Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

इतिहास संशोधन व इतिहास मंडळ

ते कोंकण प्रांतीही गेले होते व तिकडेही त्यांनी संशोधन केलें. कोंकण प्रांतांतील लोकासंबंधी ते लिहितात 'कोंकणांतील ब्राम्हण, मराठे, भंडारी वगैरे लोक मोठे चलाख, उद्योगी, शीघ्रबुध्दि, धाडसी व श्रमसाहस करणारे असलेले मला दिसले. ह्यांच्यांत मध्यम व उच्च शिक्षणाचा प्रसार झाल्यास एकंदर महाराष्ट्रांतील समाजाची प्रगति जास्त वेगानें होईल, असा माझा ग्रह झाला. ह्या लोकांत Naval Architecture चें एखादें स्कूल व उच्च शिक्षणार्थ एखादें तरी सर्वसाधनसंपन्न कॉलेज स्थापिल्यास, येथून धाडसी व सुशिक्षित नावाडी व कुशाग्र विद्वान् निपजण्याचा संभव आहे.' अशाप्रकारें जेथें जातील तेथें सूक्ष्म बुध्दीनें सर्व पहात. पत्रें वगैरे मिळविण्यास त्यांस कशी मारामार पडे. याचें त्यांनीच आपल्या एका खंडाच्या प्रस्तावनेंत वर्णन केलें आहे. कनक व कांता यास जिंकून, मानापमानाचें गांठोडें बांधून ठेवून, आशेस फार सैल न सोडतों, सतराशें खेटे घालावयास लागले तरी तयार असणें वगैरे गोष्टी संशोधकास पाहिजेत. एखादे वेळी उन्हातान्हांतून जावें व पत्रें दाखवूं नये. असेंही होईल असें ते सांगत. कारण स्वत: त्यांस क-हाड मुक्कामी असतां असे कटु अनुभव आले होते. दप्तरें झाडून साफ करावयाची, धुळीनें नाकपुडया भरुन जावयाच्या; कोळिष्टकांनी डोके भरून जावयाचें; या सर्व धुळवडीस तयार असलें पाहिजे, तर पत्रलाभ होईल असें ते म्हणत. पुन्हा कधी कधी पत्रें मिळत त्यांचे गठ्ठे वाळूनें खाल्लेले अगर पावसानें एकत्र झालेले असे असावयाचे. सातव्या खंडाचे अश्रांत परिश्रमानें कधी उकिरडयांतून तर कधीं उकिरडे वजा झालेल्या जुन्या वाडयांतील तळघरांतून अथवा कधीही वापरांत नसलेल्या तिस-या, चवथ्या मजल्याच्या माळयावरुन-उन्हाळयांतील कडक ऊन, पावसाळयांतील पाऊस व हिंवाळयांतील थंडीचे कडके खाऊन, कडकून, भिजून आणि फिरुन आकर्षून-केर कचरा व वाळवी यांच्या अखंड मैत्रींत 'कालोह्यहं निरवधिर्विपुलाच पृथ्वी' या भवभूतीच्या उक्तीवर विश्वास टाकून बसलेली अशी रा. रा. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे बी. ए. यांसारखे पदवीधर उजेडांत आणीत आहेत; त्यांना अभ्यंग स्नानें घालीत आहेत; त्यांचे रागग्रस्त मार्ग प्रसंगी कळकळीच्या मवाळीनें सुप्तह्य होणा-या शब्रवारांनी कापून काढून निराळे करीत आहेत; कित्येक ठिकाणी मलमें लावीत आहेत; तर कित्येक ठिकाणी नवे अवयवही कृत्रिम त-हेनें बनवून चिकटवीत आहेत व जुन्यांस रजा दत आहेत. ह्या सर्व गोष्टी केवळ कविकल्पना वाटण्याचा पुष्कळ संभव आहे, परंतु ज्यांनी हे पत्रांचे गठ्ठे स्वतां वाळवीनें इतकी खाल्ली आहेत कीं, त्या वाळवीच्या किडयांच्या मृत शरीराची माती त्या पुस्तकांत भिनून एकंदर पुस्तकाची माती-कां ? दगडी पाटीच बनली आहे. अशा स्थितीत असलेली ही पुस्तकें फिरुन बोलकी करावयास प्रथम त्यांस युक्तीनें वाफारा द्यावा लागतो. हा वाफारा देतांच त्या प्रस्ताराचे पापुद्रे कांहीसे सुटे होतात. ते तसे सुटे झाल्यावर लगेच गर्भाशयांतील शस्त्रक्रियेच्या प्रसंगी जितक्या हलक्या हाताने आणि काळजीपूर्वक काम करावें लागतें, त्यापेक्षांही अधिक हलक्या हातानें आणि कळकळीनें त्या प्रस्तरप्राय पुस्तकाचें एक एक पृष्ठ सोडवावे लागतें. अशीं हीं सोडविलेली पृष्ठें फिरुन चिकटूं नयेत म्हणून त्यांच्यामध्यें एक एक टिप कागदाचें किंवा साध्याही कागदाचें पृष्ठ घालून ठेवावें लागतें. इतकें करूनही ही पृष्ठें आपलें सर्व हृद्वत बोलून दाखविण्यास समर्थ होत नाहीत. इतकेच नव्हे, तर कित्येक अगदी निरक्षर म्हणजे मुकी झालेलीच जेव्हां आढळतात, तेव्हां मनाला किती उदासवाणे वाटत असेल, याची कल्पनाच करणे बरें' याच प्रस्तावनेंत द्रव्यसाहाय्य करण्याबद्दल सर्व जनतेस मोठी कळवळयाची विनंती केली आहे. या विनंतीप्रमाणें कांही साहाय्य मिळालें.