प्रस्तावना

६०. येथपर्यंत शहाजीच्या चरित्राचा जो त्रोटक तपशील दिला आणि त्याच्या धोरणाचे व इतिकर्तव्यतेचे जे अल्प विवेचन केले त्यात स्पष्टपणे आपल्या नजरेस आले की स्वराज्य ह्न मग ते स्वतंत्र असो, प्रच्छन्न असो किंवा मांडलिकी असो, स्थापन करण्यात शहाजीची तारुण्यापासून वृद्धापकाळापर्यंतची पंचेचाळीस वर्षे गेली आणि शेवटी मांडलिकी स्वराज्य स्थापण्यात त्याला यश आले. हे मांडलिकत्व यद्यपि नावाचेच होते, तत्रापि ते मांडलिकत्व होते यात वाद नव्हता. आता शहाजी बड्या सैन्याचा धनी पडल्या कारणाने वरिष्ठ धनी जो आदिलशहा तोच उलटा त्याला वचकून असे हे खरे. त्यामुळे शहाजीची आपल्या राज्यावरील सत्ता पूर्णपणे अनियंत्रित होती, असे म्हणणे वस्तुस्थितीपासून फारसे दूर नव्हते. शहाजीवर काय थोडासा वचक बसावयाचा तो त्याच्या मुत्सद्यांचा व वरिष्ठ मराठा सरदारांचा. ह्याखेरीज परदेशी कर्नाटकी प्रजेतून कोणाचाही दाब त्याच्यावर असणे शक्य नव्हते. मुत्सद्दी व सरदार यांचे काम राजा बोलावील तेव्हा सल्लामसलत सांगण्याचे. अमुकच केले पाहिजे आणि तमुक केले नच पाहिजे, असे सांगण्याचा हक्क या सरदारांना किंवा मुत्सद्यांना मुळीच नव्हता. तात्पर्य, शहाजीचे कर्नाटकातील राज्य पूर्णपणे अनियंत्रित होते. तत्रापि जमीनमहसुलाच्या व न्यायमनसुबीच्या पुणे प्रांतातील जुनाट पद्धती शहाजीने कर्नाटकात इतक्या नामी बसवून दिल्या की सर्व प्रजाजन त्याचा दुवा गाऊ लागले. परंतु सर्वांत ज्या कृत्याने शहाजी कर्नाटकात अत्यंत प्रिय झाला ते हे की तो राज्य करू लागल्यापासून मुसलमानांच्या हातून देवालये छिन्नभिन्न होण्याची, बायकांवर जुलूम जबरदस्ती गुदरण्याची, शेटसावकारांपासून पैसा उकळला जाण्याची व शेतक-यांचे सर्वस्व नागविण्याची पीडा कर्नाटकातून कायमची बाद झाली. आदिलशहा, कुतुबशहा किंवा मोंगल यांचे मुखावलोकनही घेण्याची कर्नाटकातील हिंदूंना व इतर जातींना इच्छा राहिली नाही. देशाला असा सुरक्षितपणा आल्या कारणाने, शहाजीच्या कर्नाटकातील राज्यासंबंधाने भरतखंडातील सुज्ञ व कळकळीच्या विचारी हिंदूंना सानंद अभिमान वाटू लागला. वैदिक, पंडित, शास्त्री, मल्ल, गायक, कवी, साधू, संत, शैव, वैष्णव, रामानुज असे गुणीजन व भिन्नपंथीय लोक शहाजीच्या दर्शनास येऊ लागले. भाट, चारण इत्यादी बंदीजन देशोदेशी शहाजीची कवने व पवाडे गाऊन, एक नवीन हिंदूराज्य दक्षिणेत नुकतेच स्थापन झाले आहे व ते स्थापन करणारा महाराज शहाजीराजा भोसला या नावाचा वीर पुरुष दक्षिणेत अवतरला आहे, अशी आख्या चोहोकडे पसरवीत. जयराम कवीने तर युधिष्ठिर, विक्रम व शालिवाहन हे शककर्ते शहाजीशी तुलण्याला योग्य नाहीत असा आपला अभिप्राय दिला आहे. शक १२०० पासून शक १५०० पर्यंतच्या तीनशे वर्षांत शहाजीएवढा थोर हिंदू राज्यकर्ता दुसरा कोणी झाला नाही, ही बाब लक्षात घेता, जयरामकवीची ही उक्ती सार्थ नव्हती असे कोण म्हणेल? जयरामकवीच्या लिहिण्यातील एका शब्दाच्या चमत्कारिक उपयोगासंबंधाने किंचित टीका करणे येथे योग्य दिसते. शक हा तो टीकेचा शब्द होय. युधिष्ठिर, विक्रम व शालिवाहन यांना जयराम शक म्हणतो.

युधिष्ठिर विक्रम शालिवाहन शक ।
त्याहूनि महाराजा कीर्तिनें अधिक॥

ह्या ओव्यर्धात, तसेच

अवतार तू शाह तुझा महिमा शक हो असके न सकेत करूं।

ह्या चरणात जयराम युधिष्ठिर, विक्रम व शालिवाहन यांना शक म्हणतो. येथे शक ह्या शब्दाचा अर्थ काय? शक म्हणजे अहिंदू जे हूणादि शक लोक ते जयरामाला विवक्षित नव्हते हे सांगावयाला नकोच. मग हे तीन शककर्ते शक कसे? असे दिसते की शक् ऐश्वर्ये या धातूला अ प्रत्यय लागून शक हा शब्द बनलेला आहे. शक् पासून जसा शक्र शब्द कर्तृवाचक निघतो तसा च शक् पासून शक शब्द जयरामाने कर्तृवाचक बनविला. शक्र ह्याचा विशिष्ट अर्थ यद्यपि इंद्र असा आहे, तत्रापि सामान्य अर्थ ईश्वर, राजा, समर्थ, अंमल गाजविणारा असा आहे. तोच अर्थ शक ह्या शब्दाचा आहे. शक म्हणजे समर्थ, ऐश्वर्यवान व कालप्रवर्तक राजा. ह्या अर्थाने युधिष्ठिर, विक्रम व शालिवाहन यांना जयराम शक हे विशेषण लावितो ते ठीक दिसते. जयरामाचा हा जर अभिप्राय सर्वत्र संमत झाला, तर पुराणेतिहासातील एक गूढ कायमचे उकलले गेले असा अर्थ होईल. कालप्रवर्तक राजा ह्या अर्थाचा शक शब्द आणि अहिंदू अशा एका म्लेंच्छ जातीचा वाचक शक शब्द उच्चारात सारखे असल्यामुळे, शालिवाहन शक ह्या सामासिक शब्दाचा अर्थ करताना अनेक संशोधक बुचकळ्यात पडत आलेले आहेत. शकनृपकाल, शककाल, शके, शाके इत्यादी शब्दात म्लेंच्छ जे शकलोक त्यांच्या राजांचा काहीतरी संबंध असावा, असा साहजिक तर्क करून, कितीतरी पुराणेतिहाससंशोधकांनी शककालाचा प्रारंभ म्लेंच्छ जे शकलोक त्यांच्या एखाद्या राजाच्या राज्यारंभाशी जोडण्याचा खटाटोप केला आहे. परंतु ह्या सर्व खटाटोपात एक अशी गोम राही की हिंदू लोक आपल्या धर्मकृत्यात अहिंदू अतएव धर्मबाह्य कालगणनेचा उपयोग कालत्रयीही करणार नाहीत. तोच जयरामकवीचा शक शब्दाचा अर्थ घेतला म्हणजे सर्वच अडचणी दूर होतात. कालप्रवर्तक म्हणून शालिवाहनाला शक म्हणत व त्याने प्रचलित केलेल्या कालाला शालिवाहन शक म्हणत. शक् धातूला अ प्रत्यय लागून क्रियार्थक शक शब्द बनतो. क्रियार्थक शक शब्दाचा अर्थ सत्ता, अधिकार, अंमल; आणि या अर्थाने शक हा शब्द मराठीत अद्याप सर्रास योजिला जातो. शिवाय, युधिष्ठिर शक, विक्रम शक हे किंवा इत्यादी प्रयोग शक शब्दाचा सत्ता, अंमल हा अर्थ घेतला म्हणजे अदुष्ट ठरतात व शक शब्द युधिष्ठिर, विक्रम, शिव, शिलाहार इत्यादी नामांपुढे लागला असता त्यात कोणतेही वैपरीत्य भासत नाही.