शाक्य - नट, निच्छिवि वगैरे व्रात्य क्षत्रियजाति ज्या प्रांतांत रहात होत्या त्याच प्रांतांत शाक्य नांवाचे व्रात्यक्षत्रिय राहात असत. मनुसंहितेच्या दहाव्या अध्यायाचा ४४ वा श्लोक येणेंप्रमाणें आहे :--
पौंड्रकाश्चौड्रद्रविडाः कांबोजा यवनाः शकाः ।
पारदाः पश्चीबाल्हीनाः किराता दरदाः खशाः ॥४४
( वृषलत्वं गता लोके ब्राह्मणादर्शनेन च ॥ ४३ ॥ )
वृषल म्हणजे व्रात्य. सगर राजाच्या कालीं ह्या शक वगैरे क्षत्रियजाति व्रात्य झाल्या. पैकीं शकक्षत्रियोत्पन्न जे शाक्य व्रात्यक्षत्रिय त्यांपैकीं कांहीं लोक समानशील अशा नट, निच्छिवि वगैरे व्रात्यक्षत्रियांच्या प्रांतांत येऊन राहिले. ह्या शाक्यव्रात्यक्षत्रियांत गौतमबुद्धाचा जन्म झाला. महावीर जसा नटव्रात्यक्षत्रिय होता, तसाच बुद्ध शाक्यव्रात्यक्षत्रिय होता. व्रात्यत्वामुळें गौणता आली. तच्छमनार्थ शुद्धक्षत्रियांच्या व शुद्धब्राह्मणांच्या विरुद्ध ह्या दोघांनीं जैन व बौद्ध धर्म काढिले. ते शकादि व्रात्य जातींत अर्थातच फार प्रिय झाले. शुद्ध चातुर्वर्णिकांत ह्या वर्णसंकरकारक धर्मांचा शिरकाव झाला नाहीं. शकोऽभिजनोऽस्य शाक्यः ( ४-३-९२ ). शण्डिकादिभ्योऽण (४-३-९२) ह्या सूत्रांत जो शण्डिकादि गण सांगितला आहे त्यांत खालील शब्द आहेतः- शण्डिक, सर्वसेन, सर्वकेश, शक, शट, रक, शंख, बोध. गर्गादिभ्यो यञ् ( ४-१-१०५) ह्यांतील गर्गादि गणांत हि शक शब्द आहे. ह्या दोन सूत्रांत अभिजनो अस्य व गोत्रापत्ये शाक्य असें रूप होतें म्हणून सांगितलें आहे. तद्राजार्थी रूप काय होतें तें पाणिनि सांगत नाहीं. गौतमबुद्ध ऊर्फ शाक्यमुनि तर राजपुत्र होता म्हणून प्रसिद्ध आहे. तेव्हां पाणिनि बुद्धापूर्वी झाला.
(भा. इ. अहवाल १८३२ )
शिख - शिख (Vedik, name of a serpent priest) = शीख. हें एका वैदिककालीन सर्प लोकांच्या भटाचें नांव होतें.
शिंपी - शिल्पिन् = सिप्पी = शिंपी. शिंप्यांतील जुन्या चालीचे आधुनिकांग्लशिक्षणानभिज्ञ लोक आपणा स्वतःस सिपी म्हणतात. परंतु ब्राह्मणी उच्चाराचें शिष्टत्वास्तव अनुकरण करणारे नव्या चालीचे लोक शिंपी ह्या शब्दाचा उपयोग करितात. वस्तुतः शिंपी ह्या रूपापेक्षां सिपी हें रूप जास्त शुद्ध आहे. शिपींतील अनुस्वार प्रथम अनुनासिक होता. तो शिष्टांनीं अनुस्वार केला. (स. मं.)
शीख - (शिख पहा )