वीसदेओ - मानभावांच्या (लीलाचरित्र या नांवाच्या) ज्या ग्रंथाचा परिचय गेल्या सभेस सभासदांस झाला त्या ग्रंथांतील दहा पांच चरित्रांत वीसदेओ हा शब्द एकाहून जास्त वेळां आला आहे. असें एक चरित्र संकेत लिपींतून एथें उतरून घेतों :-
रात्रीं वीहीरणीं ओंवीया आरोगणें ॥
= करमणूक = खाणें
चक्रधरा रात्रीचाः पूजाअवसरुः (= वेळ) जालाः गंगे पैलाडी सेत तेथः आले: धनूवाटी ( = क्षेत्रनाम.) येकी चंद्रमा होता असे: ओंबीयां देखीलीयां: भटीः म्हटलें: ओंबीया घेओजी: चक्रधरः उगे ची: मागोतें: म्हटलें: जी जि ओबीयां जालीया असती तरि घेओं: उत्तर केलें जालीया नसती कीं गाः जीः जिः जालीया असतिः तरि घेयाः मग: भटोबास घेओं लागले: म्हटलें: चीरूनी घेयाः मगः भट चिरुनीं जालीया जालीया घेतिः चक्रधरः पूढारें मळेया वरी: आलें: श्रीकरीं गोफणं घेतली: थै भोरडीयें: थै भोरडीयेः म्हणोनिः सोंकरिलें:(=ओरडणें:) तवं चंद्रमा मालवलाः आणि चक्रधरः आलेः तवं वारा सूटलाः तें थोर वावधान (= वावटळ आलें: ) तेव्हळिः चक्रधरः मेरूचां ( = डोंगर ) कोहकिं: = (गुहा) आसन जालें: लुखदेओ बा येः चक्रधराः आड पसवडी (=पासोडी) धरीली: तवं भटोबा बोबाउं लागले: लुखदेया: लुखदेयाः लुखदेयाः सबदु दीघलां: नागदेया येः चक्रधर येथ असतिः भटोबास आले: तवं वावधान नावेक समलें: मगः म्हटलें: कां गां ओंबीयां बाजा नां कां: जी जि: वीसदओ नाहिं: म्हटलें: गुफे हुनी घेउनी या: हा घेया पैल दीवाः दीसतु असेः मगः भट गेलेः वीसदेओ घेउनी आले: तव भटां सरीसीं आउसें ( = विशेषनाम आलीः ) तवः चतुर्धराः मर्गज- (विशेषनाम) सी आसन जालें: तवं भट ओबीयां भाजुनी घेउनी आले: मगः चक्रधर: गुफे सी: आले: मग: जी: ओंबीयां चोखटा केलीयां: कोवळीया नीवडीलीया: आतु साखर घालौनी ओळगावीलीयाः (= घोळल्या) यरी (= इतरांस) वाटे वाटौनि दीधलीयाः चक्रधरः प्रसादु केलाः मगः आवघेयां भगतजनां देववीलीयीः चक्रधरें: आरोगीलीयाः गुळळ (= गरळ) जाला: वीडा ओळगवीलां: (= दिला) मगः पहुडु (= निद्रा) स्वीकरींलः ॥ ११ ॥
वरील चरित्रांत वीसदेओ हा शब्द दोनदां आला आहे. ओंब्या भाजण्याकरितां वीसदेवो पाहिजे होता. या शब्दाचा अर्थ वाचकांच्या ध्यानांत सहज आल्यावांचून राहणार नाहीं. वीसदेओ म्हणजे ज्याला सध्यां आपण वर्तमान मराठींत विस्तव म्हणतो, तो मूळ संस्कृत शब्द वैश्वदेव. भोजनापूर्वी विश्वे देवांकरितां ज्या अग्नींत आहूती टाकतात, त्याला वैश्वदेव म्हणतात. वैधदेव पेटला, वैश्वदेवांत आहूती टाकल्या, इत्यादि लौकिक उक्तींत वैश्वदेव म्हणजे अग्नि असा लौकिक अर्थ अद्याप हि प्रतीतीस येतो. ह्या वैश्वदेव शब्दाचे अपभ्रंश येणेंप्रमाणें होत आले-
वैश्वदेवः वीसदेओ
= वीसदो
= वीस्तो = विस्तू
= विस्तव
पैकीं विस्तो, विस्तू हा अपभ्रंश कांहीं लोक योजतात. कांहीं लोक विस्तव असा उच्चार करतात. वस्तुतः अशिष्टांचा विस्तू, विस्तो हा उच्चार मूळाच्या अधिक जवळ आहे. हें सांगणें नलगे. कित्येक वर्षी पूर्वी विष्णू या शब्दापासून विष्टु, विस्तु, अशा परंपरेनें विस्तव ही शब्द मीं व्युत्पादिला होता. परंतु त्याला ऐतिहासिक आधार कांहीं एक नव्हता. प्रस्तुतच्या व्युत्पत्तीला ज्या अर्थी ऐतिहासिक आधार सांपडला आहे त्या अर्थी वैश्वदेवः = वीसदेओ = विस्तो = विस्तव ही परंपरा मान्य करणें अपरिहार्य व सयुक्तिक आहे. (भा. इ. १८३७)