प्रस्तावना
प्रथम तुळजापूरच्या भवानीचे दर्शन घेऊन, तीस वर्षांपूर्वी ज्या प्रदेशात त्याचा काही काळ गेला त्या बेदर, आवसे, धारूर, बीड, परंडा वगैरे प्रांतांवर तुळजापूरच्या टेकाडांवरून नजर फेकून, तो पंढरपुरावरून शिखरशिंगणापुरास गेला. शिखर उतरून आपले संबंधी जे फलटणचे निंबाळकर त्यांना दर्शन देऊन, शहाजी शिवाजीच्या राज्यात शिरला. जेजुरीस भेटीचा बेत ठरला. शिवाजीस घटके घटकेची बातमी होतीच. त्याने शक १५७५ त शहाजीकडून शिवराजाच्या दरबारी आलेल्या मोरो त्रिमळ पिंगळे यास पुढे पाठविले व वडिलास अत्यंत समारंभाने वाजतगाजत खंडोबाच्या देवालयात आणून उतरिले. पितापुत्रांच्या भेटीस बारा आणि बारा चोवीस वर्षे होऊन गेलेली, सबब शास्त्रविधीने भेट घेणे प्राप्त झाले. शिवाजीराजे व सौभाग्यादिसंपन्न वज्रचूडेमंडित जिजाऊ आईसाहेब व सईबाई व पुतळाबाई आदिकरून खाशी मंडळी बाल संभाजीराजा सह आधीच मंदिरात जाऊन शहाजी महाराजांची मार्गप्रतीक्षा करीत बसली होती. महाराज येताच राजोपाध्ये यांनी श्रींची पूजा यथासांग करवून, सघृत अशा काशाच्या ताटात स्त्री, पुत्र, स्नुषा व पौत्र यांची मुखे शहाजी महाराजांकरवी एकावच्छेदे करून पहाविली. नंतर भेटी झाल्या. शेकडो लढायात हजारो जिवांचा संहार करण्याने ज्यांची अंत:करणे वज्राहूनही कठोर झालेली, त्या पितापुत्रांची मने मोहाने जिंकली जाऊन मेणाहूनही मऊ होऊन गेली. दोघांनाही एकमेकांच्या गतचरित्राची आठवण होऊन परस्परांविषयी आदरबुद्धी वाटली. नंतर नूतन संपादित राज्यातील राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर, प्रतापगड, विशाळगड, पन्हाळा, रांगणा इत्यादी गड पहात पहात दोन महिन्यांनी पितापुत्र राजधानी जी रायगड तेथे गेले. रायगडास राजधानी करण्याचा सल्ला शिवाजीस शहाजीराजांनीच कर्नाटकातून मोरोपंत पिंगळ्याच्या मुखे सांगून पाठविला होता. ती कुबल जागा तपासून, शहाजी परत पुण्यास आला. तेथील आपण बांधिलेल्या इमारती वगैरे जागांचे अवलोकन करून, तो पुन: जेजुरीस खंडोबाचे दर्शन घेऊन कर्नाटकात जाण्यास सिद्ध झाला. शिवाजीचे किल्ले, कोट, ठाणी, जागा, राजधानी, अठरा कारखाने, शिबंदी, फौज, हत्ती, घोडे, तोफा वगैरे जंगी सामान पाहून राजे परमसंतुष्ट झाले आणि आपली तुळजा नावाची प्रासादक तरवार त्यांनी शिवाजीस बहाल केली. शहाजी एकंदर सहा महिने शिवाजीच्या राज्यात राहून शक १५८३ च्या अखेर कर्नाटक प्रांतात जाण्यास निघाला. शिवाजी व जिजाबाई शहाजीस पोहोचविण्यास वारणेपर्यंत गेली. निरोप देताना शहाजीने शिवाजीची मन:पूर्वक स्तुती केली. आमच्या कुळात जन्म घेऊन तुम्ही बेचाळीस पिढ्या उद्धरिल्या, धर्मस्थापना करून वर्णाश्रम पुनरुज्जीवित केले, यवनाक्रांत पृथ्वीचे क्लेश निवारण करून जगदंबेचा वर आमच्या प्रत्ययास आणून दिला, वगैरे कर्णमधुर शब्द उच्चारून, शहाजीने शिवाजीस शेवटचा आशीर्वाद दिला आणि आदिलशहा, औरंगजेब इत्यादी यवनांशी यापुढे कसे वर्तन ठेवावे त्याची वाटाघाट करून कर्नाटकाचा रस्ता धरिला.