प्रस्तावना

६२. आता शेवटी दोन महत्त्वाच्या प्रश्नांचा उडतउडत उल्लेख करून हा प्रास्ताविक लेख आटोपता घेऊ. पहिला प्रश्न तत्कालीन संस्थानिकांचा. रामनगर, बागलाण, जव्हार, फलटण, जत, मुधोळ, सावंतवाडी, सोंधे, प्रभानवल्ली, श्रृंगारपूर, जावळी इत्यादी स्थळींचे लहानमोठे हिंदू व मराठा संस्थानिक महाराष्ट्रात शहाजीकाळी विद्यमान असता, मुसलमानी सत्ता उलथवून पाडण्याचा किंवा खिळखिळी करण्याचा उद्योग त्यांच्यापैकी कोणीही का केला नाही? शहाजीसारख्या नवख्या मनसबदारावर ही प्रचंड कामगिरी कशी येऊन पडली? खरे पाहिले तर सैन्य, पैसा, प्रजा, मुत्सद्दी, विचारवंत, लढवय्ये व पुढारी पैदा करण्याची किंवा होण्याची सोय शहाजीसारख्या उपटसुंभ मनसबदारापेक्षा ह्या पुरातन पिढीजाद संस्थानिकांपाशी जास्त असण्याची शक्यता होती. असे असून, देशाचे हे स्वभावसिद्ध नायक निर्माल्यवत् निस्तेज व सुस्त का राहिले? जव्हार हे संस्थान सर्वस्वी रानटी कोळी लोकांनी वसलेले असल्यामुळे, त्यांच्या ठायी मराठ्यांची उच्चतर महत्वाकांक्षी राजकीय मनोरचना त्या काळी प्रकट होणे शक्य किंवा संभाव्य नव्हते. सबब, त्या रानटी संस्थानाला प्रस्तुत उल्लेखातून वगळणे रास्त आहे. बाकी राहिलेली सर्व संस्थानिक शहाजीप्रमाणेच उच्च मराठे होते. ते सुस्त व स्वस्थ काय म्हणून राहिले? फलटण, जत, मुधोळ, सावंतवाडी व जावळी येथील संस्थानिक आदिलशाही, निजामशाही किंवा मोंगलाई मनसबदार बनून त्या मनसबदारीतच समाधान मानून शहाजीशी कधी विरोधाने व कधी उदासीनतेने वागत असत. सोंधे, प्रभानवल्ली व श्रृंगारपूर ह्या डोंगराळ मुलखातील मराठा संस्थानिकांना मुसलमानांचा स्पर्श फारच स्वल्प होत असल्यामुळे, ते आपापल्या कुहरात स्वस्थ झोपा घेत पडलेले होते व बाहेरच्या जगात होत असलेल्या उलाढालीची वार्ता त्यांच्या गावीही नव्हती. निजामशाही व मोंगलाई यांच्या सरहद्दीवर असलेली रामनगर व बागलाण ही क्षत्रिय संस्थाने, खरे पाहिले तर, त्यांच्याभोवती चाललेल्या गडबडीने खडबडून जागी व्हावयास पाहिजे होती. परंतु तीही गलितावस्थेत रममाण होऊन निश्चिंत पडली होती. ह्या सार्वत्रिक निश्चेष्टपणाचे कारण काय? महाराष्ट्रातील यद्ययावत सर्व मराठ्यांच्या व ब्राह्मणांच्या राजकीय निश्चेष्टपणाचे जे सार्वत्रिक कारण मागे सांगितले तेच ह्या संस्थानिकांच्या निश्चेष्ठतेचे कारण होय. राष्ट्र होण्याची म्हणजे सर्व महाराष्ट्राचा राजकीय कारभार स्वत: पाहण्याची उत्कट व जिवंत भावना ह्या संस्थानिकांच्या ठायी उद्भृत झाली नव्हती. त्यामुळे होते त्या नीच स्थितीत समाधान मानून व वरिष्ठ मुसलमानी अधिराजे करतील तो अपमान व सत्तासंकोच निमूटपणे सहन करून हे संस्थानिक कालक्रमणा करीत असत. ह्यांच्या निश्चेष्टतेचे हे एक कारण झाले. ह्या कारणाला राष्ट्रभावनाभाव म्हटले असता चालेल. निश्चेष्टतेचे दुसरे कारण, आहे ते गमाविण्याची भीती. मुसलमानी अधिसत्तेविरुद्ध पैगाम बांधून हाती असलेले क्षुद्र संस्थानवैभव हातचे घालविण्यापेक्षा ते सांभाळून रहाणे ह्या अल्पात्म्यांना पसंत पडे. तिसरे कारण असे होते की, मुसलमानी अधिसत्तेपासून फार दूर अंतरावर हे संस्थानिक रहात, त्यामुळे त्या अधिसत्तेत दुर्बलपणा कोठे व केव्हा उत्पन्न झाला किंवा होईल, ह्याचा पत्ता ह्यांना नसे. चौथे कारण असे होते की, ह्यांचे सैन्य व फौजफाटा अत्यंत क्षुद्र असे. करोल सैन्य जय्यत तयार ठेविण्याची व उत्तरोत्तर वाढविण्याची करामत ह्या क्षुद्र व ऐदी संस्थानिकांनी कधीच दाखविली नाही. निश्चेष्टतेचे पाचवे कारण म्हटले म्हणजे कारागीर हत्यार पैदा कशाकरिता करावयाचे, कोठून करावयाचे व कोठच्या पैशाने करावयाचे, ही अक्कलच मुळी त्याच्या हृदयभूमिकेत कधी उगवली नाही. सहावे कारण असे होते की, जपजाप्य करणारी क्षुद्र भिक्षुके व पोटभरू भिकार खर्डेघाशे ह्यांनी ह्या संस्थानिकांच्या दरबारचे मुत्सद्दीपण पटकाविलेले होते. ह्या भटभिक्षुकांच्या व खर्डेघाश्यांच्या नेतृत्वाखाली इंद्रालाही निंद्रपद प्राप्त झाले असते, अडाणी व अर्धरानटी मराठा संस्थानिकांना नीचतम पदवी प्राप्त झाल्यास नवल कसचे! ह्या अधम संस्थानिकांच्या अगदी उलट प्रकार शहाजीचा होता. १) राष्ट्र होण्याची प्रबल इच्छा, २) राज्य व राष्ट्र कमाविण्यात सर्वस्वाची आहुती देण्याची पूर्ण तयारी, ३) मुसलमानी अधिसत्तेच्या केंद्रस्थानी वसती पडल्यामुळे तेथील व्यंगे, मत्सर, विकार, बल, ऐश्वर्य इत्यादींची खडान् खडा माहिती, ४) करोल सैन्य, ५) कारीगार हत्या, ६) चाणाक्ष व चतुर मुत्सदी जवळ करण्याची पुण्यबुद्धी, ७) ह्या सर्व साधनांचा योग्य वेळी योग्य उपयोग करण्याची अप्रतिहत अक्कल, ८) त्या अकलेला मूर्तरूप देण्यास लागणारे शौर्य, ९) आणि मनुष्यमात्राला आपल्या कह्यात वागविण्याचे दुर्मिळ कसब, शहाजी राजाच्या ठायी जन्माने व कर्तबगारीने सिध्द झाल्यामुळे, त्याच्या हातून जुनाट संस्थानिकांच्या स्वप्नातही नव्हते त्या स्वराज्यस्थापनेच्या महत्कृत्याचा पाया घातला गेला. जुने संस्थानिक व नवा शहाजी ह्यांच्यात हे असे जमीनअस्मानाचे अंतर होते.