द्रम्म - हा शब्द ग्रीक drachm या शब्दापासून निघाला आहे किंवा असावा असा आग्रहपूर्वक तर्क कित्येक यूरोपीयन शब्दविद किंवा शाब्दिक करतात. परंतु तें म्हणणें सशास्त्र दिसत नाहीं. कारण ( १ ) ग्रीक drachm ह्या शब्दाची ग्रीक भाषेत व्युत्पति कोणी दाखविलेली नाही. (२) ग्रीक भाषेतील ग्रंथांत किंवा नाण्यावर हा शब्द संस्कृत भाषेंतील ग्रंथांतल्यापेक्षां किंवा नाण्यांपेक्षां पुरातन कालीं येतो, असें हि कोणीं दाखविलेलें नाहीं.
द्रम्म हा शब्द प्राकृत आहे. द्रम् धातूपासून द्रम्य कृदन्त होतों. द्रम् गतौ. द्रम्य म्हणजे That which wanders, circulates. द्रु धातूपासून द्रव्य कृदन्त होतें. त्याचा हि अर्थ That which moves, wanders, circulates असाच आहे. सारांश द्रव्य व द्रम्य हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत. द्रम्य ह्याचें प्राकृत द्रम्म. द्रम्म याचें प्राकृत दाम. द्रम्म म्हणजे circulating money असा मूळ अर्थ. नंतर तो शब्द एका विशिष्ट नाण्याला लावूं लागले. द्रम्म सोन्याचे, रुप्याचे किंवा तांब्याचे असत.
तात्पर्य हा शब्द मुळीं ग्रीक भाषेतील नाही; संस्कृत भाषेंतील आहे. विशेष प्रचार प्राकृत भाषेंत आढळतो. मुळीं हा शब्द पंजाबापासून असुर्या देशांतील प्राकृत भाषांत प्रचलित असावा व तेथून ग्रीक ऊर्फ हेलेनिक लोकांनीं तो उचलला असावा.
चलन, चलनी हे शब्द हि चाल् गतौपासून च निघाले आहेत. currency, circulation हे हि शब्द गत्यर्थक धातूंपासून च निघाले आहेत.
द्रु = द्रव्य, द्रविण.
दाम याचें क्षुद्रत्व दर्शक रूप दमडी, दामाडू. (भा. इ. १८३२)
द्रव्य [द्रु गतौ ] (द्रम्म पहा )
दुग् (कानडी) [ दुर्ग = द्रुग् (कानडी ) ]
द्वाड १ [ दुर्वाट = दुवाड = द्वाड ] दुवाड रूप ज्ञानेश्वरींत येतें. (स. मं.)
-२ [ दुविदग्ध = दुवाड, द्वाड ] Slow, sluggish.