प्रस्तावना

४८. ह्या दोन महापुरुषांच्या भेटीत काहीतरी व्यूह रचिला जात असावा असा संशय औरंगजेबास आला. साठ सत्तर हजार फौजेचा धनी जो कावेबाज शहाजी व बापाहून काकणभर जास्त पटाईत शिवाजी संगनमत करून कोणती घोरपड उभी करतील व कोणती खेंकटी नाचवितील, त्याचा अंदाज आपल्या मनाशी करून, औरंगजेबाने शाहिस्तेखान व जयसिंग यांना शिवाजीवर धाडिले आणि कर्नाटकात बिदनूरच्या नाइकाची उठावणी करून शहाजी दक्षणचा रस्ता जेणेकरून धरील अशी योजना केली. शहाजी कर्नाटकात शक १५८३ च्या फाल्गुनात पोहोचला. नंतर १५८४ च्या चैत्रात तो व अल्लीशहा मिळून बिदनूरवर चाल करून गेले. गदग, लखमेश्वर, सोंधा या बाजूने अल्लीशहा बिदनूरवर उतरला आणि दक्षिणेकडून शहाजीने चाल केली. बिदनूरकराच्या एका प्याद्यास शहाजीचे दहा प्यादे (शिवदिग्विजय २०६) असा विजोड पडल्यामुळे बिदनूरकर दाती तृण धरून दोन अडीच महिन्यात शरण आला. ही स्वारी १५८४ च्या ज्येष्ठ अखेर संपून त्या वर्षाचा व पुढील वर्षाचा असे दोन पावसाळे शहाजीने बंगळुरास काढिले. १५८५ च्या आश्विनात बसवापट्टणाकडील काही पाळेगारांनी बखेडा मांडिला होता, तो मोडण्याकरिता शहाजी त्या प्रांती गेला आणि बंदोबस्त करीत करीत होद्दीगिरे या गावच्या रानात त्याने तळ दिला. तेथे हरणाची शिकार करीत असता घोड्याचा पाय भंडोळीत अडकून घोडा व राजे एकावच्छेदे पडले. त्यात डोक्याच्या कवटीस जखम होऊन, शहाजीराजे शक १५८५ च्या माघ शुद्ध षष्ठीस शनिवारी परलोकास गेले. शिवाजीने सुरत लुटिल्याची खबर त्यांनी नुकतीच ऐकिली होती. दुखण्याबहाण्याने कुजत न पडता, वीराला उचित असा मृत्यू ह्या पुरुषाला आला. कर्तव्य करीत असताना मृत्यू येणे ही ईश्वरी कृपा होय. मरणसमयी शहाजीची उमर सत्तरीला पोहोचली होती. एकोजी जवळ नव्हता, सबब भडाग्नी दिला. डाकेने आल्यावर एकोजीने उत्तरक्रिया केली. तिकडे शिवाजीराजास निधनवार्ता पोहोचल्यावर त्यांनीही प्रीतिश्राद्धादी विधी यथासांग करून लक्षभोजने घातली. होद्दीगिरे येथे राजांचे एक छोटेखानी वृंदावन एकोजीने बांधिले व शिवाजीने एक मोठी डौलदार छत्री शिखरशिंगणापुरास उभारली. शिखरशिंगणापुरास छत्रीची पूजाअर्चा भोसल्यांचे कर्मे तेथे अद्याप करतात. शिखरशिंगणापुरावर भोसल्यांची फार भक्ती असे आणि भक्ती बसण्यासारखेच ते स्थान आहे. तेथून पूर्वेस नगरापासून सोलापुरापर्यंतचा सर्व बालेघाट दिसतो, दक्षिणेस मिरजेपर्यंतचा टापू नेत्रकक्षेत येतो, पश्चिमेस पन्हाळ्यापासून रायरी सिंहगडपर्यंतचा डोंगराळ प्रदेश कनीनिकेवर प्रतिबिंबित होतो आणि उत्तरेस फलटण, बारामती, पारसखेड व जुन्नर ह्या तालुक्यांची मखमल पृथ्वीवर अंथरलेली दृष्टिपथात भरते असे हे महाराष्ट्राच्या मध्यवर्ती ठिकाण राष्ट्राच्या पितरांचे शेवटचे हे तर विश्रांतिस्थान होण्यास सर्वथैव लायक आहे.