प्रस्तावना

शहाजीच्या ह्या कानडी स्वराज्यात दुसरी एक अशी गोम होती की, आदिलशाहीपासून शहाजीचे स्वराज्य धक्काबुक्की होऊन तुटून विभक्त झालेले नव्हते; म्हटले तर स्वतंत्र, म्हटले तर परतंत्र अशा लिबलिबीत स्थितीत होते. परंतु शहाजीला ज्या परिस्थितीतून रस्ता काढावयाचा होता त्या परिस्थितीतून ह्याहून श्रेष्ठ फळ तत्काळ मिळण्यासारखे नव्हते, आस्ते आस्ते कालांतराने अलगज हातात आपण होऊन पडण्यापैकी होते आणि तो प्रकार पुढे झालाही. परंतु राज्याक्रमणाचे हे दोन्ही प्रकार यद्यपि स्वल्पिष्ट घर्षणाचे असले तत्रापि परिणामी कर्त्याला गौणत्व आणून कधीकधी अडचण उत्पन्न करणारे असतात. दुर्बल राजाची पेशवाई किंवा सरलष्करकी करता करता, त्याला हळूच ढकलून देण्याचा स्वराज्यस्थापकावर कृतघ्नतेचा व स्वामीद्रोहाचा आरोप प्रतिपक्षी आणू शकतात व ते आरोप निमूटपणे ऐकून घ्यावे लागतात. मूळ धन्याचे मांडलिकत्व पत्करिता पत्करिता ते प्रसंगी झुगारून स्वराज्य स्थापण्याचा प्रकारही असाच स्वामीद्रोहाच्या आरोपास पात्र होतो. कर्नाटकातील स्वराज्यस्थापनेतील हे गौणत्व शहाजी जाणून होता. करता, मिंधेपणाचा गंधही ज्या स्थापनेत आढळून येणार नाही, असे स्वराज्य दादाजी कोंडदेव, जिजाबाई व शिवाजी यांच्याद्वारा शहाजीने चौथ्यांदा स्थापिण्याचा उद्योग बंगळुराहून पुणेप्रांती करविला. आदिलशाहीशी व मोंगलाईशी फटकून वागून हा उद्योग मुद्दाम जाणून सवरून करण्यात आला. अशाकरिता की, ह्या उद्योगावर स्वामीद्रोहाचा किंवा कपटकूटाचा आरोप प्रतिपक्षांना आणण्याची बिलकुल सोय राहू नये. पुणे प्रांतातील हे स्वराज्य स्वजनांचे स्वजनांवर असल्यामुळे ते टिकाऊ, भरीव व चिरंजीवी होऊन, मनमोहक व आदरणीय झाले. महाराष्ट्रातील ह्या चौथ्या स्वराज्यस्थापनेचे सर्व श्रेय शिवाजीच्या पदरात पडले हे खरे. परंतु, मूळ कल्पना व योजना शहाजीची असल्यामुळे, शहाजीलाही ह्या श्रेयाचा वाटेकरी करणे इतिहासास प्राप्त आहे. पिंगळे, अत्रे, दादाजी, पानसंबळ, रोझेकर, जेधे, बांदल हे सर्व मुत्सद्दी व सरदार शहाजीचे, जहागीर शहाजीची, तोफा, हत्ती, घोडे वगैरे किल्लोकिल्ली व ठाणोठाणी साठविलेला जंगी सरंजाम शहाजीचा. त्यांच्या जोरावर शिवाजीने आपली इमारत मूळ रचिली. आकाशातून पडला आणि धावायला लागला, अशातला काही प्रकार शिवाजीचा नव्हता. बापाच्या खांद्यावर उभा राहून शिवाजी पहिल्यांदा उच्चासनस्थ झाला. निंबाळकर, मोहिते, जाधव, महाडीक, गायकवाड इत्यादी थोर मराठा कुळांशी शहाजीचा पिढीजात शरीरसंबंध असल्यामुळे, शहाण्णव कुळीतील नामांकित मराठ्यांचे साहाय्य शिवाजीस मिळाले. तात्पर्य, दरबारी मुत्सद्दी, लष्करी सरदार, लढाऊ सामान, शहाण्णव कुळींच्या जेधे आदिकरून मराठ्यांचे साहाय्य व शहाजीच्या नावाचा दरारा व दिमाख, ह्या देणग्या शहाजीकडून शिवाजीस मिळाल्या. शिवाय, अडचणीच्या प्रसंगी वेळोवेळी शहाजीची मदत शिवाजीस पोहोचत असे ती निराळीच. शक १५८३ तील शिवाजीचा आदिलशहाशी तह शहाजीने आपण होऊन घडवून आणिला. ह्या सगळ्याचा मथितार्थ एवढाच की, स्वराज्यस्थापनेचा धागा शहाजीच्या अथपासून इतिपर्यंतच्या सबंध चरित्रात शक १५५१ पासून शक १५८३ पर्यंत अनुस्यूत झालेला आढळतो. पहिला १५५१ तला स्वराज्यस्थापनेचा प्रकट प्रयत्न चार सहा महिन्यात आटोपला. शक १५५५ तील दुसरा प्रछन्न प्रयत्न शहाजहानाने हाणून पाडिला. शक १५७० तील कर्नाटकातील मांडलिकी राज्यस्थापनेचा तिसरा प्रयत्न बराच सफल झाला. परंतु शिवाजीच्या द्वारा सुरू केलेला शक १५६२ तील पुण्याकडील पूर्णपणे स्वतंत्र स्वराज्यस्थापनेचा चौथा प्रयत्न मात्र अंदाजाबाहेर फलद्रूप झाला.