मढरी (पुत्र) [माठर (गोत्रनाम) माठरी (स्त्री) = माढरी = मढरी. वाशिष्टीपुत्र, गौतमीपुत्र, मढरीपुत्र, हीं नांवें शातवाहनांच्या वंशांत येतात. माठरक हें विदूषकादींचें नांव संस्कृत नाटकांत येतें. माठरोस्मि गोत्रेण ( पतंजलि, महाभाष्य, Vol. I, P. ४५२ Kielhorn ) (भा. इ. १८३३)
मध्व - मध्वाचार्य हा समास मधु + आचार्य किंवा मध्व + आचार्य असा दोन प्रकारांनीं सोडवितां येतो. म्हणजे द्वैतसंस्थापकाचें नांव मधु व मध्व असें दोन प्रकारचें असावें, असा निष्पाद होतो. मधु या शब्दाचा अर्थ गोड (विशेषण) व मध (नाम) असा आहे. (मध्व) मध्वक या शब्दाचा अर्थ भुंगा असा आहे. मधु हें संस्कृतांत देवदैत्य व मानव यांचें नांव आढळतें. मध्व हें नांव संस्कृतांत मनुष्याचें मध्वाचार्य ह्या समासाखेरीज इतरत्र कोठें आलेलें मला माहीत नाहीं. तेव्हां, प्रश्न असा उद्भवतो कीं, ह्या द्वैताचार्याचें मूळ नांव मध्व कां मधु ? दोन्ही नांवें एकाच व्यक्तीचीं असू शकणार नाहींत. एक मधु तरी मूळ नांव असेल किंवा मध्व तरी असेल. मधु हें जर मूळ नांव असतें, तर त्यापासून तद्धित शब्द माधव असा होता. पण माधवमत असें कोणी म्हणत नाही. मध्वमत असा बोलण्याचा व लिहिण्याचा प्रचार आहे. सबब, द्वैताचार्याचें मूळ नांव मध्व होतें, हा पक्ष खरा मानावा लागतो. मध्वक म्हणजे षट्पद, भुंगा, मध गोळा करणारा. परंतु मध्वक म्हणजे कांहीं मध्व नव्हे. मधु + अक = मध्वक, असा जर विग्रह असेल, तर मध्वक हा मूळ शब्द होईल, मध्व होणार नाहीं. मध्व हा शब्द अपभ्रंश म्हणावा लागेल. मध्व असा स्वतंत्र शब्द संस्कृतांत मध्वाचार्याच्या पूर्वी नाहीं. तेव्हां एकच तोड रहाते. मध्व हा मध्वक शब्दांचा अपभ्रंश आहे. तात्पर्यं, मध्व हा एका प्रकारचा प्राकृत शब्द आहे, असें म्हणावं लागतें. मध्वाचार्य फार विख्यात पुरुष झाला, त्यामुळें मध्व हा प्राकृत शब्द स्वतंत्र संस्कृत विशेषनाम म्हणून योजिला जाऊं लागला इतकेंच. ( भा. इ. १८३५ )
मनसाराम १ [ मनसा हें सापाच्या विषापासून संरक्षण कणार्या देवीचें नांव.
दुर्गाराम, सीताराम, तसा मनसाराम.
मनसाराम हें मराठी विशेषनाम आहे. ] (भा. इ.१८३६)
-२ [ मनस्रः संज्ञायां ( ६-३-४) ह्या सूत्राप्रमाणें मनसा + राम = मनसाराम हा तृतीया अलुक् समास आहे] कांहीं वर्षापूर्वी भाऊ मनसाराम हें नांव पुण्यात बरेंच ऐकूं देत असे. ( भा. इ. १८३६)
-३ [ मनीषारामः ( मनीषा + आरामः) = मनसाराम ]
म. धा. २९