कृष्णियः = कान्ह्या
कृष्णिलः = कान्हुला
राम = रामडा, रामा, राम्या, रामुला
विष्णु = विनुटला, विष्ण्या ]
इ. इ. इ.
कान्होजी [ कृष्णादित्य = कन्हू (कन्ह चें ममतादर्शक)+ जी = कान्होजी ] (आदित्य पहा)
कान्ह्या [ कान्हुला पहा ]
काळिंदे [कालिंदि] ( दासींचीं नांवें पहा)
काळूबाई [ काल ( विशेषनाम ) = काळूबाई. व्द्याश्रयकाव्य-४-५१ ]
कुशा [ कौशिकः = केसिआ = कुशा ( पुरुषनाम ) ]
कुशी [ केशिकी = केसिइ = कोशी = कुशी ( स्त्रीनाम)]
केरू [केयूरक = केरू (Proper name) ]
कैके [ केतकि ] ( दासींचीं नांवें पहा)
कोंडू- हा शब्द कानडी कोंड म्हणजे घेणारा या शब्दापासून निघाला आहे. ताम्रपटांतून वातापिकोंड, मदिरैकोंड, म्हणजे बदामी शहर घेणारा, मदिरै घेणारा, असे समास येतात.
कोंड = कोंडू (ममतादर्शक). (ग्रंथमाला)
कोंडूबाई [ कुण्डा (विशेषनाम ) = कोंडूबाई व्द्याश्रयमहाकाव्य-४-५१ ]
खंडोबा - हेमचंद्र हरस्कंदै या संस्कृत द्विवचनाचें हरखंडा असें प्राकृत रूप देतो. खंडा हें अनेकवचन आहे; कां कीं प्राकृतांत प्रायः द्विवचन नाहीं. तात्पर्यं स्कंद या संस्कृत शब्दाचें प्राकृत रुप खंड असें होतें. त्याचें ममतादर्शक मराठी रूप खंडू व प्राशस्त्यदर्शक मराठी रूप खंडोबा. म्हणजे महाराष्ट्रांत जेजुरी, पाली वगैरे ठिकाणचे जे खंडोबा आहेत ते मूळचे स्कंद होत. स्कंद म्हणजे कार्तिकस्वामी. कार्तिकस्वामीचें देऊळ पुण्याच्या पर्वतीस आहे, तें स्कंदाचें म्हणजे खंडोबाचें च होय. इतकें च कीं, पर्वतीवरच्या त्या देवाचें नांव संस्कृत आहे व जेजुरीच्या देवाचें नांव प्राकृत आहे. स्कंद ही देवता वीरांची व योद्ध्यांची फार पूर्वीपासून आहे. स्कंदाला सेनानी हें अपरनाम आहे. त्याची उपासना वीर करितात. महाराष्ट्रांतील सर्व जातींचे मराठे (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, रामोशी वगैरे) खंडोबा हें आपलें कुलदैवत कां समजतात तें वरील उद्घाटनावरून समजणार आहे. खडोवा हें शिवदैवत आहे, असें कित्येक लोक समजतात, तें अर्थात् निराधार आहे. स्कंदपुराणांत स्कंदोपासकांची म्हणजे खंडोबाच्या उपासकांची माहिती सांपडते. (भा. इ.१८३२ )