प्रस्तावना

५०. धोरण व इतिकर्तव्यता यांचा खुलासा झाल्यानंतर, ज्या साधनांच्या चाकांवर धोरण व इतिकर्तव्यता यांचा गाडा चालवणे शक्य होते व ज्या साधनांच्या अभावी मनातले थोर राजकीय विचार जागच्या जागी शुष्क होऊन जातात त्या साधनांची निर्मिती व जोपासना शहाजीने कशी केली तेही शोधणे क्रमप्राप्त होते. एवढे मोठे हजारोने मोजता येण्यासारखे प्रबल सैन्य शहाजीने कोठून आणिले आणि त्याला रोजमुरा कोठून दिला हा साधनसंबंधक पहिला प्रश्न आणि दोनतीन वेळा स्वराज्यसाधनिकेत फसला असता खचून न जाता उत्तरोत्तर ज्या नव्या दमाने शहाजी कामास लागलेला दिसतो तो दम त्याला कोठून पैदा झाला हा दुसरा प्रश्न. हे प्रश्न सोडविताना प्रथम लक्षात धरिले पाहिजे की, शहाजी हा प्राधान्ये करून व्यवहारचतुर मुत्सद्दी होता, केवळ कल्पनातरंगावर वाहवत जाणारा शेखमहंमद नव्हता. त्याच्या आधी व त्याच्या काळी राष्ट्र सुधारणेचे प्रयत्न करणारे शेख महंमद थोडेथोडके झाले नव्हते. कली मातला, सबब समाजाला दैन्य आले व ते भोगिल्याखेरीज गत्यंतर नाही, असे रडगाणे गाऊन स्वस्थ बसणारे ऐदी कितीतरी होते. विठोबा सर्व काही योग्य वेळी नीट करील, त्याला जनतेची काळजी आहे, असे समाधान करून घेणारे भक्तिमार्गी तर असंख्य होते. मुसलमानी पेहराव, मुसलमानी चालीरीति, मुसलमानी भाषा व मुसलमानी धर्म स्वीकारून समाजाच्या यातना बंद करू पाहणारे कितीतरी हिंदू प्रांतोप्रांती पीर होऊन बसले होते. यवनांवर रुसून, त्यांच्याशी व्यवहार बंद करून त्यांचे मुखावलोकन न करणारी दासोपंतादि मंडळीही आपल्याकडून यवनांच्या पारिपत्याचे प्रयत्न करीतच होती. यवनसेवा करून जनतेचा परामर्ष घेऊ पाहणारे दामाजीपंतही अनेक होऊन गेले. यवनांविरुद्ध बंड करून स्वराज्य मिळविणारेही काही वेडे निपजले. मंत्रतंत्रांनी यवनांना स्तंभित करण्याचा कित्येकांचा खटाटोप होता. यज्ञयागांचा व देवदेवालयांचा जीर्णोद्धार करून धर्मसंरक्षण करण्यात कित्येकांनी सर्वस्व खर्चिले. गोरक्षण करून प्रजेत जो उत्पन्न करू पाहणारे गोरखनाथीही देशात वावरत होते. कथाकीर्तने व रामायणभारते देशभाषेत बनवून देशातील लोकांच्या अंगी स्फुरण चढवू पाहणारे कीर्तनकार व ग्रंथकार तर त्या काळी शेकडोने मोजावे लागत. असे नाना प्रकारचे बरेबुरे उपाय जो तो आपापल्या परी करतच होता. परंतु असले हे सर्व उपाय तीनशे वर्षे करूनही यवनांचे काडीमात्र कोणी नुकसान करू शकले नाही. तेव्हा जो तो समाधान असे करून घेई की, बी रुजत घातले आहे, ते योग्य वेळी रुजून फळे आल्याशिवाय रहाणार नाहीत. ही भविष्यवादी विचारसरणी निरुत्तर करणारी असल्यामुळे, भविष्यकाळी तिची साफल्यता अनुभवयास यावयाची असल्यामुळे व भविष्यकाळाला अंत नसल्यामुळे ह्या आशेची निराशा तीनशे वर्षे निघून गेली तरीही कधीच झाली नाही. अशातला आशावादी शहाजी नव्हता. तो पक्के जाणत होता की, यवनांचे राज्य हे विधर्मी परदेशी अल्पसंख्यांकांचे राज्य आहे, ते हिंदूंच्या हत्याराहून श्रेष्ठतर हत्यारांच्या जोरावर व जरबेवर चालले आहे आणि ह्या परदेशी अल्पसंख्याक राज्यकर्त्यात आपसातील यादवीमुळे किंवा ऐषआरोमात्पन्न आलस्यामुळे दौर्बल्य निर्माण झाल्यासही त्यांच्याहून श्रेष्ठतर, निदान त्यांच्या बरोबरीची हत्यारे, जित लोकांनी पैदा केल्याशिवाय, त्यांचा पाडाव होणे अशक्य आहे.