३ तेव्हां आतां ह्या शब्दाची व्युत्पत्ति ऐतिहासिक पद्धतीनेंच लाविली पाहिजे. म्हणजे एखाद्या विश्वसनीय लेखांत ह्या शब्दाचे रूप कसें येतें तें पाहून त्यावरून ह्या शब्दाचें मूळ शोधिलें पाहिजे. चित्पावन किंवा चित्तपावन हा शब्द शालिवाहनाच्या चवदाव्या शतकाहून प्राचीन अशा लेखांत किंवा ग्रंथांत आढळत नाहीं. त्यापुढें शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीपासून हा शब्द विशेष आढळूं लागतो. पेशवे चित्पावन होते, त्यामुळें ह्या शब्दाला जगप्रसिद्धि आली व चित्पावन कोण, कोठील वगैरे चिकित्सा सुरू झाली. पेशव्यांच्या आधीं या शब्दाच्या व तद्वाच्य अर्थाच्या कडे, अर्थात्, कोणीं यत्किंचितहि लक्ष दिलें नव्हतें.
४ चित्तपावन हा शब्द सह्याद्रिखंड किंवा शतप्रश्नकल्पलता या संस्कृत ग्रंथांखेरीज इतर स्वतंत्र हस्तलिखितांत सांपडतो कीं काय हें पाहात असतां, कोंकणांत अलीबागेस एका गृहस्थाच्या दप्तरांत किरवंतांच्या संबंधानें मला एक संमतिपत्र चार पांच वर्षांपूर्वी (हा लेख भा. इ. संशोधक मंडळाच्या शके १८३३ च्या इतिवृत्तांत छापलेला आहे) सांपडलें होतें, त्यांत हा शब्द आढळला. पत्र ' पूर्तकाली ' कागदावर लिहिलें आहे. हें बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीत केव्हां तरी लिहिलें असावें. शक, मास, तीथ, वार वगैरे कशाचाहि उल्लेख पत्रांत नाही; त्यामुळें नक्की वर्ष सांगतां येत नाहीं.
५ संमतिपत्रांतील एक सही अशी आहे :-
" संमतोयमर्थः सदाशिव (भ) ट्ट दीक्षित चितळे चित्तपावनस्थ धर्माधिकारी ”
ह्या ओळींत चित्तपावनस्थ हा शब्द आला आहे. ह्याचा अर्थ काय, तें आपणास पहावयाचें आहे. कोंकणस्थ, देशस्थ, करहाटकस्थ, गोमांतकस्थ, गोकर्णस्थ इत्यादि सजातीय प्रयोगांत स्थ हा शब्द स्थलवाचक नामांशीं जोडलेला आढळतो. त्याप्रमाणेंच चित्तपावनस्थ ह्या समासांत चित्तपावन या स्थलवाचक नामाशीं ' स्थ ' हा शब्द जोडलेला आहे, असें म्हणावें लागतें. चित्तपावनस्थ ह्या सामासिक शब्दाचा अर्थ चित्तपावनजनस्थ असा हि होईल. परंतु कर्हाडे, किरवंत, पळशे, शेणवी, सुतार, पांचकळशी, अशा प्रत्येक जातीला पृथक् पृथक् धर्माधिकारी नेमण्याचा संप्रदाय आपल्या देशांत प्राचीन काळीं नव्हता व सध्यां नाहीं. तेव्हां चित्तपावन म्हणजे चित्तपावन लोक अथवा जन असा अर्थ येथें घेतां येत नाही. चित्तपावनस्थ म्हणजे चित्तपावनप्रांतस्थ किंवा चित्तपावनग्रामस्थ असाच अर्थ स्वीकारणें अपरिहार्य आहे. ह्या अर्थस्वीकाराला दुसरें हि एक प्रमाण आहे. संमतिपत्राच्या दुसर्या सहींत
" संमतभिदं महादेव भट्ट खरे
ग्वाहागरकर प्रांत धर्माधिकारी ”
म. धा. ३३
प्रांत धर्माधिकारी असे शब्द आहेत तेव्हां येथें धर्माधिकारित्व स्थलविशिष्ट आहे, जनविशिष्ट नाहीं, हें स्पष्ट आहे. तात्पर्य, चित्तपावन हें स्थलनाम आहे, लोकनाम नाहीं.