अपभ्रंशांतील बापु हें रूप उकार लागून बनलेलें आहे, आणि तें विचारांत घण्यासारखेंही नाहीं. सबब, निर्देशमात्राने त्याची बोळवण करून, संस्कृत वप्तृ व महाराष्ट्री बप्प यांचा आदेशसंबंध कोणता तें सांगतों.
वप्तृ शब्दापासून बप्प शब्द निष्पादितांना ज्ञानप्रकाशांतील परीक्षकाला जी अडचण आली ती ही कीं, प्त चा प्प होणें शक्य नाहीं. तेव्हां कोणत्या किमयेनें तो तुम्ही बनवितां तें बोला, नाहीं तर आपली चूक कबूल करा, असा त्याचा प्रश्न आहे.
संस्कृतांतून महाराष्ट्रींत येतांना प्त चा त्त हा आदेश नियमानें होतो, हें परीक्षकाप्रमाणें मलाही मान्य आहे. लवरखेरीज करून संयुक्त व्यंजनांतील उपरिष्ट हलाचा लोप होतो व अधःस्थ हलाचा होत नाहीं, असा नियम आहे. तो प्त च्या बाबतींतही खराच असणार. संस्कृतांतून महाराष्ट्रींत येतांना प्त तील उपरिष्ठ जो प् त्याचा लेप होतो व अधःस्थ त ला द्वित्व येतें-या नियमाप्रमाणें पाहातां, वप्तृ या शब्दांतील (प्त चा त्त होऊन वत्तु असें महाराष्ट्री रूप व्हावें, जसे नप्तृ= नत्तु) परंतु तें तसें होत नाहीं हें तर आपण प्रत्यक्ष पाहातों. तेव्हां याला तोड काय करावी व ह्या अडचणींतून कसें निघावें ? अथवा बाब दुर्भेद्य व असाध्य म्हणून तशीच सोडून द्यावी व हताश होऊन स्वस्थ बसावें ? बाप, बप्प व बप्तृ हे तीन पितृवाचक शब्द मुलगा, बाप व आजा ह्या क्रमानें एकाच वंशाचे व बीजाचे आहेत ह्यांत संशय नाहीं. कां कीं, बप्प ह्या महाराष्ट्री शब्दाचें संस्कृत मूळ शोधून काढण्यास प्रतिलोमादेशपद्धतीनें ज्या अटी हव्यात त्यांपैकीं बहुतेक सर्व बप्तृ ह्या शब्दांत आढळतात. ( १ ) शब्द व्द्यक्षरी पाहिजे. (२) त्याचें आद्याक्षर आदेशानें व होण्यासारखे पाहिजे. आणि (३) द्वितीयाक्षर संयुक्त असून आदेशानें प्प होण्यासारखें पाहिजे. पैकीं पहिल्या दोन अटी बप्तृ ह्या शब्दांत आहेत. तिसरी अट मात्र ह्या शब्दांत सकृतदर्शनीं आढळत नाहीं. ऐतिहासिक पद्धतीच्या जोरावर एवढें तर निखालस म्हणतां येतें कीं, इष्ट शब्द वप्तृतर असलाच पाहिजे. आदेशप्रमाणाच्या दोन अटीही तेंच सांगतात. तेव्हां प्रमाणांचा तर जोर बप्तृ ह्या शब्दाला सडकून आहे. एक तिसरी अट मात्र सकृतदर्शनीं आड येते. ती टाळावयाचा रस्ता येणेंप्रमाणें:-
आत्मन् ह्या शब्दाला अप्प व अत्त असे दोन आदेश होऊन दोन प्रकारचीं रूपें साधतात. हे अप्प व अत्त आदेश आत्मन् ह्या शब्दापासून निर्वचनकार येणेंप्रमाणें साधितात. आत्म० = आत्व० = आत्प० = आप्त०. त्म चा त्व, त्व चा त्प, आणि त्प चा प्त होतो, असें सांगण्याचा आशय आहे. आत्प ह्या आदशाचें आप्त असें रूपांतर होतें, असें मानिल्याशिवाय अत्त हें रूप साधत नाहीं. ह्या स्थलीं त् आणि यांचा स्थल. व्युत्क्रम होतो. तसाच स्थानव्युत्क्रम वप्तृ ह्या शब्दांत होऊन वत्पृ असें रूप होतें व उपरि लोप होऊन बप्प असें रूप बनतें. वप्प चें बप्प होतें, व बप्प चें मराठींत बाप होतें. वत्पृ पासून वप्प बनण्यास स्थानव्युत्क्रमाच्या नियमाचा आश्रय करावा लागतो. तो करणें निरुक्तिशास्त्राच्या नियमांना धरूनच आहे.
स्थानव्युत्क्रमाचा आश्रय करावयाचा नाहीं, असा आग्रह धरावयाचा असल्यास, बप्प ह्या शब्दाचें निर्वचन अन्यमार्गानेंही देतां येण्यासारखें आहे. वप् ह्या धातूपासून वापक असें नाम बनतें व त्याचा अर्थ वप्तृ सारखाच बहुतेक होती. मग, वापक = बावअ = बापअ = बप्पअ = बप्प असें परंपरित रूप साधतां येतें. हें रूप चार मजल्यांनीं साधलें. परंतु वप्तृ = वत्पृ = बप्प हें रूप दोन मजल्यांनींच साधतें. सबब ह्या दुसर्या रूपसिद्धीचा सौलभ्यास्तव मी आश्रय केलेला आहे. हा आश्रय अक्षरव्युत्क्रमाच्या नियमाला धरून आहे. तेव्हां तो सशास्त्र आहे, ह्यांत संशय नाहीं. मी आपल्या ज्ञानेश्वरीचें प्राचीनत्व सिद्ध करण्याकरितांच केवळ बाप हा शब्द वप्तृ ह्या शब्दापासून साधला असें नाहीं. तर तो तसा शास्त्रानुसार साधला जातोच. बाप शब्द वापक शब्दापासून साधला तथापि त्यानें माझ्या ज्ञानेश्वरीचें प्राचीनत्व अणुमात्र ढळत नाहीं. बापक या शब्दाहून वप्तृ हा शब्द संस्कृतांत जनक ह्या अर्थी विशेष प्रचलित असल्यामुळें तो मीं स्वीकारिला आहे. ह्याहून दुसरा हेतु नाहीं. ह्या दोन व्युत्पत्त्या बाप ह्या शब्दाच्या मला दिसतात. ह्याहून सरस अशी एखादी व्युत्पति परीक्षक जर दाखवूं शकेल तर ती स्वीकारण्यास माझ्याकडून कांकूं होणार नाहीं. (ज्ञानप्रकाश, आषाढ शु. २ शके १८३२)