प्रस्तावना

५८. शहाजीच्या चरित्रातील मुख्य धोरण काय होते, तो आपली इतिकर्तव्यता काय मानीत होता, धोरण अमलात आणण्यास त्याने कोणती साधने निर्माण केली व त्याच्या काळी महाराष्ट्राची, भारतवर्षाची, युरोपची, मुसलमान समाजाची व त्याची स्वत:ची मनोरचना व विकृतिसंस्कृती कोणत्या स्वरूपाची होती इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा खल झाल्यावर, आता चटणीकोशिंबिरी दाखल एका लहानशा बाबीचे मनोरंजनार्थ किंचित पेषण करू. पंधरा वीस हजार फौजेचा मालक असताना ज्याने निजामशाही पुनरुज्जीवित केली, ज्याला गप्प बसविण्याचे शहाजहानचे सर्व प्रयत्न फोल ठरले, साठ सत्तर हजार फौज चालवून ज्याने मीर जुमल्यासारखा रूमशामपर्यंत गाजणारा जवाहि-या सरदार सश्याप्रमाणे गुत्तीत पकडला, ज्याच्या दरा-या खातर औरंगजेबाचे आदिलशाही खालसा करण्याचे विचार लांबणीवर पडले, ज्याचे गणगोत व शरीरसंबंध जाधवराव, निंबाळकर, मोहिते इत्यादी मोठमोठ्या मराठा घराण्यांशी पिढ्यान् पिढ्या होत आलेले, त्या शहाजी महाराज्यांच्या दिगंत कीर्ति लेकाला आमचे बंगाली व्यवसायबंधू जदुनाथ सरकार obscure, of no high family influence व of very small means म्हणून लिहिण्याच्या झोकात सहज शिफारसपत्र देतात आणि चार ओळी लिहून संपल्या नाहीत तोच ह्या क्षुद्र व तुटपुंज्या माणसाने गडापाठीमागून गड हबकण्याचा सपाटा लाविला म्हणून तक्रार करतात! दरिद्री व तुटपुंजा इसम फार तर पैशा अधेल्याची चोरी करील; पण किल्ल्यापाठी किल्ला खिशात कसा घालील, ते सांगण्यास खरोखरच बंगाली जादूगारच हवा होता! कदाचित दरिद्री व तुटपुंज्या शिवाजीने हे किल्ल्यावर किल्ले पटकाविण्याचे अजब कृत्य मंत्रसामर्थ्याच्या जोरावर केले असावे, असा जदुनाथांचा गर्भित आशय असल्यास, शिवाजीच्या जादूगारी संबंधाचा हा नवीन शोध लाविल्याबद्दल प्रोफेसर सरकार यांचे आम्ही आनंदाने व खुल्या दिलाने अभिनंदन करण्यात सौख्य मानितो आणि मुसलमान तवारीखकारांचे एकनिष्ठ फोनो बनण्यात प्रावीण्य दाखविल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात दंग होतो