नांवांचा अभ्यास देतों. रीति अशी. सध्यांचीं ग्रामनामें बहुतेक एकोनएक मराठींत संस्कृतांतून महाराष्ट्रीद्वारा अपभ्रष्ट आहेत, असा समज. तो खरा कीं खोटा, हें पहाण्या करितां मराठी अपभ्रंशाचें मूळ संस्कृत रूप देण्याचा प्रयत्न करावयाचा. प्रयत्नांत एक बाब दृष्टी पुढे ठेवावयाची, ती ही कीं, संस्करणांत ज्या अवयवाचा संस्कृतवैदिक भाषेत कांहीं च अर्थ निष्पन्न होणार नाहीं, तो अवयव ज्या ग्रामनामांत असेल तें ग्रामनाम तात्पुरतें अनार्य समजावचाचें. पुढें कोणास तो अवयव संस्कृत आहे असें सिद्ध करतां आल्यास, तें ग्रामनान अनार्यकोटींतून वाढून आर्यकोटींत घालावयाचें. निरुक्ति सहज साधिली पाहिजे, ओढाताण करावयाची नाही. ग्रामनामांची निरुक्ति करतांना कांहीं अडाखे आढळले ते निरुक्तकारांच्या उपयोगार्थ खालीं देतों. ग्रामनामांच्या अंत्यावयवां वरून हे अडाखे बसविलेले आहेत.
ग्रामनामा- कोणत्या संस्कृत- म्रामनामा कोणात्या संस्कृतन्त्यक्षरें शब्दाचा अपभ्रंश न्त्यक्षरें शब्दाचा अपभ्रंश
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
ह्यांतील बहुतेक सर्व शब्द पाणिनीय आहेत. पल्ल हा शब्द पद्र ह्या पाणिनीय शब्दाचा अपभ्रंश आहे. वेर हा शब्द पाणिनीच्या नंतरचा आहे. पुर:, पद्रा, वहा वगैरे लिंगें पाणिनिपश्चात्क आहेत. धि, धं, हे प्रत्यय समुदाय, धारणा, इत्यादींचे वाचक आहेत.
यापुढे पुणें जिल्ह्यांतील मावळ तालुक्यापैकीं नाणें तर्फांतील १६८ गांवांच्या नांवाची व्युत्पति राजवाड्यांनीं दिली आहे. तीं गांवें व त्यांची व्युत्पति कोशांत घेतलेली आहे.