प्रस्तावना

२७. शहाजी विमनस्क होऊन आदिलशाहीत जो जातो तो इकडे निजामशाहीत शक १५४७ त त्याच वेळी जहांगीरचा मुलगा खुर्र ऊर्फ शहाजहान आपल्या बापावर बंड करून मलिकंबराच्या आश्रयास आला. भातवडी, नवरसपूर व सोलापूर येथील लढायांमुळे मलिकंबराची इभ्रत सर्व हिंदुस्थानभर इतकी वाढली की दिल्लीपतीच्या कर्तृत्ववान पुत्रालाही निजामशाही आश्रयणीय वाटली. खरा प्रकार शहाजहानला माहीत नव्हता. निजामशाहीची इभ्रत व थोरवी मूर्तिजा किंवा मलिकंबर ह्या खुळ्या व म्हाता-या इसमांवर अवलंबून नसून, ती पराक्रमी शहाजीवर अवलंबून आहे, हे त्यावेळी जगजाहीर झाले नव्हते, आदिलशाहीतील काही थोड्या जाणत्या लोकांच्या मात्र लक्षात येऊन चुकले होते. अशी जरी वस्तुस्थिती होती तत्रापि शहाजहानसारखा अव्वल दर्जाचा शहाजादा आश्रयास आल्याने मलिकंबराचा बोलबाला अतिशय वाढला. जहांगिरावर लढाईत जय मिळविल्याचे श्रेय मलिकंबरास फुकटाफुकट लाभले. दिल्लीचा मोंगल व विजापूरचा आदिलशहा यांचा हा असा पाणउतारा झाल्याने मलिकंबर केवळ वैभवाच्या शिखरावर पोहोचला. ह्या वेळी त्याच्या वैभवात एक मात्र वैगुण्य राहिले. शहाजी भोसला आदिलशहास मिळाला. शहाजीच्या जोरावर तर आदिलशहाचा पाणउतारा मलिकंबराने केला. तत्रापि हे वैगुण्य शहाजहानच्या आगमनाने थोडेबहुत भरून निघेल असा अंबराचा अंदाज होता. शहाजी विजापूरकरास मिळाल्यावर विजापूरच्या दरबाराने त्यास आपल्या पुणे व जुन्नर इकडील जहागिरीत राहून मलिकंबराला शह देण्याच्या कामगिरीवर नेमिले आणि नवरसपूरच्या व भातवडीच्या लढाईतील अपमानाचा सूड उगविण्याची तयारी केली. शक १५४७ च्या पावसाळ्यानंतर आदिलशहाशी तह करून, शहाजी आपल्या सैन्यासह आपल्या जहागिरीच्या जुन्नर प्रांती राहिला व तेथून त्याने निजामशाही दरबारात कारवाई सुरू केली. मूर्तिजा निजामशहा, मलिकंबर व खेळोजी भोसले ह्या तिघातून फुटण्यासारखा माणूस मूर्तिजा आहे, हे शहाजी जाणून होता. भातवडीच्या व नवरसपूरच्या प्रकरणानंतर शहाजीच्या हाती सत्ता जाऊन तो मलिकंबराप्रमाणे किंवा राजूप्रमाणे आपल्यावर कुरघोडी करील, या भीतीने मूर्तिजाने खेळोजीचा फाजील बहुमान करून शहाजीला दुखविले होते, हेही शहाजी जाणून होता. तसेच, शहाजी विमनस्क होऊन राज्यातून निघून गेल्यावर म्हाता-या मलिकंबराच्या कचाटीत आपण बिनसूट सापडलो, हा मूर्तिजाचा अनुभव शहाजीच्या लक्षात होता. सबब, मूर्तिजाला त्रिकुटातून फोडणे सोईचे पडेल, असा शहाजीने कयास केला. मूर्तिजाची आई जी बेगमसाहेब तिची मर्जी अद्याप शहाजीवरून उठली नव्हती. तिचा शब्द मूर्तिजा कुराणाप्रमाणे मानी. इतकेच नव्हे, तर कधी कधी राजपत्रांवर तिची निशाणी मथळ्यावर लिहिवण्यात तो भूषण मानी. ह्या बेगमेला मूर्तिजा व दरबारी लोक मासाहेब म्हणत. मूर्तिजाचे सबंध नाव मूर्तिजा बु-हान शहा. कित्येक लेखक त्याला मूर्तिजा निजामशहा म्हणतात व कित्येक बखरकार व तवारीखकार त्याला बु-हान निजामशहा म्हणतात. याचे एक पत्र पुण्याच्या इतिहास मंडळाच्या १८४० च्या सेंलनवृत्तात पोतदारांनी अशुद्ध छापिले आहे. त्याच्या मथळ्यावर डाव्या बाजूस बु-हान निजामशहा ही अक्षरे आहेत व उजव्या बाजूस मासाहेब ही अक्षरे आहेत. पत्र शक १५३६ तील म्हणजे शक १५४८ च्या बारा वर्षे पूर्वीचे आहे. १५३६ त बु-हान शहा ऊर्फ मूर्तिजाशहा केवळ पोर होता. १५४८ त यद्यपि तो प्रौढ वयास पोहोचला होता तत्रापि त्याची मनोरचना अर्धवटातल्यापैकी स्वभावाने व परिस्थितीने जी एकदा बनली गेली ती मरेपर्यंत तशीच होती. मालोजी व शहाजी यांचा आश्रय करून आवसे, परिंडा, दौलताबाद व नगर इत्यादी स्थळी त्याने आजपर्यंत कालक्रमणा केली होती. फक्त भातवडीच्या लढाईनंतर धूर्ताच्या चिथावणीवरून शहाजीवरील त्याच्या भक्तीत काही काल व्यत्यास आला होता. शहाजी दूर गेल्यावर तो व्यत्यास मावळून, मलिकंबरी जाचाचे उग्र राज्य तेवढे त्याच्या उपभोगाचे विषय झाले व त्या जाचातून मुक्त होण्याची प्रबळ इच्छा त्याच्या मनात उद्भवली. हा असा प्रकार होणार हे परेंगितज्ञ शहाजीराजा जाणून होता. त्याप्रमाणे मासाहेबांकडे सूत्र बांधून, मूर्तिजाचे मन शहाजीने आपल्याकडे पुन: वळवून घेतले व जमल्यास निजामशाहीत परत येण्याचे एक द्वार खुले करून ठेविले.