प्रस्तावना
५७. येथे असा अचंबा उद्भवण्यासारखा आहे की, इराणपासून आसामपर्यंत व पूर्व समुद्रापासून पश्चिम समुद्रापर्यंत ज्याची अमर्याद सत्ता त्या दिल्लीच्या मोंगल पातशहाला किंवा दक्षिणेतील शहांना शहाजी व शिवाजी यांना अथवा व्यक्तिनामे टाकून बोलले तर, मराठ्यांना चिरडून टाकता कशी आली नाही? ह्या प्रश्नाला उत्तर द्यावयाचे म्हणजे तत्कालीन ऊर्फ तद्युगीन सार्वजनिक मानवी हालचालींकडे व संस्कृतिप्रवाहाकडे नजर फेकिली पाहिजे. पहिली व सर्वांत मुख्य अशी एकच एक बाब एतत्संबंधक म्हटली पाहिजे ही की, ह्या काली इस्लामी विकृती म्हणून जिला म्हणता येईल तिचे पृथ्वीतलावरील कार्य संपून तिची शक १४०० पासून शक १५०० पर्यंतची शंभर वर्षे एका प्रचंड संस्कृतिप्रवाहाच्या रेट्यापुढे सारखी पिछेहाट होत चालली होती. हा प्रचंड संस्कृतिप्रवाह म्हणजे ज्याला आधुनिक भौतिकशास्त्रीय संस्कृती म्हणतात तो. ह्या शास्त्रीय संस्कृतिप्रवाहाने एकट्या इस्लामी संस्कृतीलाच तेवढे क्षीण केले असे नाही. ह्या प्रवाहाने ख्रिस्ती विकृतीलाही दुर्बल करून सोडिले. ही संस्कृती कालांतराने हिंदू विकृतीला व बौद्ध विकृतीलाही मुरगाळून टाकणार होती. अशा ह्या अजिंक्य व त्रिभुवनविजयी व कालत्रयव्यापक सनातन भौतिक शास्त्रीय संकृतीच्या धगधगीत तेजापुढे जुनाट मध्ययुगीन व रानटी इस्लामी विकृती शक १४०० पासून क्षय पावत पावत शक १५५० च्या सुमारास अतिच क्षीण झाली. तिला पहिला धक्का स्पेनमध्ये बसला, दुसरा धक्का पोलंडमध्ये मिळाला आणि तिसरी गचांडी अरबी समुद्रात, बंगाली समुद्रात व पॅसिफिक समुद्रात दिली गेली. मुस्लीम विकृतीला लत्ताप्रहार करणारी ही तीन राष्ट्रे म्हणजे स्पेन, पोलंड व पोर्तुगाल ही होत. पहिल्या धक्क्याने इस्लामाची भूमध्यसमुद्रातून उचलबांगडी झाली, दुस-या धक्क्याने इस्लामाला पश्चिम युरोप बंद झाले आणि तिस-या धक्क्याने आफ्रिकेच्या पूर्वेकडील सर्व समुद्रांना इस्लाम कायमचे मुकले. इस्लामला हे प्राणघेणे धक्के देणारी तिन्ही राष्ट्रे ख्रिस्ती विकृतीने पछाडिलेली होती. परंतु ती ख्रिस्ती होती म्हणून त्यांनी इस्लामचा पराभव केला असे मात्र समजावयाचे नाही. त्यांच्या जयाचे मुख्य कारण त्यांच्या नव्या जोमाने उत्पन्न झालेली भौतिक शास्त्रीय संस्कृती होय. ही भौतिक शास्त्रीय संस्कृती त्यांच्यात उत्पन्न होण्याच्या अगोदर तीन चारशे वर्षे युरोपातील सर्व ख्रिस्ती राष्ट्रांनी पालस्टैन घेण्याकरिता इस्लामाशी झुंजण्यात जंगजंग पछाडले, पण इस्लामाचे त्यांच्याच्याने अणुमात्रही वाकडे झाले नाही. परंतु भौतिक शास्त्रीय संस्कृतीचा पाठिंबा मिळताच, आगीपुढे लोणी जसे वितळावे, तसा इस्लाम शास्त्रसंस्कृत युरोपाच्या पुढे केवळ विरघळत गेला आणि ख्रिस्ती राष्ट्रांच्या अन्योन्य मत्सराची थोडीफार थंडाई मिळून आस्ते आस्ते विरघळता विरघळता आता गेल्या दोन वर्षांपाठीमागे म्हणजे शक १८४० त केवळ नामशेष राहिला. हा सर्व प्रभाव भौतिक शास्त्रीय संस्कृतीचा होय. अरबी समुद्रात इस्लामला जो धक्का बसला त्याचा परिणाम असा झाला की हबस, श्यामळ, अरबस्थान, इराणी आखात, काठेवाड, गुजराथ व कोंकण ह्या प्रदेशांच्या किना-याने हबशी, श्यामळ, अरबस्थानी, इराणी, मोंगल, निजामशाही व आदिलशाही मुसलमान व्यापा-यांच्या हालचाली संपुष्टात आल्या आणि हबस, श्यामळ, अरबस्थान व इराण ह्या देशांतून आदिलशहा व निजामशहा यांच्या सैन्यात व लढाऊ व कारकुनी पेशाच्या मुसलमान लोकांचा भरणा उत्तरोत्तर कमी होत गेला. त्यामुळे देशातील मराठा शिपायांचा व सरदारांचा व ब्राह्मणांचा पाठिंबा मिळविणे या दोन्ही शहांना अपरिहार्य झाले.