प्रस्तावना

१. प्रस्तुत ग्रंथ चिंचवड येथे विष्णुपंत रबडे यांच्या घरी तिस-या मजल्यावरील पोथ्यांच्या व कागदपत्रांच्या अस्ताव्यस्त गठाळ्यात कुजत पडलेला आढळला. सहा महिन्यांपूर्वी रबड्यांच्या घरी गेलो असता शेकडो संस्कृत व मराठी पोथ्या तिस-या मजल्यावरील कौलारू छपराखाली भिजून भाकरीप्रमाणे घट्ट झालेल्या व उंदरांच्या लेंड्यांनी भरलेल्या पाहून, त्यातून पाचपन्नास लहान-मोठे ग्रंथ निवडून व झाडूनपुसून एकीकडे काढले, त्यात ही राधामाधवविलासचंपूची पोथी होती. मूलत: पोथीची एकंदर पाने ५६ होती. पैकी ७ वे पान गहाळ होऊन सध्या ५५ पाने शाबूत आहेत. पहिल्या, दुस-या व अठ्ठाविसाव्या पानांवर छिद्रे पडून काही अक्षरे फाटून गेली आहेत. बाकी ग्रंथ एथून तेथून सुरक्षिताक्षर आहे. पोथीचा कागद जुना जुनरी असून तिची लांबी ९.५ इंच व रुंदी ४ इंच भरेल. दर पृष्ठावर नऊपासून बारापर्यंत ओळी असून प्रत्येक ओळीत चाळीसपासून पंचेचाळीस पर्यंत अक्षरे आहेत. अक्षर अडीचशे वर्षांचे मराठी वळणाचे बाळबोध आहे. पोथी सबंद एका हाताने, एका शाईने व निदान तीन लहानमोठ्या टोकांच्या लेखण्यांनी लिहिलेली आहे. फक्त शेवटच्या पानावरील समाप्तीच्या पाच श्रियांनंतर "इदं पुस्तकं लक्ष्मणसूनोर्मनोहराख्यपौराणिकस्य" ह्या वाक्याची शाई, वळण व टाक अशी तिन्ही निराळी आहेत. मनोहर लक्ष्मण पुराणिक याने हे वाक्य स्वत: लिहिलेले आहे व ते शेवटल्या पानाच्या खाली समासावर कोठेतरी एका बाजूस लिहिले आहे. पोथी मूळ लिहिली गेली त्याच वेळी हे वाक्य लिहिले गेले असते तर शेवटल्या ओळीनंतर ओळीला जोडून ओळीच्या संचाला विद्रुपता जेणे करून न येईल अशा तऱ्हेने सहज लिहिले गेले असते. परंतु, ज्या अर्थी संचाला विद्रुपता आली आहे व ज्या अर्थी हे स्वामित्व दर्शविणारे वाक्य ओळ सोडून कोठेतरी तिरके लिहिले आहे, त्या अर्थी उघडच होते की मनोहर पुराणिकाच्या ताब्यात ही पोथी कालांतराने जेव्हा आली तेव्हा त्याने हे वाक्य आपल्या हाताने लिहून ठेवले. दुस-या कोणीतरी लिहिलेली मूळ पोथी कोणत्या तरी कारणाने मनोहर पुराणिकाच्या ताब्यात आली, हे दर्शविणारा दुसरा एक पुरावा आहे. पोथीच्या पहिल्या पानाला जेथे छिद्र पडून अक्षरे गहाळ झाली आहेत, तेथे मनोहर पुराणिकाने सुडाच्या चौकोनी चकतीचे पानाच्या पाठीमागून काळजीपूर्वक ठिगळ चिकटविले आहे व पोथी जास्त न फाटेल अशी तरतूद केली आहे. अर्थात मनोहर पुराणिकाच्या हातात ही पोथी जेव्हा आली तेव्हाच ती जीर्ण होऊन छिद्रे पडलेली अशी आली हे स्पष्ट आहे. मनोहर पुराणिक हा साक्षेपी गृहस्थ होता, सबब हाती आलेल्या जीर्ण पोथीची डागडुजी करून व ती वर आपली दखल घालून त्याने ती आपल्या संग्रहास ठेवून दिली. कालांतराने पोथी पुराणिकाच्या घरून रबड्यांच्या घरात जाऊन सध्या ती प्रस्तुत संपादकाच्या आश्रयास प्रकाशनार्थ आली. मनोहर पुराणिकाच्या दखलेतील अक्षरांचे वळण त्याने स्वत: लिहिलेल्या इतर ग्रंथांतील वळणाशी जुळते.