प्रस्तावना
९४. आंध्रभृत्यांप्रमाणे, चालुक्यही माहाराष्ट्रिक नव्हते. चालुक्य हे मूळचे अयोध्याप्रांतातील उच्च वैदिकधर्मी क्षत्रिय होते. चालुक्यांप्रमाणेच राष्ट्रकूटही चेदिदेशातील लत्तनूर ऊर्फ रतनपूर प्रांतातून व शहरातून आलेले क्षत्रिय लोक होते. यादव मथुरा प्रांतातून आलेले उत्तरदेशीय क्षत्रिय सर्वप्रसिध्द आहेत. म्हणजे उत्तरे कडून येणा-या क्षत्रियांच्या विस्तीर्ण साम्राज्य उभारणा-या सामर्थ्यापुढे प्राथमिक गणराज्य करण्याचा अभ्यास करीत असलेल्या माहाराष्ट्रिकांना सदा मान वाकवावी लागे. माहाराष्ट्रिकांना विस्तीर्ण साम्राज्य करण्याची जर ऐपत असती तर शातवाहनांच्या समाप्तीच्या वेळेस आलेली संधी ते फुकट दवडते ना. चालुक्य, राष्ट्रकूट, पुन: आलेले चालुक्य, यादव इत्यादींच्या समाप्तीच्या वेळीही माहाराष्ट्रिकांनी काही एक हालचाल केलेली नाही. ह्यावरून उघड झाले की, विस्तीर्ण राज्ये उभारण्याला शस्त्रे, अस्रे, मुत्सद्देगिरी इत्यादीची जी वरिष्ठ प्रकारची ऐपत लागते ती महाराष्ट्रिकांच्या ठायी दिसून येण्याची सोयच नव्हती, इतके ते शस्त्रे, अस्त्रे, मुत्सद्देगिरी व बनाव सजविण्याच्या कामी दुर्बल होते. ही असली अनुकंपनीय दुर्बलता देशोदेशी असलेली आढळते. उदाहरणार्थ, प्राचीन ब्रिटन लोक घ्या. रोमन, डेन, आंगल, साक्सन व नार्मन इत्यादी एकापाठी मागून एक बलिष्ट लोक येऊन राज्ये करू लागले; तत्रापि ब्रिटनमधील ब्रिटन लोक जेथल्या तेथेच सुस्त होते. ह्याचे कारण उच्च प्रकारची कारवाई करण्याची ऐपत ह्या अर्धरानटी लोकांना एका धडयाने येण्याची सोय व संभव नव्हता. दुसरे उदाहरण आपल्या घरचे पंजाब्यांचे घ्या. अफगाणी, इराणी, तुराणी इत्यादी नाना वंशाचे मुसलमान पंजाबात आले, समाप्त झाले व त्याची जागा दुस-या वंशाच्या मुसलमानांनी पटकाविली. परंतु पंजाबी जागच्या जागी निश्चेष्ट होते. तोच प्रकार माहाराष्ट्रिक नावाच्या गणराजांचा होता. शातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव हे उत्तरेकडील क्षत्रिय आर्य पडल्यामुळे त्यांचे अधिराज्य माहाराष्ट्रिकांना दु:सह वाटले नाही अशी तात्पुरती कल्पना करू; परंतु यादवांच्या नंतर परधर्मी व क्रूर मुसलमान आले त्यावेळी तरी माहाराष्ट्रिकांनी काय केले? काही केले नाही. स्वस्थ होते. उलटे, मुसलमानांची पाइकी करण्यास हे लोक तयार झाले. ह्याचा अर्थ इतकाच की, स्वराज्य व साम्राज्य उभारण्याची ऐपत ज्या उच्च संकृतीने आंगी बाणते ती संस्कृती ह्या प्राथमिक माहाराष्ट्रिक लोकांत नव्हती.
९५. राजकीयदृष्टया माहाराष्ट्रिक लोक हे असे अगदी बाल्यावस्थेत होते. त्यांच्यात शकपूर्व १०० पासून शकोत्तर १५०० पर्यंतच्या सोळाशे वर्षांत राजकीयदृष्टया विशेष प्रगती होण्याची शक्यता नव्हती. ह्या अशक्यतेचे मुख्य कारण माहाराष्ट्रिक लोक ज्या हेतूने दक्षिणेत उतरले त्या हेतूत सापडते. दक्षिणेत उतरण्याचा माहाराष्ट्रिकांचा मुख्य हेतु स्वधर्मरक्षणार्थ नवीन वसाहती करणे हा होता. हे वसाहती करण्याचे काम सोळाशे वर्षे त्यांचे एक सारखे खळ न पडता चालले होते. त्यामुळे वरती येऊन अधिराज्य कोणी केले तरी त्याची त्यांना बिलकूल फिकीर वाटत नसे. वसाहती करण्याच्या कामात अधिराजा आड आला नाही म्हणजे त्याच्या विरुध्द माहाराष्ट्रिकांची तक्रार नसे.