गुणाढ्य विक्रमादित्याचा उल्लेख करितो. सप्तशतीचा कर्ता व गुणाढ्याचा आश्रय जो हालसातवाहन तो हि विक्रमादित्याचा उल्लेख करितो. गुणाढ्य उज्जयिनीच्या पालक राजाचा हि उल्लेख करितो. हा पालक विद्याधरचक्रवर्ति जो नरवाहनदत्त त्याचा समकालीन होता, असें गुणाढ्य म्हणतो. पालकांच्या वंशांत शूद्रक झाला असल्यास तो विक्रमादित्याच्या पूर्वी झाला असला पाहिजे. प्रायः शुद्रक विक्रमादित्याच्यापूर्वी व नरवाहनदत्ताच्या नंतर झाला असावा. म्हणजे मृच्छकटिक शकपूर्व २०० च्या पूर्वी व पांचशेंच्यानंतर रचिलें गेलें असावें. ही सर्व विधानें गुणाढ्य प्रमाण धरल्यास विश्वसनीय समजावयाचीं आहेत. (भा. इ. १८३२)
तानी, तान्ही [ तन्वी = तानी, तान्हीं ] तानीबाई, तान्हीबाई हें मराठीत स्त्रीव्यक्तिनाम झालें आहे.
तुकाराम - तुकाराम हा शब्द तुकणें = तोलणें ह्या धातूंतील तुका व राम ह्या दोन पदांचा बनला असावा असा कित्येकांचा समज आहे; परंतु ह्या शब्दाचीं तुका आणि राम अशीं पदें पाडणें रास्त नाहीं. कारण, तुका ह्या पदाचा कांहीं अर्थ देतां येत नाही. मूळ शब्द तोषाराम (तोषा + आराम) त्याचें प्राकृत तोखाराम; त्याचा अपभ्रंश तोकाराम; त्याचें तुकाराम. आत्मन् + आराम = आत्माराम. शांत + आराम शांताराम. कृपा + आराम = कृपाराम. दया + आराम = दयाराम. परंतु सीता + राम = सीताराम. कृष्ण + राम = कृष्णराम. नारो + ( त्याचा बाप) राम = नारोराम, पण नंदाराम = नंद + आराम.
(सरस्वतीमंदिर, आश्विन शके १८२६ )
दड्डु - हें नांव गुर्जर राजांच्या वंशावळींत शक ४०० पासून सुमारें शक ७०० पर्यंत येतें. हा शब्द प्राकृत आहे. ह्याचें मूळ संस्कृत दध्र. हा दध्र शब्द बाणानें योजिला आहे :-
" मातृशयनीयतूलिकतलनिपष्ण च तनयोन्यं तनयं अभिषेक्तुकामस्य दध्रस्य करूषाधिषते: अभवन् मृत्यवे । ”
वाणः - हर्षचरितं-षष्टः उच्छ्वासः. दध्र = दड्ड.
दड्ड = दध्र हें व्यक्तिनाम त्या कालीं इतर वंशांत हि प्रचलित होतें, असें हर्षचरितावरून दिसतें. (भ. इ. १८३५)