प्रस्तावना
५१. हत्यार चोख पाहिजे आणि ते प्रतिपक्षाच्या हत्याराहून श्रेष्ठतर पाहिजे, ह्या बाबीची जाणीव शहाजीच्या ठायी स्वकालीन अनुभवाने अत्युत्कट बाणलेली होती. पूर्वेतिहासही त्याला तेच शिकवीत होता. कोणत्याही राष्ट्राच्या संस्कृतीचा श्रेष्ठकनिष्ठपणा त्या राष्ट्राच्या हत्याराच्या स्वरूपावरून ओळखता येतो. फार काय सांगावे, हत्यार हे राष्ट्राच्या एकंदर संस्कृतीचे मापक आहे. जशी ज्या राष्ट्राची संस्कृती तसे त्या राष्ट्राचे हत्यार. पशुपक्ष्यांची हत्यारे म्हणजे नांग्या, दात, नखे, खूर, सोंडा, शेपट्या, पिसे वगैरे त्यांचे अवयव होत. त्याहून उच्चतर कोटीतला वानर क्वचित धोंडे, फांद्या वगैरे सहजोपलब्ध बाह्य साधनांचा उपयोग करू शकतो. त्याहून श्रेष्ठ जो अर्धवट रानटी माणूस, तो गारेच्या बोथाट्या वगैरे ओबडधोबड दगडी हत्यारे घासून तयार करतो व प्रसंगी उपयोगी पडावी म्हणून संग्रही जमा करून ठेवितो आणि पशुपक्षादींचा संहार करतो. त्याच्याहून श्रेष्ठ पाह्यरीचा आर्य माणूस खाणी खणण्याचा व त्यातून तांबे, लोखंड वगैरे धातू काढण्याचा शोध लावितो व त्या धातूंचे भाले, बरच्या, तिरांचे फाळ, सु-या वगैरे धारेची दूरवर फेकता येण्याजोगी हत्यारे बनवितो व केवळ आंगलट करून झोंबाझोंबी किंवा मारामारी करणा-या अर्धरानटी समाजाला जिंकून गुलाम बनवितो. धनुर्धारी राम ह्या खनिकर्मकुशल आर्यांपैकी होता व तो आपल्या शेकडो लोखंडी बाणांनी एतद्देशज रानटी भिल्ल, गोंड, कातकरी, राक्षस वगैरे लोकांचा नायनाट करी व त्यांपैकी कित्येकांना क्षुद्र करून आपली काबाडकष्टाची कामे करवी. लोखंडी बाणाहूनही दूर पल्ल्याच्या हत्यारांचा म्हणजे दारूने उडणा-या वेळूच्या कांडांचा शोध लावणा-या आर्यांनी केवळ लोखंडी तीराने लढणा-या आर्यांचा पराभव करून आपले रसायनमिश्रणज्ञान जगाच्या अनुभवास आणिले. त्याही पुढे मजल मारून लोखंडी नळ्यात दारू भरून अर्ध्या पाव कोसावरून शत्रूचा पाडाव करणा-या मुसलमानांनी ख्रिस्ती, हिंदू वगैरे कनिष्ठ संस्कृतीच्या लोकांचा पराभव केला. पुढे युरोपियन लोकांनी नाना शास्त्रीय शोधांच्या द्वारा नेमके काम करणा-या व दूरवर पल्ल्यांच्या तोफा, बंदुका वगैरे संगीन हत्यारांच्या जोरावर मुसलमानांची युरोपातील स्पेन वगैरे देशातून हकालपट्टी केली व पृथ्वीवरील अमेरिका, आफ्रिका व हिंदुस्थान हे देश जिंकण्याची खात्रीपूर्वक हिंमत बांधिली. एवढी मोंगलांची अफाट व प्रबळ सत्ता, परंतु पोर्तुगीज चाच्यांनी कितीदा तरी त्यांची इज्जत घेतली. ह्याच काळी कुस्तुंतुनियाच्या तुर्कांनी व्हेनिशियन लोकांपासून श्रेष्ठ बंदुका व तोफा आणि दारूगोळा तयार करण्याची सर्वश्रेष्ठ कला अर्धीमुर्धी व उष्टीमाष्टी किंचित आपलीशी केली होती. त्या अर्धवट तुर्क कारागिरांना पदरी ठेवून, दिल्लीचा मोंगल व दक्षिणेतील शहा हत्यारे व दारूगोळा बनवून त्याच्या जोरावर देशातील अर्धवट सुधारलेल्या टाळकुट्या हिंदूंना व परस्परांना भिडवीत असत. हा सर्व चमत्कार शहाजी पहात होता. उत्तम कारीगार हत्यार कोठून पैदा होते व कोण आणून देते ह्याचा अनुभव जुन्नरच्या घाटाखालील कोकणात त्याला आला होता. दमण, दीव, वसई, गोवा, सुरत, तेलीचेरी इत्यादी स्थलींच्या टोपीवाल्यांकडून कारागीर हत्यारे पैदा करून निजामशाही, आदिलशाही व मोंगलाई सैन्याहून शहाजी आपली फौज जास्त कर्तबगार ठेवू लागला. अशा त-हेने पक्ष, सैन्य व हत्यार शहाजीने निर्माण केले आणि त्यांच्या जोरावर प्रकट स्वराज्य, प्रछन्न स्वराज्य, मांडलिकी स्वराज्य व निर्भेळ स्वतंत्र स्वराज्य उत्तरोत्तर स्थापित असता, वेळोवेळी येणा-या विपत्तीत दम न सोडता पूर्वीच्याहून जास्त हुरुपाने पुढील कर्तव्य तो बजावीत राहिला. सैन्य व हत्यार ह्यांच्यावरील त्याचा विश्वास मोठ्या विपत्तीतही कधी ओसरला नाही. शेवटी ह्या साधनांच्या जोरावर आपण विजयी होऊच होऊ अशी त्याची बालंबाल खात्री होती व परिणामावरून पहाता ही खात्री साधार होती. शहाजीच्या अलौकिक निर्धाराची व दमाची ही अशी मीमांसा आहे.