२. सीयडोणी शिलालेख संवत् ९६० पासून १०२५ पर्यंत खोदला जात होता व वैल्लभ भट्टस्वामीचा शिलालेख संवत् ९३३ तला आहे. म्हणजे वार हा शब्द शक ८७६ त प्रचलित होता.
३. वार ह्या शब्दाचा अर्थ ह्या दोन शिलालेखांत ( १ ) जमात व (२) पेठ या दोन अर्थी योजलेला आहे. वार या शब्दाचा अर्थ जमाव, जमात असा अमरकोशांत दिला आहे. शिवाय वार म्हणजे दरवाजा, असाही एक अर्थ आहे. प्राचीन काळीं महाराष्ट्रांत व सध्यां गुजराथेंत कित्येक पेठांना दरवाजे असत व असतात. दरवाजा बंद केला म्हणजे पेठ बंद होत असे. दरवड्याच्या भीतीनें पेठेला दरवाजा केलेला असे. ह्या दरवाजाला वार हा मध्यकालीन संस्कृत किंवा प्राकृत शब्द होता. त्यावरून लक्षणेनें वार म्हणजे दरवाजाच्या आंतील पेठ असा अर्थ झाला. वार म्हणजे दरवाजे व पेठा ज्यांनीं बांधल्या त्यांचीं नांवें त्या वारांना किंवा पेठांना सहजच मिळत. सीयडोणी शिलालेखांत (१) वहुलू व रुद्रगण यांचा वार, (२) अ (इ) बुआ नरासिंघ यांचा वार, (३) वारप व पद्य यांचा वार, (४) पाहू व देदेक यांचा वार, (५) द्वाविंसतक व छित्तराक यांचा वार आणि (६) तुंडि व प्रद्युम्न यांचा वार असे सहा वार बांधणार्यांच्या नांवानें उल्लेख आलेले आहेत. हुल्झनें वार याचा अर्थ जमात असा एकच दिला आहे; व कीलहार्नानें ह्या शब्दाचा अर्थ मुळींच दिला नाहीं. परंतु ह्या शिलालेखांत वर लिहिलेल्या सहा स्थळीं वार ह्या शब्दाचा अर्थ पेठ असा आहे, हें मीं वर स्पष्ट करून दाखविलें आहे.
४. शक ८७६ त बांधणार्यांच्या नांवानें वारांचा उल्लेख करीत. पुढें मुसलमानी अमलांत बांधणार्यांच्या नांवाची ओळख बुजून म्हणा किंवा मनुष्यांच्या नांवांपेक्षां ग्रहांचीं नांवें बरीं वाटलीं म्हणून म्हणा, वार ह्या शब्दाचा उपयोग ग्रहांच्या नांवांबरोबर होऊ लागला. कदाचित् वार म्हणजे दिवस व वार म्हणजे पेठ ह्या दोन अर्थाचा वाचक असा एकच शब्द असल्यामुळें, पेठांना आधुनिक लोकांनीं दिवसांचीं नांवें दिलीं असावीं. असें दिसत कीं, पूर्वी प्रत्यक धंद्याच्या व जातीच्या लोकांच्या निरनिराळ्या पेठा असत व त्यांस त्या लोकांचे वार म्हणत. पुढें मुसलमानी अमलांत वाटेल त्या जातीचा माणूस वाटेल त्या वारांत राहूं लागल्यामुळे व धंदे व जाती ह्यांच्या जमातीचें माहात्म्य कमी झाल्यामुळे, वारांच्या पाठीमागील अधिष्टात्या व्यक्तींच्या नांवाचा लोप झाला आणि त्या नांवांच्या ठिकाणीं वार शब्दाच्या अनेकार्थत्वामुळें ग्रहांचीं नांवें आलीं. एकंदरींत, वार हा शब्द एक हजार वर्षांचा जुना आहे. ( सरस्वती मंदिर-संकीर्ण लेख )