कुळवाडी [ कुलपालकः (दोन बैलांनीं नांगरली जाणारी जमीन करणारा ) = कुळवाडी. कुलपालिका = कुळवाडीण ]
कोळी १ - कुपिनिन् = कुइलि = कोळी one who plies his trade of fishing with कुपिनी a bamboo instrument called खून.
-२ कूलिन् = कोळी (समुद्रतीरचा ) कोळी म्हणजे समुद्रतीरचा माणूस. कोल या शब्दापासून निघालेला कोळ शब्द व लोक या समुद्रतीरच्या कोळ्यांहून निराळे. (भा. इ. १८३५)
-३ कूलिन् = कूळी = कोळी. कूलिन् म्हणजे समुद्राच्या किंवा नदीच्या किंवा गिरिणदीच्या कांठीं राहून उपजीविका करणारा मनुष्य. ह्यावरून इंग्रजी कूली शब्द निघाला आहे. (महाराष्ट्राचा वसाहतकाल पृ. २१०)
गुज्जर किंवा गुजर्र - गुह्यराज् = गुज्जराअ = गुज्जर.
गुज्जर शब्दाचें पुन्हा संस्करण गुर्जर.
गुह्यराज् हें गुह्यक लोकांनी आपणांस घेतलेलें भूषविणारें नांव. ( भा. इ. १८३५ )
गोहेल - गुहेरः (protector, guardian) = गोहेल.
गोहेल ही एक रजपुतांची कुळी आहे.
चितपावन - क्षेत्रपावन -चेत्तॅपावन (महाराष्ट्री) = चितपावन. परशुराम क्षेत्राला पवित्र करणारे ब्राह्मण ते चितपावन हीच या शब्दाची व्युत्पत्ति खरी. क्षितिपावन = चितिपावन चितपावन. पृथ्वीला पवित्र करणारे जे ब्राह्मण. (भा.इ. १८३३)
चित्पावन - १ हा शब्द ' चित्पावन ” व चित्तपावन अशा दोन रूपांत आढळतो. विशेष प्रतिष्ठितपणें बोलावयाचें किंवा लिहावयाचें असलें म्हणजे ' चित्तपावन' हें रूप योजतात. परंतु सामान्य रोजच्या उपयोगांत चित्पावन हैं रूप हमेशा येतें.
-२ ह्या शब्दाची व्युत्पत्ति अनेकांनी अनेक प्रकारांनीं केलेली आहे (१) चितेपासून पावन झालेले जे ते चित्पावन. (२) चित्त पावन ज्यांचें झालें ते चित्तपावन. (३) तिसरी व्युत्पात्ति जरा चमत्कारिक आहे. 'इजिप्त' ह्या शब्दाचा अपभ्रंश ' चित् ' आहे, असें गुंजीकर म्हणतात ! ह्यांपैकीं एकही व्युत्पत्ति ऐतिहासिक नाहीं; सबब ग्राह्य करण्याला अडचण येते. (१) स्मशानांत मेलेलीं शवें जिवंत झाली व त्या पुरुषांना पुढें जी संतति झाली, ती ' चित्पावन ' या नांवाची मालक झाली, हा आधार पहिल्या व्युत्पत्तीला देतात; ऐतिहासिक रीत्या आधार आधेयाच्या पूर्वकालीन असावा लागतो, मानवी व्यवहारांत शक्य असावा लागतो, व साक्षात् घडला असल्याचा त्याला पुरावा असावा लागतो. ह्या तिन्ही बाबी प्रस्तुत आधारांत विद्यमान नाहींत. कां कीं, आधेयाच्या पश्चात् आधाराची कल्पना केलेली दिसते. चितेवर ठेवलेलीं शवें उठल्याची हकीकत फारशी शक्य दिसत नाहीं. आणि यदाकदाचित् शक्य मानिली, तत्रापि ती कालदशादींनीं परिछिन्न नाहीं. अर्थात् ही व्युत्पत्ति ग्राह्य नाहीं. (२) दुसर्या व्युत्पत्तीला आधार धर्मभ्रष्ट झालेल्यांच्या चित्तशुद्धीचा देतात. तोही कालदशादींनीं विशिष्ट नाहीं, सबब तो हि इतिहास नाहीं. ( ३ ) तिसरी व्युत्पत्ति हि कालदेशादि-अनिर्देशास्तव अग्राह्य च होय. ' इजिप्त ' शब्दांतला जो ‘ जित् त्याचा अपभ्रंश ' चित् ' अशी कल्पकानें कल्पना बसविली आहे. ह्या पद्धतीनें वाटेल त्या शब्दापासून वाटेल तो शब्द निघूं शकेल. उदाहरणार्थ, चितागांग वगैरे. परंतु ऐतिहासिक सत्यतेच्या कक्षेत येण्यास त्याला अनेक अडचणी येतील. सबब ह्या तिन्ही व्युत्पत्त्या अग्राह्य होत. अर्थात्, सह्याद्रिखंड, शतप्रश्नकल्पलता वगैरे संस्कृत परंतु अर्वाचीन ग्रंथ ह्या प्रकरणीं बिलकूल विश्वास्वं दिसत नाहींत.