प्रस्तावना
बागलाण त्या काळी महत्त्वाच्या देशात मोडत असे व तेथे बहुतेक स्वतंत्र हिंदू राजे राज्य करीत असत, करता बागलाणी भाषेला जयरामाने मान दिला, ढुंढार, बख्तर, ब्रज, पंजाबी ह्या भाषा बोलणारे हजारो लोक शहाजीच्या सैन्यात नोकरीवर असत, तेव्हा त्याही आर्य भाषा दरबारातील लोकांस व शहाजीराजास कळत. तात्पर्य, संस्कृत, प्राकृत म्हणजे मराठी, गोपाचलीय म्हणजे ब्रज, गुर्जर, बख्तर, ढुंढार, पंजाबी, हिंदुस्थानी, बागलाणी, उर्दू, फारसी व कानडी या भाषा शहाजीच्या दरबारातील उच्च व मध्यम वर्गातील लोकांना उमगण्यास प्रयास पडत नसत. ह्याचा अर्थ असा की, शिवाजीच्या व शहाजीच्या राजवटीत भरतखंडाच्या मध्यवर्ती असा जो महाराष्ट्रदेश, त्या देशातील महाराष्ट्र ब्राह्मणांना व क्षत्रियांना देशपरिस्थितीमुळे अनेक भाषांचे ज्ञान सहज होत असे, तत्कालीन जी क्षुल्लक व ग्राम्य अशी हजारो सनदापत्रे फारसी व फारसीमय मराठी भाषेत लिहिलेली उपलब्ध आहेत. ती क्षुद्र ग्रामलेखकांना व पाटलांना समजतात या बुद्धीनेच लिहिली गेली असली पाहिजेत. या बाबीसंबंधाने आता आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. वस्तुस्थितीच तशी होती. हा अनेकभाषाज्ञातृत्वाचा धागा फार प्राचीन आहे. ज्ञानेश्वराला संस्कृत मराठी व बागलाणी; दासोपंताला संस्कृत, मराठी, फारसी व उर्दू; एकनाथाला संस्कृत, मराठी हिंदुस्थानी, ब्रज व उर्दू; रामदासाला संस्कृत, महाराष्ट्री, मराठी, फारसी ब्रज व उर्दू; तुकारामाला संस्कृत, मराठी व ब्रज, विठ्ठलाला मराठी व कानडी, अशा अनेक भाषा येत असत. राजकारणाशी ज्यांनी फारकत करून घेतली त्या भक्तशिरोमणीची जर ही कथा, तर राजकारणात सदैव पोहणा-या दरबारी गृहस्थांची गोष्ट काय विचारावी? त्यांना अनेकभाषाकोविद होण्यावाचून गत्यंतरच नव्हते. हा प्रकार इतर देशातही घडलेला आहे व सध्या घडत आहे. इंग्रज कवी मिल्टन याला जुनी इंग्रजी, इंग्रजी, लॅटिन, ग्रीक व इटालियन आणि कदाचित फ्रेंच इतक्या भाषा अवगत होत्या. बेकनला इंग्रजी, ग्रीक व लॅटिन या भाषा येत असत आणि सध्या तर हजारो इंग्रजांना ग्रीक, लॅटिन, फ्रेंच व जर्मन या भाषा व्यवहारसौकर्यार्थ शिकाव्या लागतात. हाच प्रघात फ्रान्स व जर्मनी या देशात आहे आणि हाच प्रघात शहाजीकालीन महाराष्ट्रीय दरबारी लोकात जारीने चालू होता व तो सध्याच्या युरोपातल्याहूनही जास्त प्रमाणावर चालू होता असे म्हटल्यावर अतिशयोक्ती होईलसे दिसत नाही. महाराष्ट्रात लोकांचे हे अनेकभाषाकोविदत्व सध्याही दिसून येते. उच्च इंग्रजी शिक्षण ज्यांना मिळाले आहे त्यापैकी बहुतेकांना मराठी, संस्कृत व इंग्रजी या तीन भाषा तर येतातच येतात, परंतु वैदिक, महाराष्ट्री, मागधी, शौरसेनी, पिशाच्च, पाली, ब्रज, पंजाबी, सिंधी, बंगाली, उर्दू, बागलाणी, कोंकणी, फ्रेंच व जर्मन इत्यादी आणिक भाषा जाणणारेही एकेकटे लोक महाराष्ट्रात थोडे सापडतील असे नाही. सांगण्याचा मुद्दा एवढाच की, देशस्थितीमुळे व राज्यस्थितीमुळे महाराष्ट्रातील अनेक लोक अनेकभाषाविद सध्या बनलेले आहेत व पूर्वी बनलेले होते याचे प्रत्यंतर बारा भाषांत लिहिणा-या जयरामाने व ते लिहिणे समजणा-या दरबा-यांसमवेत शहाजीराजे भोसले यांनी दिलेले लोकांच्या प्रत्ययास आणून देण्याचे काम प्रस्तुत लेखक करीत आहे.