प्रस्तावना
६३. तत्कालीन नाकर्त्या संस्थानिकांचा परामर्ष घेतल्यानंतर, तत्कालीन मराठा समाजाच्या निकृष्ट स्थितीसंबंधाने चार शब्द सांगणे आवश्यक होते. गेल्या बासष्ट कलमात कित्येक स्थली तत्कालीन मराठा समाजाला अधम, निकृष्ट, नाकर्ता इत्यादी विशेषणे लाविलेली पाहून जिज्ञासू विचारवंताच्या मनात असा प्रश्न येतो की, मराठे हे जर पुरातन क्षत्रिय आहेत अशी समजूत आहे आणि पुरातन क्षत्रिय जर सुसंस्कृत होते यात संशय नाही, तर शहाजीकालीन मराठे अधम, निकृष्ट, अज्ञ व राष्ट्रभावनाविहीन कोणत्या कारणांनी बनले? जनक, रामचंद्र, भीष्म, कृष्ण इत्यादी पुरातन क्षत्रिय आत्मा, नीति, राष्ट्रधर्म इत्यादींचा खोल विचार व आचार करणारे असून, त्यांचेच वंशज जर मराठा क्षत्रिय असतील तर ते इतके अनात्मवान् व अराष्ट्रक ऊर्फ अनीतिमान कसे बनले? उत्कृष्ट अवस्थेपासून निकृष्ट अवस्थान्तराप्रत एकाच वंशातील समाजाचे सर्व बाजूंनी अध:पतन सहसा झालेले इतिहासात नमूद नाही, इतकेच नव्हे तर अशक्य आहे. भीष्म, कृष्ण, जनक, रामचंद्र हे क्षत्रिय वैदिक आर्ष भाषा बोलणारे असून, त्यांचेच वंशज म्हणून समजले जाणारे शहाजीकालीन मराठे मराठी भाषा काय म्हणून बोलू लागले? इंद्र, वायू ,अग्निइत्यादी देवांचे ऋग्मंत्रे करून स्तवन करणा-या वेदकालीन भीष्मादी क्षत्रियांचे वंशज जर शहाजीकालीन मराठे होते म्हणून म्हणतात तर ते विठोबा, राम, कृष्ण, दत्त इत्यादींच्या फलपुष्पादींनी व गंधाक्षतादींनी मराठीत आरत्या कसे करू लागले? रथावर आरोहून धनुष्याने लढणा-या भीष्माचे शहाजीकालीन वंशज घोड्यावर बसून बंदूक व भाला ही हत्यारे काय कारणाने वापरू लागले? वैराज्य, साम्राज्य, पारमेष्ठ्य, राज्य इत्यादी राष्ट्रीकरणाचा रात्रंदिवस पाढा वाचणा-या भीष्मादी क्षत्रियांचे शहाजीकालीन वंशज वैराज्य, साम्राज्य, माहाराज्य इत्यादी महान हव्यास सोडून सामान्य राष्ट्र ह्या कल्पनेलाही इतके पारखे कसे झाले? इंद्राग्नीच्या छंदोभाषेतील कथा एकीकडेच राहोत, परंतु रामकृष्णादींच्या ऐतिहासिक कथा ह्या मराठ्यांच्याकरता प्राकृत व अपभ्रष्ट जी मराठी नावाची क्षुद्रभाषा तीत शेकडो ग्रंथकारांकरवी शेकडो वेळा हजार पाचशे वर्षे सतत काय म्हणून लिहिल्या जाव्यात? संस्कृत भाषेतील भारत, भागवत व रामायण ह्या मराठ्या लोकांना काय कारणाने समजत नाहीसे झाले? इत्यादी एकासारखे एक महत्त्वाचे असे अनेक प्रश्न संशोधकाच्या पुढे, उत्तरांची वाट पहात, दत्त म्हणून उभे रहातात. शहाजीकालीन मराठ्यांच्या राष्ट्रीय अथवा योग्य शब्द वापरावयाचा म्हणजे अराष्ट्रीय, मनोरचनेची यथायोग्य पारख करावयाची म्हणजे वरील प्रश्नांना समर्पक उत्तरे द्यावयाची. करता, मराठे हे कोण लोक आहेत, वैदिक क्षत्रियांशी त्यांचा कितपत संबंध पोहोचतो, भाषा, धर्म, आचार विचार, देश, राष्ट्र, रूप, पेहराव इत्यादी बाबतीत फेरफार होत होत मराठे लोक मराठा ह्या संज्ञेस कसे मिळविते झाले, इत्यादी प्रश्नांची उत्तरे पुढील काही कलमात देण्याचा प्रयत्न करतो व वैदिक काळाच्या अगदी अलीकडील थरापासून म्हणजे पाणिनीय काळापासून शहाजीच्या काळापर्यंत भारतीय आणि विशेषत: महाराष्ट्रीय क्षत्र कोणकोणत्या रूपांतरातून कसकसे बदलत व प्रतिष्ठापत गेले ते थोडक्यात नमूद करतो.