प्रस्तावना

६४. पाणिनीय काळापासून शहाजी काळापर्यंतच्या भारतीय क्षत्राचा परंपरित इतिहास थोडक्यात देण्याची प्रतिज्ञा केली खरी. परंतु, भारतीय क्षत्र हे काही नितांत निअनन्यपरतंत्र असे स्वतंत्र प्रकरण नाही, चातुर्वर्ण्यनामक एका मोठ्या प्रकरणाचा एक भाग आहे. तेव्हा भारतीय क्षत्राचा इतिहास देण्यास जाऊ लागले असता, भारतीय ब्रह्माचा, भारतीय विशाचा व भारतीय क्षुद्राचा, किंबहुना भारतवर्षातील म्लेंच्छादींचाही इतिहास अनुषंगाने द्यावा लागतो, त्याखेरीज विषयपूर्ती व्हावी तशी होत नाही, इतकेच नव्हे, तर विषयाची साधी मांडणी सुद्धा मनाजोगती करता येणे मुष्कील पडते. इतका ह्या चारी वर्णांचा अन्योन्यनिकट संबंध आहे. बाकीच्यांना वगळून एकाच्याच संबंधी बोलू जाणे शक्य नाही. का की, एकाच्या सुखदु:खाचा, पापपुण्याचा व सुस्थितीदु:स्थितीचा परिणाम बाकीच्यांच्या सुखदु:खाशी व स्थितीशी परमनिगडित आहे. सबब, महाराष्ट्रातील शहाजीकालीन क्षत्रिय जे मराठे त्यांच्या संबंधीच्या विवेचनात महाराष्ट्रातील तत्कालीन ब्राह्मण, वैश्य व क्षुद्रातिक्षुद्र यांचाही समावेश केल्याविना गत्यंतर नाही. तात्पर्य, महाराष्ट्रातील शहाजीकालीन क्षत्रियांचा परंपरित इतिहास द्यावयाचा म्हणजे तत्कालीन चातुर्वर्ण्याचा परंपरित इतिहास द्यावयाचा असा अर्थ होतो आणि चातुर्वर्ण्य म्हणजे सर्व हिंदू समाज असा अर्थ होत असल्यामुळे महाराष्ट्रातील चातुर्वर्ण्याचा इतिहास द्यावयाचा म्हणजे महाराष्ट्रातील सर्व हिंदू समाजाचा इतिहास द्यावयाचा, हे उघड आहे. आता दक्षिणारण्यात ऊर्फ दंडकारण्यात ऊर्फ नर्मदेच्या दक्षिणेस आर्यांचा प्रवेश पाणिनीच्या नंतर भूरित्वाने झाला असल्याकारणाने महाराष्ट्रातील समाजाच्या इतिहासाला पाणिनीकालापासून आरंभ करणे युक्त दिसते. प्रथम पाणिनीकालीन ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व क्षुद्र यांची सामाजिक स्थिती कोणत्या प्रकारची होती, ते पाणिनीच्या सूत्रांच्या आधाराने नमूद करून, नंतर दंडकारण्यात वसाहती करताना व केल्यानंतर त्या स्थितीत कायकाय फेरफार होत गेले ते यथाक्रम निवेदन करितो.