धेड, धेडा - दैतेयः (the sons of दिति = दैत्य ) = धेड, धेडा.
धेड म्हणजे वेदकालीन दैतेय, दैत्य.
धेडा ही जात दैत्यांची डहाणू उंबरगांवाकडे आहे.
धेड हे महाराष्ट्रांत सर्वत्र आहेत.
धोयी - धौतिक = धौबिअ = धोबीअ = धोबी. (भा. इ. १८३५)
नट, निच्छिवि - जैनधर्माचा संस्थापक महावीर हा नट जातीचा होता, हें प्रसिद्ध आहे. ह्या नट जातीचा उल्लेख मनुसंहितेच्या दहाव्या अध्यायाच्या २२ व्या श्लोकांत केला आहे. व्रात्यक्षत्रियापासून सवर्ण म्हणजे क्षत्रियस्त्रीच्या टाई जी प्रजा होते तिला नट ही एक संज्ञा असलेली मनुसंहितेंत वर्णिली आहे. तेव्हां ह्या व्रात्यक्षत्रिय जातींत महावीर जन्मला हें सांगावयाला नकोच.
ही नटजाति वैशाली नगराजवळ रहात असे. ह्या वैशाली नगरींत लिच्छवि नामक क्षत्रियांचें त्या कालीं वास्तव्य असे. लिच्छवि म्हणजे मनुसंहितेच्या दहाव्या अध्यायाच्या २२ व्या श्लोकांत उल्लेखिलेली निच्छिवि नामक व्रात्यक्षत्रियांची जात होय. निच्छिवि ह्या शब्दांतील निच्या ठिकाणीं लि आदेश होऊन लिच्छिवि हा प्राकृत शब्द निष्पन्न झाला. प्राकृतांत असा न चा ल होतो. उदाहरणार्थ निंब (संस्कृत) = लिंब (प्राकृत ). ह्या प्राकृत लिच्छिवि शब्दाचा लिच्छवि हा अपभ्रंश किंवा पर्याय आहे.
ह्या लिच्छिवि जातींतील कुमारदेवीशीं शक २२० च्या सुमारास गुप्तवंशाचा आदिपुरुष जो पहिला चंद्रगुप्त त्यानें लग्न लाविलें. (V. A. Smith's Early History of India, chapter XI ).
ह्या निच्छिवि शब्दाचा भारतांतील शिबि, शिवि ह्या देशवाचक व तद्देशराजवाचक शब्दाशीं संबंध असलेला दिसतो. शिविदेशाच्या जवळील जो प्रदेश तो निच्छिवि. शिविदेशांतील शिविनामक शुद्धक्षत्रियापासून जे व्रात्यक्षत्रिय झाले त्यांचा जो देश तो निच्छिवि देश.