दत्त्या [(देव) दत्तक (दुर्दैवी दत्त) = दत्तअ = दत्ता, दत्त्या (एकशेष). रामक = राम्या इ. ] (भा. इ. १८३४)
दामा [ ददातीति दामा = दामा ] दामा शेटी =दामा श्रेष्ठिन्.
दारकी - हें नांव शद्रांत आढळतें. पण्यस्त्री दारिका दासी । द्वारका शब्द निराळा. (भा. इ. १८३३)
दासींचीं नांवें -हर्षचरिताच्या अष्टमोच्छ्वासांत बाणानें दासींचीं नावें (पृष्ठें २४६, २४७) दिलीं आहेत. त्यांवरून मराठींत खालील नांवें आलीं आहेत.
०१ कलहंस = हंशे (एकशेष ) ०२. सुंदरि = सुंदरे
०३ मंगलिके = मंगळे ०४ शबरिके = सबरे, सवरे, शबरे
०५ मातंगिके = मंगे ०६ वत्सिके = वच्छे
०७ नागरिके = नागरे ०८ विराजिके = बिर्जे
०९. भुंगारधारिण = भुंगे १० केतकि = कैके
११ मेनके = मेनके १२ विजये = विजे
१३ नर्मदे = नर्मदे, नबु १४ सुभद्रे = सुभद्रे
१५ वसंतिके = बसन्त्ये १६ मुक्तिके = मुक्त्ये
१७ मंजुलिके = मंजुळे १८ कालिंदि = काळिंदे
१९ कमलिनि = कमळे २० रोहिणि = रुई
२१ अंब = अंबे २२ अंबिके = अंबिके
२३ सीमंतिनि = शेवंते
हीं सर्व नांवें शूद्रांत महाराष्ट्रांत सध्यां हरहमेष आढळतात. ( भा. इ. १८३५)
देवण [ दैवज्ञ = देवण्ण = देवण ] देवणभट असें विशेषनाम कोकणांत अद्याप हि क्वचित् आढळतें
देवानंपिय- १ देवानांपिय व पियदसि हे दोन प्राकृत शब्द अशोकाच्या शिलाशासनांत येतात. पैकीं, देवानंपिय ह्या पांच अक्षरांसंबंधानें विवेचन करतों. हीं पांच अक्षरें जुळून लिहिलीं तर ह्या पांच अक्षरांचा एक सामासिक शब्द होतो. ह्या पांचा अक्षरांतून पहिलीं तीन अक्षरें जुळून निराळीं लिहिलीं, म्हणजे देवानं व पिय असे दोन व्यस्त शब्द होतात. आतां अशोकाच्या शिलाशासनांत पांच हि अक्षरें मिळून एक च सामासिक शब्द मूल लेखकानें मानिलेला होता किंवा देवानं व पिय असे दोन शब्द मानिले होत, तें शिलालेखांवरून स्पष्ट होत नाहीं. शिलालेखांत प्रायः एकापुढें एक सारखीं अक्षरें लिहिलीं असल्यामुळे; समास आहे कीं व्यास आहे हैं प्रथमदर्शनीं सांगणें अवघड जातें. तेव्हां, आपल्याला एकच तोड राहते. समास मानून अर्थ काय होतो व संदर्भाला कितपत जुळतो हें पहावयाचें; किंवा व्यास मानून अर्थ काय होतो व संदर्भाला कितपत जुळतो हें पहावयाचें. पैकीं समास मानून अर्थ काय होतो तें प्रथम पाहूं. देवानंपिय ह्या प्राकृत सामासिक शब्दाचें संस्कृतरूप देवानांप्रिय देवानांप्रिय या संस्कृत सामासिक शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक मूर्ख हा अर्थ व दुसरा देवप्रिय हा अर्थ. दिव् धातूचे दोन अर्थ होतात.