प्रस्तावना
६१. शहाजी संबंधाने शक या शब्दाची योजना जयराम कवीने जी केली आहे तीवरून एक अनुमान असे करता येते की, देशात काहीतरी नवीन मनू सुरू होत आहे, यवनांची सत्ता -हास पावत असून तिच्या जागी हिंदूंची सत्ता प्रचलित होत आहे व ह्या सत्तेचे रूप विक्रम किंवा शालिवाहन ह्या शककर्त्यांच्या सत्तेसारखे भासत आहे, अशा कल्पना त्या काळी कित्येक लोकांच्या मनात येऊ लागल्या होत्या. ही शककर्ती सत्ता शहाजीच्या अंमलाच्या रूपाने प्रकट होणार की काय याचा अंदाज साहजिकपणेच त्यावेळी कोणालाच करता येण्यासारखा नव्हता. शहाजी बनता बनता शककर्ता बनेल, अशीही अटकळ कित्येकांनी बांधिली असावी. परंतु त्या अटकळीत फारसा जीव नव्हता, हे तीनशे वर्षांनंतर आता आपण सांगू शकतो. कारण, शहाजीच्या इतिकर्तव्यतेचे साफल्य आपल्या डोळ्यांसमोर अथपासून इतिपर्यंत समग्र मांडले गेले आहे, त्यावरून आपण निश्चयाने सांगू शकतो की, शहाजीची सत्ता शककर्त्यांच्या सत्तेपैकी नव्हती. ती मांडलिकी सत्ता होती म्हणून शककर्ती नव्हती, असा मात्र अर्थ नव्हे. शिरजोर मांडलिकी सत्ता वरच्या दुर्बल अधिराजाला पदच्युत करून स्वत: अधिसत्ता बनू शकते. परंतु त्या शिरजोर मांडलिकी सत्तेला राष्ट्र म्हणून ज्याला म्हणतात त्या शक्तीचे अधिष्ठान पूर्वसिद्ध असावे लागते. ते अधिष्ठान शहाजीच्या मांडलिकी सत्तेला असावे तसे नव्हते. शहाजीची सत्ता वैयक्तिक होती. तो असेतोपर्यंत त्या सत्तेचा शिरजोरपणा गोचर होणार, तो गेला म्हणजे तिचा शिरजोरपणाही जाणार. अशा वैयक्तिक सत्तेच्या पायावर कालप्रवर्तकाची इमारत उठू शकत नाही. शककर्तृत्वाच्या इमारतीला राष्ट्रत्वाचा भक्कम पायाच लागतो. शहाजीच्या काळी महाराष्ट्र देशातील मराठा समाज राष्ट्र या पदवीला पोहोचला नव्हता, फक्त लोक ही पदवी त्याने आक्रमण केली होती. आपल्या देशाचा सर्व कारभार विशेषत: राजकीय कारभार आपण स्वत: करणार, ही भावना ज्या समाजातील बहुतम व्यक्तींच्या ठायी प्रादुर्भूत झाली व तत्प्रीत्यर्थ ज्या समाजातील लोक प्राणही खर्चिण्यास सिद्ध झाले तो समाज राष्ट्र या पदवीला पोहोचला म्हणजे राष्ट्र झाला. ही भावना समाजात जोपर्यंत उधृत झाली नाही तोपर्यंत समाज लोक ह्या पदवीतच असू शकतो. त्या लोकात एक धर्म, एक भाषा, एक आचारविचार, एक वंश, एक धर्म व एक कायदा इतकी सारी सामान्य बंधने यद्यपि विद्यमान असली आणि राजकीय कारभार स्वत: करण्याची म्हणजे राज्य करण्याची ऊर्फ स्वराज्य करण्याची उत्कट इच्छा नसली, तर त्या लोकांना राष्ट्र म्हणता येत नाही. शहाजीकाली महाराष्ट्रातील मराठ्या लोकात ही राजकीय भावना फारच थोड्या इसमांच्या ठायी उद्भवली होती. असेही म्हटले असता अतिशयोक्त होणार नाही की राज्य करण्याची प्रबळ इच्छा व तत्प्रीत्यर्थ प्राणही वेचण्याची तयारी फक्त एकट्या शहाजीच्या व त्याच्या काही ब्राह्मण मुत्सद्यांच्या ठायी प्रज्वलित झाली होती म्हणून तर चार यवनी पातशहांशी चाळीस वर्षे झगडत झगडत शेवटी त्याने लंगडेपांगळे का होईना पण स्वराज्य पैदा करण्याचे वीरकृत्य स्वत: व्यक्तिमात्रापुरते मूर्त करून दाखविले. ह्या वीरवृत्तीचे मराठा समाजात अनुकरण होऊन, शिवाजीच्या काळी त्या समाजातील बहुतम लोकांनी स्वराज्य करण्याच्या प्रखर उत्कंठेने प्रेरित होऊन राष्ट्र ही उच्च पदवी प्राण खर्चून पैदा केली. त्या अद्भुत कथानकाचा प्रांत शककर्त्या श्रीशिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतील पडल्यामुळे, तत्संबंध विवेचनास प्रस्तुत स्थळी जागा देणे न्याय्य होणार नाही.