प्रस्तावना
३३. इकडे दौलताबादेस फतेखान आपल्या मताने आपली मजबुती शक १५५३ च्या ज्येष्ठापासून शक १५५४ च्या चैत्रापर्यंत करीत होता. फतेखान हा स्वभावाने मूर्तिजासारखाच अर्धवट, संशयी व महामूर्ख होता. त्याचे आपले मजबुती करण्याचे मार्ग विचित्र होते. दिलजमाईच्या ऐवजी दिलफूट करण्यात त्याचा हातखंडा होता. शहाण्यांची मानखंडना करून व शूरांची मने दुखवून, चतुर साबाजी, शिवाजीपंत व सखाराम मोकाशी यांच्यासारखे कदीम मुत्सद्दी आणि सिद्दी रैहान व याकूतखान यांच्यासारखे लढवय्ये फतेखानाने दूर केले. ह्यापैकी कित्येक केवळ अब्रू बचावण्याकरिता मोंगलांच्या हद्दीत गेले व कित्येकांनी आदिलशहाशी संधान बांधले. मुत्सद्दी व लढवय्ये यांचा काटा काढून टाकिल्यावर फतेखानाला आपण सुरक्षित व निर्भय झालो असे वाटले. परंतु वस्तुस्थिती त्याला वाटत होती त्याहून अगदी निराळी होती. राज्यातून बाहेर गेलेले सर्व लोक त्याचा नाश चिंतीत होते व राज्यात राहिलेल्या लोकांचीही मन:स्थिती तीच होती. कोणावर कशी केव्हा बेतेल या फिकिरीत जो तो होता. हे असे घर निष्कंटक केल्यावर फतेखानाने राज्याबाहेर दृष्टी फेकिली. तो त्याला असे दिसले की, उत्तरेकडून मोंगल व दक्षिणेकडून शहाजी व आदिलशहा एकमेकांना भेटण्याकरिता सज्ज झाले आहेत. मोंगलाने धारूर प्रांतावर बेशिस्त चाल केली म्हणून आदिलशहा क्रूद्ध झाला आणि वकिलाच्या पवित्र देहाला अटक केली म्हणून शहाजहान रागावला. परंतु ही केवळ निमित्तकारणे होती. आपला अंकित जो निजामशहा त्याचा धारूर प्रांत सोडवून त्याला मदत करावी हा शहाजहानाचा हेतू होता व आपला शेजारी जो निजामशहा त्याला मोंगलाने गिळंकृत करू नये म्हणून मोंगलांच्या विरुद्ध त्याला मदत करावी हा आदिलशहाचा हेतु होता. दोघेही निजामशहाला मदत करण्याकरिताच भूतदयेने तडफडत होते. परंतु लढाईची ही समवायि कारणे झाली. मुख्य उपादानकारण निजामशाही कोणी दाबावी हे होते. शहाजहान तर फतेखानाच्या द्वारा निजामशाही अंकित करून बसला होता. त्याच्या मांडीखालून ती सोडवून आपल्या पंजाखाली तिला दाबावी एतदर्थ आदिलशाही मुत्सद्दी खटपट करीत होते व एकाएकी चाल करून जाण्यास कचरत होते. ही कचर ओळखून शहाजीराजाने आदिलशाही मुत्सद्यांना मोंगलांवर चाल करून जाण्यास प्रोत्साहन दिले व दौलताबाद गाठण्याचा सल्ला दिला. नुसता सल्ला दिला इतकेच नव्हे तर आपण स्वत: फौजेसह साह्य करण्याला सिद्ध झाला. शहाजीसारख्या युद्धकुशल सरदाराचा पाठिंबा मिळताच आदिलशाही मुत्सद्यांनी मुरारपंत व रणदुल्लाखान यांची शहाजीबरोबर दौलताबादेकडे रवानगी केली. ब-हाणपुराहून जितकी दौलताबाद लांब तितकीच ती परंड्याहूनही आहे. तेव्हा दोन्ही सैन्यांची टक्कर देवगिरीच्या खडकावर अचूक होण्याचा रंग फतेखानास दिसला. नको होते तेच संकट कपाळी आले. ह्या वेळी कोणता पक्ष धरावा याचा निश्चय संशयग्रस्त फतेखानाला झाला नाही. तो एक वेळ मोहबतखानाकडे मुरारपंत व शहाजी यांच्या कचाटीतून आपणास सोडवा म्हणून दीनवाणी पत्रे धाडी व एक वेळ किल्ल्यातील अन्न संपले म्हणून मुरारपंताकडे धान्याची भिक्षा मागे. दौलताबादेच्या कोटात फतेखान, त्याच्या शेजारी बाहेर मुरारपंत, शहाजी व रणदुल्ला आणि ह्या तिघांच्या पलीकडे मोहबतखान, अशी स्थिती होती. मध्ये मुरारपंत व शहाजी पडल्यामुळे मोहबतखानाकडून फतेखानाला काहीच मदत होईना व मुरारपंत दाण्याचा एक कणही त्याला देईना. मुरारपंताने फतेखानाला अशी अट घातली की, फतेखानाने निमूटपणे किल्ला शहाजीच्या ताब्यात द्यावा व शहाजीला पूर्ववतप्रमाणे स्थानापन्न करावे म्हणजे वाटेल तितके अन्न आपण फतेखानास पोहोचवू. अन्नान्नदशेस पोहोचलेल्या फतेखानास ही मसलत रुचून अटीचा पहिला हप्ता म्हणून त्याने मोहबतखानावर किल्ल्यातून तोफांचा मारा केला. बाहेरून मुरारपंत व शहाजी मोहबतखानावर तोफा डागीतच होते. ह्या मोक्यात मोहबतखान जायाच व्हावयाचा परंतु ह्याच सुमारास आदिलशाही फौजेत फूट उत्पन्न झाली. आदिलशाही अमीर लोकांनी मत्सराने मुरारपंताला साह्य करण्याचे तहकूब केले. त्यामुळे मुरारपंत व शहाजी यास दौलताबादेहून सोळा मैल मागे हटावे लागले. नंतर साहजिकच दौलताबादचा किल्ला मोहबतखानाच्या हाती पडला (शक १५५४ फाल्गुन अखेर). ह्या प्रसंगाचा काळ निरनिराळ्या लेखकांनी निरनिराळा दिला आहे. ग्रांट डफ शक १५५४ चा फाल्गुन देतो; जदुनाथ सरकार आपल्या औरंगजेबाच्या इतिहासाच्या पहिल्या खंडाचा पस्तिसाव्या पानाच्या टीपेत अब्दुल हमीदच्या हवाल्याने शक १५५५ चा आषाढ देतात आणि जेधे शकावलीकार शक १५५४ चा ज्येष्ठ देतो. पैकी, जेधे शकावलीकाराने दिलेला काळ दौलताबादेवरील मोहिमेच्या प्रारंभाचा असून शेवटचा नाही. अब्दुल हमीद याने दिलेला काळ दौलताबाद पडल्याचा नसून, ती पडल्यानंतर हुसेनच्या कबजातीचा काळ आहे, खुद्द दौलताबाद घेतल्याचा काळ नाही. ग्रांट डफने दिलेला काळ - १५५४ फाल्गुन, फेब्रुवारी १६३३ - ग्राह्य व बराबर दिसतो. दौलताबाद शक १५५४ च्या फाल्गुनात घेतल्यानंतर त्या किल्ल्याच्या संरक्षणार्थ खान दौरान याजला ठेवून, आदिलशाही फौजेचा पाठलाग करण्यात मोहबतखानाने दोन महिने घालविले आणि आदिलशाही फौजेला विशेष इजा न करता, १५५५ च्या मृगाच्या सुमारास पावसाळा लागण्यापूर्वी दौलताबादेस पुनरागमन केले. तेथे अब्दुल हमीद लिहितो त्याप्रमाणे १५५५ च्या आषाढात फतेखानाने हुसेन निजामशहाला मोंगलांच्या कब्जात दिले व आपण स्वत: त्यांच्या स्वाधीन झाला. हुसेन निजामशहा व फतेखान यास बरोबर घेऊन मोहबतखान दौलताबादेहून ब-हाणपुरास जाण्यास निघाला. तेव्हा शहाजी व मुरारपंत यांनी त्याला इतके पछाडले की, रोज दोन कोसही मजल त्याच्याने होईना. तेव्हा मोहबतखान याने आदिलशाही फौजेला द्रव्य देऊन आपली व लष्कराची कशीतरी मोकळीक केली व आपली सरहद्द एकदाची गाठली (साने- पत्रे, यादी वगैरे - लेखांक ४३८). ह्या वेळी शहाजीने मोहबतखानाला जी पीडा केली ती टळावी म्हणून मोहबतखानाने महालदारखानास वैजापुरास असलेला शहाजीचा कबिला पकडण्याच्या कामगिरीवर पाठविले, त्या कामगिरीत महालदारखानाने जिजाबाईस शिवाजीसुद्धा पकडिले असे कोणी म्हणतात व फक्त शहाजीच्या मुलीस पकडले असे कोणी म्हणतात. जाधवरावाच्या मध्यस्थीने शहाजीचा कबिला सिंहगडास सुरक्षित पोहोचता जहाला.