६ चित्तपावन हें स्थल किंवा प्रांत कोंकणांत कोठे असावा ? हें स्थल किंवा प्रांत तो असावा कीं, जेथें किंवा ज्यांत किंवा ज्याच्या आसपास चित्तपावनांच्या साठ आडनांवांत गर्भित असलेलीं ग्रामें आहेत, साठ आडनांवांतून जीं आडनांवें गुणांवरून किंवा धंद्यांवरून पडलीं तीं गाळून बाकीचीं जीं आडनांवें उरतात तीं सर्व ग्रामांवरून निघालेलीं आहेत. हीं ग्रामें ज्या प्रदेशांत असतील तो सर्व प्रदेश चित्तपावनसंज्ञक होय. आतां, प्रस्तुतकालीं हें नांव प्रचलित नाहीं, हें स्पष्टच आहे. नाहीं तर ह्या नांवाच्या व्युत्पत्तीसंबंधानें इतका घोटाळा माजला नसता. हा घोंटाळा सह्याद्रिखंडलेखनकालापासून चालू आहे. म्हणजे, सह्याद्रिखंडलेखनकालीं हि चित्पावन हा शब्द इतका रूढ व प्राचीन होऊन गेला होता कीं, त्याचा उगम लोकांस कळेनासा झाला होता.
७ चित्पावनांच्या आडनांवांत ' साठे' असे एक आडनांव येतें; हें साष्टिक: या शब्दापासून साठिआ (एकवचन), साठिए, साठिये, साठये, साठे आशा परंपरेनें निष्पन्न झालेलें दिसतें. तेव्हां साष्टि हा प्रांत चित्तपावन प्रांतांत पुरातनकालीं मोडत असावा. ' दाबक ' हें एक चित्तपावनांचें आडनांव आहे. दापपल्ली, दापोली या शब्दांतील जो दाप तेथील राहाणारा जो तो दापक. दापकः = दावकः = दावका, अशा परंपरेनें दाबक, दाबके हें आडनांव आलेलें आहे. अशी च परंपरा आणखी कांहीं आडनांवांची दाखवितां येईल. सारांश, दापोली हरणईपासून साष्टीपर्यंतचा जो मुलूख तो पुरातनकाळीं चित्तपावन या संज्ञेनें महशूर असावा. मालशे, पोंगशे वगैरे आडनांवें माल ( मालवण), पोंग ? वगैरे प्रांतवाचक शब्दांवरून निघालेलीं स्पष्ट दिसतात. चित्पावनांच्या आडनांवांसंबंधानें एक स्वतंत्रच लेख मी लिहिणार आहें; त्यांत कोंकणस्थांच्या सर्व आडनांवांचा छडा लावण्याचा प्रयत्न करण्याचा माझा विचार आहे.
८ आतां चित्पावन किंवा चित्तपावन ह्या शब्दाचा अर्थ काय तो पाहूं. क्षितिपावन किंवा चितिपावन या शब्दाचा अपभ्रंश चित्पावन हा शब्द आहे. 'क्ष' चा 'छ' व ' छ ' चा ' च ' होऊन
क्षितिपावन = छितिपावन
= चितिपावन
= चित्पावन
असा अपभ्रंश होतो. क्षितौ पावन: क्षितिपावनः । पृथ्वीवर जो सर्वांना पावन करितो तो. क्षितिपावन अथवा चिति या शब्दाचा अर्थ हि पृथ्वी असा आहे, तेव्हां चितिपावन असा हि मूळ शब्द असेल. चित्पावन याचें भारदस्त पुन्हा संस्कृतीकरण ' चित्तपावन ' हें आहे. (भा. इ. १८३३)
जिनगर - अजिनकर = जिनकर = जिनगर. ऋभुभ्योऽ जनसंधं ( मा वा. सं. ३०-१५) अजिनसंधं चर्मसंधातारं (महीधर-वेददीप ३०-१५) चर्म ऊर्फ चामडें जोडणारा जो तो अजिनकर. तात्पर्य हा शब्द वेदकालापासूनचा आहे. जिनगरांना ह्याचा अभिमान असावा. (भा. इ. १८३३)