प्रस्तावना

निश्चित देव नाही, निश्चित धर्म नाही, अक्षर नाही, ऐतिह्य नाही, असे हे लोक राज्यकर्त्यांच्या व देवब्राह्मणांच्या अखंड पराभवाला कारण होऊन गेले. जो खावयाला देईल त्याच्या बाजूने लढावयाचे, एवढा एकच ह्यांचा धंदा राहिला. आज चालुक्याच्या बाजूने लढले, उद्या राष्ट्रकूटांच्या तैनातीत शिरून चालुक्यांना पाडिले, पर्वा यादवांची पाईकी स्वीकारून चालुक्यांचा धुव्वा उडविला आणि शेवटी मुसलमानांचे बंदे बनून यादवांचे उच्चाटन केले; असा हा मराठा क्षत्रिय वर्ग अजाणतेपणे देशात राजकीय अस्वस्थतेला कारण झाला होता. पोटाला घालण्याला जेव्हा कोणी धनी मिळत नसे तेव्हा रिकामपणाच्या अवधीत हे दंगेखोर लोक एकमेकांशी लढून प्रतिपक्ष्याची दहा पाच मैल जमीन सर करण्यात गुंतलेले असत. असल्या अंत:स्थ कलहाच्या हकीकती काही मी छापिल्या आहेत व काही मजजवळ अद्याप अप्रकाशित राहिल्या आहेत. हे नागमाहाराष्ट्रिकोत्पन्न लोक म्हणजेच शहाजीकालीन अराष्ट्रीय ऊर्फ अधर्म संस्कृतीचे मराठे लोक होत.

९९. शहाजीकालीन मराठे म्हणजे कोण लोक होते व हे लोक इतके पराकाष्ठेचे अराष्ट्रीय व अधम कसे बनले ह्या प्रश्नाचा उलगडा करण्याच्या खटाटोपाप्रीत्यर्थ ६३ व्या कलमापासून ९९ व्या कलमापर्यंतचे ३६ रकाने तपशील द्यावा लागला. हे मराठे लोक क्षत्रिय खरे, परंतु रामकृष्णजनकादि आत्मानात्मविचार करणाऱ्या व साम्राज्ये चालविणाऱ्या थोर क्षत्रियांचे हे साक्षात् वंशज नव्हेत, रामकृष्णादिकांच्या काळच्या काही कमसुधारलेल्या आयुधजीवी क्षत्रियांचे व नागांचे हे मुख्यत्वे करून वंशज होत. ह्यांच्या खेरीज दुसरे एक लोक आपणास मराठा क्षत्रिय म्हणून म्हणविणारे शहाजीकाली होते. परंतु तत्संबंधक मराठा क्षत्रिय ह्या शब्दाचा अर्थ महाराष्ट्रदेशात काही शतके राहिलेले उत्तरहिंदुस्थानातील क्षत्रिय असा होता, नागमाहाराष्ट्रिकोत्पन्न मऱ्हाटा असा नव्हता. ह्या महाराष्ट्रदेशनिवासी मराठा क्षत्रियांत चालुक्य, यादव, पल्लव, भोज इत्यादी थोर राजघराण्यातील क्षत्रियांच्या वंशजांचा समावेश होतो. चाळके, यादव, जाधव, पालवे, भोसले हे शब्द चालुक्य वगैरे संस्कृत शब्दांचे मराठी अपभ्रंश होत. ह्या थोर राजघराण्यात पुलिकेशिन्, अमोघवर्ष, विक्रमादित्य, सिंघण, अपरार्क इत्यादी बडी बडी धेंडें होऊन गेली आणि ह्यांच्याच वंशात शहाजी व शिवाजी हे अवतारी पुरुष निपजले. जसा महाराष्ट्र ब्राह्मण ह्या शब्दाचा मराठा ब्राह्मण हा मराठी अपभ्रंश आहे, तसाच महाराष्ट्र क्षत्रिय ह्या शब्दाचा मराठा क्षत्रिय हा मराठी अपभ्रंश आहे. महाराष्ट्र ब्राह्मण म्हणजे महाराष्ट्रदेशातील चिरनिवासी ब्राह्मण असा जसा अर्थ केला जातो, तसाच अर्थ महाराष्ट्र क्षत्रिय म्हणजे महाराष्ट्रदेशातील चिरनिवासी क्षत्रिय असा अर्थ केला जात असे. हे भोज, यादव, चालुक्य, राष्ट्रकूट, निकुंभ इत्यादी क्षत्रिय संस्कृतादि भाषा जाणणारे असून वैदिक संस्कृतीचे मोठे पुरस्कर्ते असत. ह्यांच्याच आश्रयाने विज्ञानेश्वर,भास्कराचार्य, होमाद्रि वगैरे नामांकित पंडितांनी संस्कृतसरस्वतीची अपूर्व सेवा केली. नागमाहाराष्ट्रिकोत्पन्न मराठयांच्या आश्रयाने भास्कराचार्यादि प्रतिभासंपन्न शोधकांचा निर्वाह झाला नाही व झाला नसता. कारण हे पंडित काय करतात व ह्यांच्या कर्तबगारीचा उपयोग काय, हेच मुळी समजण्याची अक्कल नागमाहाराष्ट्रिकोत्पन्न मराठयात नव्हती. भोजचालुक्यादि महाराष्ट्र क्षत्रिय व नागमाहाराष्ट्रिकोत्पन्न मराठे ह्यांच्या संस्कृतीत हा असा जमीनअस्मानाचा फरक होता आणि असा फरक पडल्यामुळे भोजचालुक्यादी महाराष्ट्र क्षत्रिय नागमाहाराष्ट्रिकादि मराठयांशी विवाहादी शरीरसंबंध करण्यात कमपक्ष मानीत. हा भेद महाराष्ट्रात भोसल्यांच्या राजवटीतही प्रचारात होता. भोसल्यांचा शरीरसंबंध विवक्षित पंचकुळीत व दसकुळीतच होत असे, हव्या त्या मराठा कुळीशी होत नसे. कारण भोसले हे महाराष्ट्र क्षत्रिय असल्यामुळे नागमाहाराष्ट्रिकोत्पन्न मराठयांशी संबंध करण्यात त्यांना कमीपणा वाटे.