प्रस्तावना

५६. प्रकट स्वराज्य, प्रछन्न स्वराज्य, मांडिलिकी स्वराज्य व स्वतंत्र स्वराज्य म्हणजे स्वत:चे व्यक्तिमात्राचे राज्य स्थापिण्याचे उत्तरोत्तर प्रयत्न करणे ही शहाजीची इतिकर्तव्यता होती. ही इतिकर्तव्यता अथपासून इतिपर्यंत विकास पावत असता, शत्रू, मित्र व उदासीन यांच्याशी प्रसंगाला अनुकूल दिसेल ते शत्रुत्वाचे, मित्रत्वाचे किंवा उदासीनतेचे वर्तन ठेवणे, हे शहाजीचे धरसोडीचे धोरण होते आणि हे धोरण अमलात आणण्याकरिता करोल सैन्य व सामुग्री ह्यांच्या साह्याने त्याने स्वत:चा पक्ष निर्मून साधनसंपत्तीची जोड केली होती. शहाजीच्या इतिकर्तव्यतेची ही अशी मीमांसा आहे. ह्या इतिकर्तव्याचे तत्कालीन हिंदुस्थानच्या इतिहासात कार्य काय त्याचा आता निर्णय करू. शहाजीच्या हयातीत हिंदुस्थानात एकंदर पाच स्वतंत्र मुसलमानी राज्ये होती, १) दिल्लीची मोंगलाई, २) दौलताबादची निजामशाही, ३) विजापूरची आदिलशाही, ४) गोवळकोंड्याची कुतुबशाही व ५) बेदरची क्षुद्र बेरीदशाही. ह्या पाच मुसुलमानी शाह्यांनी तुंगभद्रेच्या तीरापासून हिमालयापर्यंतचा व आसामपासून इराणपर्यंतचा सर्व टापू आक्रमिला होता. तुंगभद्रेच्या दक्षिणेस कर्नाटकात काही क्षुद्र हिंदू पाळेगार तेवढे थोडेबहुत स्वतंत्र राहिले होते. त्यांचे स्वातंत्र्य निजामशहाने हरण करावे की आदिलशहाने हरण करावे की कुतुबशहाने हरण करावे की दिल्लीवाल्याने हरण करावे, एवढाच काय तो मत्सराचा प्रश्न घुटमळत राहिला होता. बाकीचे सर्व भरतखंड यवनांच्या कब्जात जाऊन, हिंदुत्वाच्या हयातीचे माप भरत आले होते. सहाशे वर्षे झगडता झगडता इस्लामाच्या हातून आर्यसंस्कृतीचा पाडाव आणीक पाचपन्नास वर्षांत परिपूर्ण झाला असता. ह्या पाच पातशाह्या अन्योन्य मत्सराने एकमेकांचे बल क्षीण न करता आणि स्नेहवृद्धीचे तह करून इस्लामी संस्कृतीचा विजय करणे हे एकच धोरण अक्षत पाळत्या तर हिंदुसंस्कृती पृथ्वीतलावरून उछिन्न होऊन गतेतिहासाचा करुण विषय झाली असती. इस्लामी धर्माचा प्रसार करण्याची प्रतिज्ञा प्रत्येक पातशहा करी; परंतु ती दुस-याच्या हातून सफल न होता आपल्या हातून व्हावी अशा अभिमानाने एक दक्षिणीशहा दुस-या दक्षिणी शहाच्या उरावर बसे. दक्षिणी सर्व शहा शियापंथी पडल्यामुळे उत्तरेकडील सुनी मोंगल त्यांना धर्मभ्रष्ट समजत व हिंदूंप्रमाणेच त्यांचाही उच्छेद करण्याचा पैगाम बांधीत. अशी दुफळी नव्हे, त्रिफळी नव्हे, पंचफळी मुसलमान पातशाह्यांध्ये होती. तीही झाली, तत्रापि देखील मुसलमान पातशहा एका बाबीची खबरदारी घेते तर हिंदू संस्कृतीचा त्यांच्या हातून नायनाट झाला असता. पंचफळीमुळे फार झाले तर पाच शाह्यांतून कोणत्या तरी एका शाहीच्या हातात सर्व राज्यसत्ता जाती व त्या सार्वभौ यावनी राजसत्तेच्या द्वारा आर्यसंस्कृतीचा परिपूर्ण नाश होता. फक्त एका बाबीकडे त्यांनी बिलकूल दुर्लक्ष करता कामा नव्हते. ती बाब ही की, त्यांनी कोणाही हिंदूधर्मी लढवय्याला मनसबदारी किंवा सरदारी देऊन प्रबळ बनू द्यावयाचे नव्हते. हे अनुभवसिद्ध सामान्य धोरण त्या काळी मुसलमान पातशहांना माहीत नव्हते असेही म्हणता येणार नाही. शहाजहान व औरंगजेब यांच्या तर ते मुखोद्गत होते. दक्षिणेतील शहांनाही ते अवगत होते. परंतु कोणतेही धार्मिक, वैय्यापारिक किंवा राजकीय धोरण कितीही महत्त्वाचे असले तत्रापि ते स्वसंरक्षणाच्या व खास बचावाच्या धोरणापुढे फिके पडते. अकबराने जेव्हा निजामशाही घशाखाली उतरविण्याचा घाट घातला व निजामशाहीतील दक्षिणी व परदेशी मुसलमानांचे दोन्ही पक्ष शहाच्या खांद्यावर कुरघोडी करू लागले, तेव्हा निजामशहाने मालोजी भोसले या लढवय्याला मनसबदारी देऊन स्वसंरक्षणार्थ विश्वासूक असा मराठ्यांचा तिसरा पक्ष निर्माण केला. प्रथम मालोजीची मनसबदारी पंचहजारी अशी बेताचीच होती. परंतु धन्याचा विश्वास बसत बसत व लढाईच्या निमित्ताने वाढत वाढत, शहाजीच्या हाताखाली ती मनसबदारी एखाद्या शहाला शोभेल अशी तोलदार फौज बाळगणारी झाली. असल्या मनसबदारीला कह्यात ठेवणे मोठे जिवावरचे, नाजूक व संकटाचे काम असते. सुखविली तर ती आयतीच अलगज प्रेमाने उरावर बसते आणि दुखविली तर रागावून प्राण घेते. सनातनधर्मी प्रबळ मनसबदार जो शहाजी त्याला मलिकंबर व मूर्तिजाशहा ह्यांनी ज्या दिवशी दुखविले त्या दिवशी हिंदुस्थानात सहाशे वर्षे बांधीत आणिलेल्या इस्लामच्या तटात पहिले भगदाड पडले आणि सनातन संस्कृतीवरील इस्लामच्या मगरमिठीतील पहिली गाठ मोकळी झाली. शहाजी संतापून निजामशाहीतून निघून गेल्यावर मलिकंबराला मूर्तिजाने ठार केले, मूर्तिजाला फतेखानाने मारिले व फतेखानाला शहाजीने पकडिले. बेगमेने शहाजीचे साह्य घेताच निजामशाहीला पुन: जीव आला आणि तिला शहाजीला सोडताच निजामशाहीचा कायमचा अंत झाला. शहाजहानलाही ह्यावेळी शहाजीच्या प्राबल्याचा व करामतीचा अनुभव आला. शक १५५८ तील मोहीम पावसाळ्याच्या आत खलास करण्याचे शहाजहानचे सर्व अंदाज शहाजीने हुकविले आणि शहाजी म्हणेल त्या अटीवर मोहीम कशीतरी शहाजहानास संपवावी लागली. ह्यापुढे शहाजीच्या वाटेस शहाजहान कधी गेला नाही. आदिलशाहीत गेल्यावर शहाजीने कर्नाटक कसे सर केले, शहाजीला अटक केल्यामुळे कर्नाटकात व पुणे प्रांतात कसा धुमाकूळ उडाला, सुटल्यावर औरंगजेबाचा हस्तक व कुतुबशहाचा प्रधान जो मीरजुमला त्याला शहाजीने कसा बेदम बडविला, बंगळुरास स्वराज्यस्थापन शहाजीने कसे केले आणि पुणेप्रांतात स्वराज्यस्थापन शिवाजीकडून कसे करविले, वगैरे कथानक मागे सविस्तर वर्णिले आहेच. तात्पर्य, एक हिंदुस्थानी प्रबळ मनसबदार बनू देण्याच्या एका चुकीचा हा सर्व परिणाम झाला. त्या एका चुकीने नुसती निजामशाहीच खाल्ली नाही तर कुतुबशाही खाकेत मारिली, आदिलशाहीचे लचके तोडिले, बेरीदशाहीचा चकनाचूक होऊ दिला आणि शेवटी दिल्लीची मोंगलाई रसातळास पोहोचविली. औरंगजेबाने शिवाजीस निसटून जाऊ देण्याची एक चुकी केली, तर त्याला सव्वीस वर्षे दक्षिणेत वनवास भोगावा लागून शेवटी हताश मरावे लागले. शहाजीला मनसबदारी देण्याच्या एका चुकीने त्याहूनही घोर धक्का इस्लामला बसला. इस्लामी राज्यसत्ता हिंदुस्थानातून कायमची बाद होण्याचा मार्ग खुला झाला. हिंदुस्थानच्या तत्कालीन राजकारणात शहाजीच्या इतिकर्तव्यतेचे कार्य हे असल्या स्वरूपाचे म्हणजे यवनांची सत्ता खिळखिळी करून मोडण्याच्या पंथास लावण्याचे होते. थोडक्यात सांगावयाचे म्हटले तर शहाजी ह्या वेळी हिंदुत्वाचा विजयी वाली बनला होता.