Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र - साने गुरुजी
स्वभावाशी परिचय
ज्ञानक्षेत्रांत काम करून ज्ञानाच्या सीमा वाढवा. परंतु हें कार्य आमचे हे स्वार्थत्यागी विद्वान् कितीसें करतात ? निरनिराळया कॉलेजांमधून असणा-या आचार्यानी ज्ञानाच्या कोणत्या शाखांत स्वतंत्र व स्पृहणीय भर घातली आहे ? कोणते अभिनव व उदात्त ग्रंथ निर्माण केले ओत ? या सर्व गोष्टीच्या नांवानें जर शून्याकार असेल, त्याचप्रमाणें शाळा कॉलेजांतून बाहेर पडणारे विद्यार्थी सेवावृत्तीस आलिंगन देण्यास उत्सुक, मानहानी मुकाटयानें सोसणारे, गतप्राण, नेभळट असेच निर्माण होत असतील तर या स्वार्थत्यागाचा उपयोग काय ? तेजस्वी व तडफदार अशी तरुणपिढी तरी निर्माण करा की जी पिढी इंग्रजांस लाथ मारुन हांकलून देणें हेंच जीवित कार्य मनात धरुन ठेवील, किंवा ज्ञानप्रांतांत तरी अलौकिक कामगिरी करा की जेणें करून भारतवर्ष इतर प्रगमनशील राष्ट्राच्या जोडीनें आपली जागा घेईल. परंतु या दोन्ही गोष्टीपैकीं कोणतीहि गोष्ट ज्या स्वार्थत्यागी लोकांकडून- शिक्षण संस्थांकडून होत नाही- त्यांनी उगीच मोठेपणाची हौस कशास मिरवावी ? राजवाडे अशा स्वार्थत्यागाची टर उडवीत. खरे ज्ञानाचे उपासक आपणांकडे नाहीत म्हणून त्यांस विषण्णता येई. यामुळेंच आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीसारख्या क्रियाशून्य अगडबंब मढयास ते न्हावगंड युनिव्हर्सिटी म्हणत. याच विषण्णतेमुळें काशीच्या भारतधर्म महामंडळाने 'पुरातत्व भूषण' ही पदवी राजवाडे यांस मोठया प्रेमानें दिली असतां, राजवाडे यांनी तें प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) ज्या नळकांडयांत होतें तें नळकांडें घेण्याची उत्सुकता दर्शविली नाही. श्रमांची योग्यता व विद्वत्तेची खरी किंमत समजणा-या पुरुषाकडून गौरव केला गेला, तर तो गौरव स्पृहणीय असतो; परंतु ज्यास विद्वत्तेबद्दल श्रम करावयास नकोत, विद्वत्तेबद्दल, ज्ञानाबद्दल खर उत्कंठा नाही, विद्वत्तेच्या वा ज्ञानाच्या दृष्टीने ज्यांच्याजवळ भोपळया एवढें पूज्य अशानें केलेला मान व गौरव जास्तच उद्वेगकारक वाटतो. गुणवंत गुणांचें गौरव करुं जाणतो; अगुणास तें शक्य नाही व त्यानें केलें तर तें गौरव हास्यास्पद होतें. आपली योग्यता जाणणारे विद्वान् नाहीत म्हणून राजवाडे खिन्न होत. आपले ग्रंथ समजण्याची पात्रता नाही म्हणून विद्वानांची त्यांस कीव येई. आजपासून २० वर्षांनी माझे ग्रंथ समजूं लागतील असें ते म्हणत. त्यांच्या व्याकरणाचा उपयोग फ्रेंच पंडित करतात; परंतु आपल्याकडील लोकांस तें सजण्याची पात्रता नाही. या उद्वेगजनक प्रकारानें कोणा ज्ञानाभिमान्यास विरक्तता व संतप्तता प्राप्त होणार नाही. यासाठीं राजवाडे या नव सुशिक्षितांस, शाळा कॉलेजांतून शिकविणा-यांस तुच्छतेनें कारकून म्हणत व त्यांच्या स्वार्थत्यागाची पै किंमत ठरवीत. ज्ञानप्रांतांत कै.भांडारकर, टिळक वगैरे कांही गाढया पंडितांबद्दल राजवाडे आदरानें बोलत, परंतु टिळकांनीहि आपले ग्रंथ इंग्रजीत लिहिले म्हणून त्यांसहि नांवे ठेवण्यास या बहाद्दराने कमी केलें नाही.
मराठी भाषेबद्दल त्यांचा अभिमान पराकोटीस पोंचलेला होता. इंग्रजी भाषेंत व्यवहार करणा-यांवर ते खवळावयाचे. फक्त १८९१ मध्यें एकदां ते इंग्रजीत बोलले होते-कां तर पीळानें, ऐटीनें. 'साहेब काय इंग्रजीत बोलतो, मी सुध्दा फर्डे बोलून दाखवितों' अशा इरेनें ते बोलले. पत्रव्यवहार त्यांनी बहुतेक इंग्रजीतून केला नाही. पत्रें ते मोडीत व कधी कधी संस्कृतमधून लिहीत. भाषेचा जसा अभिमान, त्याप्रमाणेंच आचाराचा पण त्यांस अभिमान होता. पंचा नेसून प्रयोग शाळेंत काम केलें तर ऑक्सिजन निर्माण होत नाही की काय असें त्वेषानें ते विचारीत. स्वभूमि, स्वभाषा, स्वजन व स्वधर्म यांना वाहिलेलें त्यांचें आयुष्य होतें व त्यांच्या सर्व बारीक गोष्टीतही ही गोष्ट सूर्यप्रकाशाप्रमाणें स्वच्छ दिसते.