महाराष्ट्राच्या वसाहतकालीन इतिहासाचा शोध
१ सध्यां महाराष्ट्रांत जी लोकवसती आढळते तीपैकीं कांहीं लोकांची वसती अगदीं अर्वाचीन म्हणजे दोन तीन शें वर्षा अलीकडील आहे. उदाहरणार्थ, इंग्रजांची वसती. शक १५२२ पासून आज शक १८३८ पर्यंत महाराष्ट्रांत इंग्रजांना येऊन व वसती करूं लागून सुमारें ३१६ वर्ष झालीं. अस्सल अरबादि मुसुलमानांची ह्मणण्या सारखी वसती शक १२०० च्या आगेंमागें झालेली आहे. पारश्यांची वसती महाराष्ट्राच्या उत्तरेस संजानास शक ६०० नंतर झाली. एणें प्रमाणें अस्सल इंग्रज, अस्सल मुसुलमान व अस्सल पारशी, यांची कायमची वसती महाराष्ट्रांत केव्हां झाली, तें आपणास नकी माहीत आहे. यहुद्यांची वसती हि महाराष्ट्रांत अथवा कोंकणांत सांगण्यासारखी प्राचीन नाहीं. तेव्हां तिज विषयीं फारसें गूढ़ उकलावयाचें आहे, असें नाही. हे चार लोक काढून टाकले म्हणजे मग फक्त दोन प्रकारचे लोक शोध्य रहातात. एक ब्राह्मणादि आर्य लोक व दुसरे भिल्ल, गोंड, कातकरी, नाग, केळी इत्यादि अनार्य लोक. पैकीं भिल, गोंड वगैरे अनार्य लोक आपणा आर्यांच्या येण्यापूर्वी एथें वसती करून होते, अशी समजूत आहे. ती कितपत साधार आहे तें पाहिलें पाहिजे. एतत्प्रकरणीं शोधाचे एकंदर तीन पक्ष होतात. प्रथम पक्ष, अनार्य आर्यांच्या आधीं दंडकारण्यांत रहात होते, हा. द्वितीय पक्ष, अनार्य आर्यांच्या नंतर दंडकारण्यांत आले, हा. आणि तृतीय पक्ष आर्य व अनार्य असे दोघे हि समकालीं दंडकारण्यांत वसत्यर्थ शिरले, हा. पैकीं, अमुक पक्ष साधार व विश्वसनीय असा पूर्वग्रह करून न घेतां, आपणास शोध केला पाहिजे. आर्य अनार्याच्या पाठीमागून दंडकारण्यांत वसती करूं लागले असले, तरी वाहवा, व नसले तरी वाहवा. त्यांत कोणाचें कांहीं च बिघडत नाही आणि शोधकर्मात कोणाच्या पूर्वग्रहांत कांही बिघडलें, तरी त्याची पर्वा करावयाचें कारण नाही. प्रमाणान्तीं, जें विश्वास्य व साधार दिसेल, तें च तेवढे मान्य करणें जरूर आहे.
(२) दंडकारण्यांत आर्य अगोदर आले किंवा अनार्य अगोदर आले, ह्या बाबीचा शोध ( १ ) वैदिक सारस्वत व (२) अनार्याच्या भाषा व कहाण्या, यांतील उल्लेखां वरून किंवा ज्ञापकों वरून किंवा गमकां वरून करतां येण्याचा फार च अल्प संभव आहे. कारण, पाणिनीच्या काला पर्यंत विंध्यपर्वताच्या दक्षिणे कडील प्रदेशाची यत्किंचितहि माहिती आपणा आर्यास नव्हती. तेव्हां वैदिक सारस्वतांत विंध्याच्या दक्षिणेस रहाणाच्या (कोणी रहात होते कीं काय हा च मुळीं संशय आहे) अनार्य लोकांचे उल्लेख किंवा ज्ञापकें सांपडणें शक्य व संभाव्य नाहीं. वैदिक सारस्वतांत, दस्यु, असुर, रक्षस्, इत्यादि जीं लोकनामें येतात, तीं विंध्याच्या दक्षिणे कडील लोकांची नाहीत. अर्थात, वैदिक सारस्वताचा या शोधांत कांहीं एक उपयोग नाहीं. भिल्ल, कोळी, कांतकरी, वगैरेंच्या भाषा व कहाण्या सर्व तोंडी आहेत व त्या संस्कृत किंवा वैदिक भाषे हून किंवा कहाण्यां हून जुन्या आहत, असें विधान करण्याला कांहीं च आधार नाही. भिल्लादींना शंभर वर्षा पलीकडील काळ व पांच हजार वर्षा पलीकडील काळ, असे दोन्ही काळ सारखे च पुरातन वाटतात. अर्थात, भिल्लादींच्या भाषांचें व कहाण्यांचें हि ह्या शोधास कांहीं साहाय्य होईल, असा रंग दिसत नाही.- ऐतरेय ब्राह्मणांत मूतिवादि जे लोक सांगितले आहेत त्या लोकांचीं नांवें अपभ्रंश होऊन प्राकृत भाषांत सध्यां, खरें पाहिलें तर, सांपडावीं. परंतु, तीं हि सांपडत नाहीत किंवा सांपडलेलीं नाहींत. भिल्ल, खोंड, गोंड, कातकरी, ठाकूर, कोळी, हे लोक ऐतरेय ब्राह्मणांतील मूतिबादि लोकां हून नांवां वरून तरी अगदीं भिन्न असलेले दिसतात व वैदिक काला नंतर व पाणिनिकाला नंतर त्यां पैकीं कांहीं आर्यांना माहीत झालेले आढळतात.