प्रस्तावना
१९ नाव, आडनाव, कुल, गोत्र, वंश, वर्ण व मातृपितृनामे यांची शहानिशा झाल्यावर, शहाजीच्या कर्तबगारीच्या रुपरेषेची आखणी करण्यास लेखणी मोकळी होते. ही आखणी (१) बृहदीश्वराच्या देवालयातील शिलालेख, (२) शिवदिग्विजय, (३) शिवाजीप्रताप, (४) बसातिने सलातीन व (५) सानेप्रकाशित शहाजी महाराजांची कैफियत, ह्या सहा ग्रंथांवरून व इतर काही टिपणांवरून व पत्रांवरून करतो. जो जो म्हणून प्रसंग शहाजीच्या चरित्राला उपकारक भासला त्या त्या प्रसंगाचा निर्देश जमल्यास शकवार, न जमल्यास मोघम केला जाईल. वर दिलेल्या पाच साधनातील शहाजी महाराजांची कैफियत हे प्रकरण बव्हंशाने बसातिने सलातीनाचा संक्षेप असल्यामुळे स्वतंत्र साधन म्हणून त्यास यद्यपि फारशी किंमत नाही, तत्रापि शहाजी संबंधाने त्यात इतरत्र न आढळणारी माहिती दिली आहे. बसातिने सलातीन या फारशी ग्रंथाचा कर्ता शहाजीचे नाव कर्नाटकातील मोहिमांसंबंधाने तुरळक काढून तेही प्रामुख्याने न काढिता मुसलमान सेनापतींच्या अनुषंगाने मदतनीस म्हणून गौणत्वाने काढतो. परंतु मध्येच शहाजी फार शिरजोर झाला अशी तो तक्रार करतो. त्यावरून अनुमान करता येते की ह्या कर्नाटकातील मोहिमात शहाजीचे अंग प्रमुख होते. शहाजीच्या वरचढ कर्तृत्वाचे दिग्दर्शन शिवदिग्विजय व शिवप्रताप या मराठी बखरींवरून बरेच उठावदार घडते, परंतु ह्या दिग्दर्शनात व्यंग असे आहे की, शहाजीच्या चरित्रातील प्रसंग विजयकार किंवा प्रतापकार कालानुक्रमाने, शिस्तवार व कसोशीने न देता मागचे पुढे व पुढचे मागे असे धरसोडीने देतात आणि तेही देण्यात इतिहासलेखनकर्मानभिज्ञता स्थलोस्थली प्रकट करतात. बृहदीश्वरशिलालेखही ह्याच बखरीच्या वर्गात पडतो. हा शिलालेख मूलत: बखरच आहे, इतकेच की, ह्याला दगडावर कोरिला जाण्याचा मान मिळाला आहे. ह्या तिन्ही आधुनिक बखरीत परंपरागत कर्णोपकर्णी ऐकलेली व कागदपत्रांवरून काढिलेली जी माहिती दिली आहे तिला प्रत्यंतर पुरावा दुस-या कोणत्याही मराठी बाह्य ग्रंथाचा नाही. परंतु लढाया वगैरे संबंधाने जी माहिती धरसोडीने दिली आहे तिला बसातिने सलातीनातील व इतर मुसलमानी तवारिखातील पुराव्याचा पडताळा देऊन पारखिता येते. साधनांची ऐतिहासिक किंमत ही अशी आहे. त्यातून विश्वसनीय भाग निवडून काढून तो कालानुक्रमाने शिस्तवार मांडण्याचा उद्योग येथे करावयाचा आहे. पुढे कालांतराने समकालीन कागदपत्रांचा अस्सल पुरावा जेव्हा बाहेर येईल तेव्हा प्रस्तुतच्या मांडणीत फेरबदल, वाढ किंवा छाट करणे सहजच भाग पडेल.
बाबाजी ऊर्फ बाबजी भोसले संभाजी भोसल्याचा मुलगा शक १४५५ त जन्मला. हिंगणी, बेरडी, देऊळगाव येथील पाटिलक्या कोण्या पुरुषाने मिळविल्या ते नमूद नाही. बरडजी, धापजी, संभाजी व बाबजी ही नावे मराठी दिसतात, रजपुती नाहीत. मुलाचा जन्मशक टिपणात मांडून ठेवण्याइतकी ऐपत संभाजीला आली होती; इतकेच या शकावरून अनुमान होते. बाबजी बहुश: पावसाळ्यात पाटिलकी व बाकीच्या ऋतूत शिपाईगिरी करून असावा.