शेणावी - महाराष्ट्रांत शेणवई ह्या नांवाचे स्वदेशबांधव आहेत. त्यांच्या नांवाची व्युत्पत्ति नाना प्रकारची दिलेली निरनिराळ्या ठिकाणीं सांपडते. कित्येकांच्या मतें शेणवई असें रूप नसून शेणवी असें शुद्ध रूप आहे. ह्या लोकांच्या मतें शेणापासून झाले ते शेणवी ! गोव्याकडे पोर्तुगीज लोक शेणवयांना सनाय म्हणून हाक मारतात; परंतु हा शेणवई ह्या शब्दाचा केवळ अपभ्रंश आहे. श्येननामक प्राण्यापासून ज्यांची मूळ उत्पत्ति कल्पिली ते शेणवई असाही मालवणास एका गृहस्थानें समासव्यवच्छेद केला. असे नानाप्रकारचे अर्थ ह्या शब्दाचे विनोदानें झालेले आहेत. त्यांत विशेष कांहीं मतलब नाहीं. कोंकणी भाषेत शेणय असा एक शब्द आहे. त्याचा अर्थ पंतोजी आहे. तिकडे ब्राह्मणांपेक्षां शेणव्यांची लोकसंख्या जास्त असल्यामुळे शिक्षकाचा धंदा शेणवीच करीत आले आहेत. ज्याप्रमाणें आंग्लो इंडियन लोकांत पंडित म्हणजे पंतोजी समजण्याचा प्रघात आहे, त्याचप्रमाणें गोव्याकडे अस्सल पोर्तुगीज लोकांत पंतोजीस शेणय म्हणण्याचा प्रघात आहे. सारांश, शेणय हा शेणवी शब्दाचा अपभ्रंश आहे. तेव्हां शेणय शब्दाचा आश्रय करून शेणवी शब्दाची व्युत्पत्ति करतां येणें शक्य नाहीं. शेणवी शब्दाची खरी व्युत्पत्ति येणेंप्रमाणें आहे. शेणवी शब्द मूळ शेणवई असा आहे. शेणवई हें रूप मूळचें शेणवइ असें आहे. शेणवइ=सेण्णवइ = सैन्यपति, अशी ह्या शब्दाची परंपरा आहे. सैन्य शब्दाचें सेण्ण प्राकृत रूप आहे; व पति शब्दाचें वइ प्राकृत रूप आहे. चोलवइ = चोलपति, वाणरवइ= वानरपति, घरवइ = गृहपति अशों रूपें सेतुबंध काव्यांत अनेक ठिकाणीं आलीं आहेत. तात्पर्य, सैन्यपति शब्दाचें सेण्णवइ व सेण्णवइ शब्दाचें शेणवी असें अपभ्रष्ट रूप आहे. शेणवी, शब्दाच्या जोडीचाच दळवी शब्द आहे. हा शब्द दळवे ह्या रूपानें ज्ञानेश्वरींत येतो. दळवैपणा हें भाववाचक नाम ज्ञानेश्वरीत अनेक वेळां आलें आहे. दळवी = दळवै = दळवइ = दलपति, अशी ह्या शब्दाची परंपरा दिसते. शेणवी व दळवी ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच. दळवी व शेणवी हे दोन्ही शब्द ज्ञानेश्वरांच्याहि पेक्षां जुने आहेत; व ते धंदा किंवा पेशा ह्यांचे वाचक आहेत. ह्यावरून दळवी व शेणवी ह्यांची मूळजात कोणती तें मात्र निक्षून सांगतां यावयाचें नाहीं. परंतु सात आठशें वर्षांपूर्वी अलीकडल्यापेक्षां जातिनिर्बंध जास्त कडक होते असें मानल्यास शेणवी व दळवी ह्यांची जात धंद्यावरून क्षत्रियांची ठरते. हा केवळ व्युत्पत्तिदृष्ट्या विचार झाला. धर्म, आचार, शरीराचा आकार, वगैरेंचा ह्या बाबीसंबंधानें विचार करून मग कायमचा सिद्धांत बांधला पाहिजे. ( सरस्वती मंदिर श्रावण शके १८२६)
सवाशे (ब्राह्मण) - ब्राह्मण्यां जायते वैश्याद्योसौ वैदेहिकाभिधः । शूद्रान्ते रक्षणं राज्ञा कुर्यादनुपमोहि सः ॥ सामान्यवनिताः पोष्यास्तासां भाटी च जीविका । तस्योक्ता शूद्रधर्माणां नाधिकारोस्ति कश्चन ॥ सावासी ॥ ( जातिविवेक ) सावासी = सवाशे ( अनेकवचन) (भा. इ. १८३४)
सुतार - सूत्रग्राहः = सुतार. हातांत सूत्र वागवणारा तो सूत्रग्राह. सुतार हें कोंकणस्थांत आडनांव आहे. सूत्रकार पासून सुतार शब्द निराळा.