प्रस्तावना
५३. हा एक सर्वसामान्य दोष सोडला तर दुसरा कोणताही मूढ दोष शहाजीच्या चरित्रात दिसून येत नाही. पक्ष, सैन्य, हत्यार ही तीन साधने जुळविण्यात शहाजीने जशी मेहनत घेतली तशीच मुख्य धनी जो बु-हाणशहा त्याची मर्जी संपादण्यातही शहाजीने बहुत चातुर्य दाखविले. मलिकंबर, फतेखान, जाधवराव इत्यादी सा-यांना मागे सारून बु-हाण निजामशाहाच्या गळ्यातील केवळ ताईत शहाजी झाला. त्यामुळे आपले राज्यस्थापनेच्या हेतूची सिद्धता करण्याचे त्याचे काम बरेच सुकर झाले. दुस-याच्या मनात शिरून त्याला आपला करण्याची करामत शहाजीच्या इतकी तत्कालीन ऐतिहासिक व्यक्तीत फारच थोड्यांच्या ठायी आढळण्यात येते.
५४. शहाजीचे उत्तरचरित्र म्हणजे शक १५६२ पासून शक १५८५ पर्यंतच्या तेवीस वर्षांतील चरित्र शिवाजीच्या तत्कालीन चरित्राशी समांतर आहे, इतकेच नव्हे तर शिवाजीच्या चरित्राचे प्रोत्साहक आहे. शहाजी, दादाजी कोंडदेव, हणमंते, पिंगळे, अत्रे, पानसंबळ, जिजाबाई इत्यादींनी शिवाजीच्या चरित्राला स्वतंत्रस्वराज्योन्मुख वळण देण्याची शिस्त कधी बांधून दिली ते शहाजीच्या चरित्रातील उत्तरकालीन खटपटीवरून स्पष्टपणे नजरेस येते. तेव्हा आता असा प्रश्न येतो की, शहाजी वगैरेंनी जर शिवाजीचा स्वतंत्र स्वराज्य आक्रमिण्याचा मार्ग आखून ठेविलेला होता, तर रामदासाचा शिवाजीच्या चरित्रावर कोणता परिणाम घडला? अथवा हाच प्रश्न दुस-या त-हेने असा विचारिता येतो की, महाराष्ट्र राज्य संस्थापनेत रामदासाचे कार्य काय? ह्या प्रश्नाचे उत्तर देताना, दुसरा एक प्रश्न विचारात घेतला असता, प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम साधे होते. दुसरा प्रश्न असा ह्न रामदास झाला नसता, तर स्वराज्यस्थापनेच्या कार्यात काय व्यंग राहिले असते? कारण रामदास झाला असता किंवा झाला नसता, तत्रापि शहाजीने योजिल्याप्रमाणे शिवाजीने स्वतंत्र स्वराज्य स्थापिलेच होते व स्थापिलेच असते. रामदासाच्या शिकवणीने शिवाजीच्या स्वराज्यसंस्थापनेच्या रूपात असा कोणता स्पृहणीय फरक पडला की ज्यामुळे शिवाजीने व शिवोत्तर मराठ्यांनी रामदासाचे सदा ऋणी रहावे? शहाजीने गोब्राह्मणप्रतिपाल, वैदिक संस्कृतीचे संगोपन, संस्कृत-मराठी हिंदी वगैरे भाषांचे संवर्धन, देवालयादींचा जीर्णोद्धार वगैरे हिंदू संस्कृतीची प्रोत्साहक कृत्ये थोडीफार, परिस्थितीला सांभाळून, आरंभिलीच होती. ती शिवाजीने रामदास नसता तरी, जास्त प्रमाणावर चालविली असती ह्यात बिलकुल संशय नाही. सध्या देखील शिवाजीचा मोठेपणा गाताना ह्याच कृत्यांचा प्रामुख्याने आपण उल्लेख करतो की नाही? मग ह्याहून आणिक कोणते महत्कृत्य शिवाजीकडून रामदासाने करवून घेतले? असा आक्षेप प्रस्तुत प्रकरणी घेता येतो. ह्या आक्षेपाला उत्तर असे आहे की, शहाजीला जे करता आले नाही, असे एक कृत्य करण्याचा सल्ला रामदासाने शिवाजीला दिला आणि तसला सल्ला रामदासापर्यंत दुस-या कोणीही शहाजीला किंवा शिवाजीला दिला नाही. आजपर्यंत शहाजीच्या कारकीर्दीत काय होत असे की, देशातील मराठ्यांची बहुतम संख्या यवनादींची सेवा करण्यात पाप मानावयाच्या ऐवजी प्राय: भूषणच मानीत असे. तो देशघातक व राष्ट्रघातक ओघ बदलून, देशातील सर्व मराठा असेल नसेल तेवढा एका ठायी म्हणजे स्वराज्याच्या ठायी मेळवावा, हा उच्चतम राष्ट्रीकरणाचा सल्ला रामदासाने शिवाजीस दिला. शहाजीच्या सैन्यात मराठा, पुरभय्या, पंजाबी, हिंदू, मुसलमान, बेरड वगैरे सर्व जातीचे लोक व सरदार असत व सर्व जातीचे लोक ठेविल्याशिवाय शहाजीला परिस्थितीमुळे गत्यंतरही नव्हते. शिवाजीला रामदासाने एकजात मराठे सरदार व शिपाई ठेवण्याचा सल्ला दिला. तो अशाकरिता दिला की स्वराज्य आपले आहे व तत्प्रीत्यर्थ जीव खर्ची घातला असता महाराष्ट्रधर्म टिकावयाचा आहे, अशी बुद्धी बाळगिण्यात प्रत्येक मराठ्याला अभिमान वाटावा.