प्रस्तावना
५९. प्रोफेसर सरकार यांनी शिवाजीवर हा जो जादूगारीचा व मंत्रसामर्थ्याचा गर्भित आरोप नकळत आणिलेला आम्हास दिसला, तसला आरोप चुकूनही शहाजीवर आजपर्यंत कुणी केलेला नाही व पुढे करणार नाही. शहाजी आपली कुलदेवता अंबाबाई व कुलदेव शिखरशिंगणापूरचा महादेव यांचे स्मरण संकटसमयी करीत असे. परंतु शिवाजीप्राणे अंबाबाई किंवा शंभुहादेव त्याच्या अंगात येऊन त्याच्या तोंडून भविष्यवाणी कधी वदवीत नसे. बापलेकात महदंतर जे होते ते हेच होते. आपल्याला अंबाबाई व शंभुहादेव प्रसन्न आहे व त्यांच्या वरदहस्ताने स्वधर्म रक्षिण्यासाठी स्वराज्यस्थापना आपणास अवश्य कर्तव्य आहे, ही शिवाजीची भाषा शहाजीच्या तोंडून कधी निघाली नाही. हे मंत्रसामर्थ्य शिवाजीसारख्या राष्ट्ररचना करणा-या जादूगाराच्या ठायीच संभाव्य होते. महाराष्ट्रातील देवभोळ्या लोकांना अत्यंत प्रिय जी शंकरपार्वती तीच मुळी शिवाजीच्या अंगात संचार करून दुष्टांचा संहार व साधूंचे रक्षण करू लागल्यावर सामान्य जन शिवाचा अवतार जो शिवाजी त्याचे शुभचिंतन व समनुयान करणे आपले कर्तव्य समजू लागल्यास आश्चर्य नाही. मुसलमानांवर पातशाहत करू पाहणा-या नेपोलियनने आपण इस्लामचे कट्टे अनुयायी आहो ही भाषा सुरू केली आणि तसा प्रसंगच येता तर त्याने एखादे नवीन कुराणही रचिले किंवा रचविले असते. तोच प्रकार शिवाजीचा होता. हे अतिमानुष लोक सामान्य देवधर्माच्या वरचे होत. अंबाबाईच काय, कोणतेही दैवत शिवाजीच्या तोंडून भविष्य बोलण्यात अभिमान मानते. ही देवांचेही आधिपत्य करण्याची शिवाजीची किंवा नेपोलियनची पायरी शहाजीसारख्या व्यावहारिकांना शक्य नव्हती. काळ वेळ प्रसंग पाहून चार लोकात गोड दिसून आपले कार्य बाताबेताने परंतु निखालस सिद्धीस जेणेकरून जाईल तो सर्वमान्य रस्ता चोखळणा-या उत्तम पुरुषांपैकी शहाजी हा ब-याच वरच्या कोटीतील पुरुष होता.