प्रस्तावना
११) त्यांच्या मिश्रणाने शालिवाहनाच्या पाचव्या शतकाच्या सुमारास मराठे लोक व मराठी भाषा उदयास आली.
१२) ह्या मराठा लोकांची संस्कृती नाग व माहाराष्ट्रिक या दोघांच्या संस्कृतीचे मिश्रण होती व दोघांचे गुणदोषतीत उतरले होते.
१३) स्वत:चे साम्राज्य हाकण्याची ऐपत व इच्छा नसल्या कारणाने मराठा लोकांवर उत्तरदेशीय चालुक्यादी क्षत्रिय सम्राटांनी शक १२४० पर्यंत राज्य केले.
१४) नंतर मुसलमान आले त्यांनी शक १५५१ पर्यंत अंमल केला.
१५) पुन: भोजक्षत्रिय जे शहाजीशिवाजी भोसले त्यांचे राज्य या लोकांवर यांच्याच धर्माभिमानी व महाराष्ट्राभिमानी साहाय्याने झाले.
१६) परंतु, महाराष्ट्रधर्म ह्या लोकांत परिपूर्ण न मुरल्यामुळे, पुढे चित्पावन ब्राह्मणांनी ह्या लोकांवर अंमल बसविला.
१७) आणि आता हे लोक भौतिक - व अध्यात्म - शास्त्रसंपन्न इंग्रजांच्या हुकमती खाली रहात आहेत.
१८) उच्चब्राह्मण व उच्चक्षत्रिय यांनी तत्कालीन इष्टानिष्टापत्तीप्रमाणे वर्ण व जाती निर्माण करून जातींना विशिष्ट व अनन्यसामान्य वृत्या लावून दिल्या. मराठा क्षत्रिय, मराठा कुणबी, क्षुद्र कुणबी व नागवंशी महार यांना साक्षर करण्याचा जारीने प्रयत्न न केल्यामुळे व ह्या लोकांची संख्या देशात बहुतम झाल्यामुळे, बुध्दिमान व कर्तबगार अशा उच्च ब्राह्मणांना व उच्च क्षत्रियांना ह्यांच्याबरोबर अधोगतीत रखडत बसण्याची यथायोग्य शिक्षा मिळाली आहे.
१९) रंगाने, चेह-याने, दिनचर्येने व संस्कृतीने महाराष्ट्रातील ब्राह्मण, मराठे, कुणबी, महार व मांग इत्यादी आर्य व आर्यानार्य अशा सर्व जाती सावळया, नीटस व स्नानशील बनल्या असून, आता निषिध्द खाद्यपेय वगळले असता बहुतेक एकजिनसी होण्याच्या मार्गाला लागल्या आहेत. वर्णाचे व जातीचे समाजरचनेत जे कार्य व्हावयाचे ते बरेच होऊन चुकले आहे. ह्याहून उच्चतर समाजरचनेचा काल ह्या पुढे उगवेल असा निश्चित अंदाज दिसतो.
२०) चातुर्वर्ण्य व जाती अनादी नाहीत. चातुर्वर्ण्य उत्तरकुरूंत उत्पन्न झाले व बौध्दकालात त्यांचे रूपांतर जातिसंस्थेत झाले. सर्व जातींचा एकच सावळा रंग झाल्याकारणाने वर्णभेदाचे आता कारण उरले नाही आणि बहुतेक सर्व जाती अन्योन्य वृत्तीचे उल्लंघन गेली हजार वर्षे करू लागल्यामुळे, जातीभेदाचीही मातब्बरी, कातकरी, भिल्ल वगैरे वन्य लोक वगळले तर, वृत्तिदृष्टया म्हणजे निर्वाहदृष्टया राहिली नाही.