बाप १ [ पा = पालन करणें. कुर्भ्रश्च (उणादि सूत्र २२) प्रमाणें पपुः पालक:. पपु = बपु = बापु = बप्प = बाप ] पिता. (भा. इ. १८३२)
-२ [ वप्तृ = वप्प = बप्प = बाप, बापूस, बाप्या, बा ] बीं पेरणारा. (स. मं.)
-३ [ द्व्यात्मन् = बाप्प = बाप ] तो माझा बाप आहे म्हणजे तो माझा दुसरा आत्मा आहे. (भा. इ. १८३४)
-४ [ मराठी बाप शब्दाचें निर्वचन - ज्ञानप्रकाशच्या ११ जुलैच्या ( १९१०) अंकांत रा. रा. रामचंद्र भिकाजी जोशी यांच्या “ मराठी शब्दसिद्धि ” या पुस्तकाचें कोण्या परीक्षकानें त्रोटक परीक्षण केलें आहे. त्यांत बाप या शब्दाची जी व्युत्पति रा. रा. जोशी यांनीं दिली आहे ती त्या परीक्षकाला मान्य नाहीं.
अमान्यतचें कारण तो येणें प्रमाणें देतो. ‘ वप्तृ यापासून प्रकाराचा लोप होऊनच शब्द साधेल; असें एकही उदाहरण नाहीं कीं, ज्यामध्यें प्त या जोडाक्षराचा उत्तर अवयव गळाला आहे.” म्हणजे प्रकाराचा लोप होऊन वत्त असाच शब्द साधेल; वप्प असा शब्द कदापि साधणार नाहीं. असा या परीक्षकाचा अभिप्राय आहे. तो कितपत साधार आहे तें येथें पहावयाचें आहे.
२ कोणत्याही शब्दाच्या व्युत्पत्तीचा विचार तीन पद्धतींनीं करावा लागतो. पहिली आदेशपद्धति; दुसरी ऐतिहासिक पद्धति; व तिसरी तौलनिक पद्धति. पैकीं आदेशपद्धतीचा उपयोग दोन गतींनीं करतां येतो; अनुलोमगतीनें व प्रतिलोमगतीनें. मूळ वैदिक शब्द किंवा संस्कृत शब्द घेऊन त्याला महाराष्ट्री, अपभ्रंश व मराठी भाषांत येतांना कोणकोणते आदेश होऊन, मराठी रूप येतें, तें अनुलोमपद्धतीनें पाहावयाचें असतें. जेथें वैदिक, संस्कृत, महाराष्ट्री किंवा अपभ्रंश ह्यांतील रूपें माहीत नसून केवळ मराठी रूपानें माहीत असलेला शब्द व्युत्पादावयाचा असतो, तेथें आदेशशास्त्रनियमानुसार त्या मराठी शब्दाचीं अपभ्रंश, महाराष्ट्री, संस्कृत व वैदिक रूपें कल्पावयाचीं असतात. जेथें अनुलोमादेशपद्धति, ऐतिहासिक पद्धति व तौलनिक पद्धति, या तिन्ही पद्धति थकल्या, तेथें ही प्रतिलोमादेशपद्धति लावणें अवश्य होतें. व्युत्पाद्य मराठी शब्दाचें वैदिक, संस्कृत, महाराष्ट्री किंवा अपभ्रंश ह्यांपैकीं कोणत्याही भाषेत पूर्वरूप आढळलें असेल, तर बाकी राहिलेल्या भाषांपुरतींच तेवढीं पूर्वरूपें आदेशनियमानुसार कल्पावीं लागतात. व्युत्पाद्य मराठी शब्दाचें पूर्वभाषांतील पूर्वरूप किंवा पूर्वरूपें ऐतिहासिक पद्धतीनें सांपडतात. ती सांपडलीं असतां आदेशपद्धतीचा व ऐतिहासिक पद्धतीचा मिलाफ होतो व निर्वचन बलवत्तर होतें.
३ ह्या तीन पद्धतींतून बाप ह्या मराठी शब्दाला प्रथम ऐतिहासिक पद्धति लावली असतां निरुक्ति सुकर होईल. कारण मग कल्पनेचें काम म्हणजे प्रतिलोमादेशपद्धतीचें काम फार थोडें राहील, कदाचित्त् बिलकुल राहाणार नाहीं. बाप हा शब्द मराठींत पितृवाचक आहे. ह्या शब्दाचें अपभ्रंशांत व महाराष्ट्रत कोणतें रूप होतें तें ग्रंथांतरीं सांपडल्यास पाहावयाचें आहे.
डॉक्टर फ्लीट यांनीं corpus Incriptionum Indicarum च्या तिसर्या खंडांत वलश्रीच्या चवथ्या शिलादिल्याचा शक ६८९ तला एक ताम्रपट दिला आहे. त्यांत बप्प हा महाराष्ट्रीं शब्द आला आहे.