Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ४३६ ]

श्री शके १७०४ माघ वद्य ५

श्रीमंत राजश्री पंत प्रधान स्वामीचे सेवेसीः--

पोष्य माधवराव अनंत वेदांती कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील वर्तमान ता। माघ वद्य ५ पर्यंत यथास्थित जाणोन स्वानंदवैभवपत्रीं लेखनाज्ञा करीत असलें पाहिजे. विशेष. प्राचीन हिंदुधर्माचा लोप होऊन अपसव्याचें प्राबल्य जाहलें. त्यांणीं सर्व धर्मभ्रष्ट करून स्वधर्माचरणीं जनास लावून वेदवेदांग प्रवृत्तीपासून परावृत्त होण्यामुळे ब्राह्मण्याचा लोप, स्वधर्माचार राहिला. यास्तव, भगवंतजीस संकट पडून तदाश्रयीं हिंदुराजे कित्येक होते जाले. त्यासही हितोपदेशकर्ते लोक निर्माण जाले. त्यांणीं नाना प्रकारें सांगून घर्मवांछा घरविली. परंतु जनाची प्रवृत्ति लावणें जाहलें नाहीं. जैपुरवाले याणी अश्वमेध केला. कोण्ही कांहीं कोण्ही कांहीं, अशा प्रकारें चालले. ते श्रीचे मनास न आले. त्यावरून स्वतां अवतीर्ण जाल्याखेरीज दुर्मताचा नाश होणार नाहीं जाणून बाबाजी भोंसले यांचे वंशीं मालोजी विठोजी राजे जाले. त्याचे वंशीं साक्षात् भगवान विश्वेश्वर स्वयंमेव आपण शिवशिवाजी राजे अवतीर्ण होऊन, तुरुकाचा निःपात करून, हिंदुपति सिंहासनस्थ गागाभटप्रसादें जाहाले. त्यांणीं एक ग्रंथ ब्राह्मणांनी ह्मटला ह्मणजे मणभर धान्य व पांच रुपये रोख द्यावे. याप्रमाणें उत्तरोत्तर विशेषात्कारें दक्षणा व धान्य देऊन विप्रकुलाचें संरक्षण केलें, धर्मवृद्धि पावविली. त्याअन्वयें दाभाडे सेनापति यांणीं पुण्यक्षेत्राचे ठायीं श्रावणमासी धर्मदक्षणा देऊन दिवसेदिवस लौकिक संपादिला. त्याचा पराभव करून श्रीमंती वास्तव्य केल्यापासून सर्व गुणाचे, ग्राहीक होऊन, दिगंतकीर्ति मेळवून, आसमुद्रांत ध्वजारोपण केलें. धर्म कलाकुशलता वीर्य शौर्य गीतनृत्यादि नाना प्रकारचे तर्क साधून स्वामिसेवा करून कुलोद्धारकता आपलाले वंशीं सर्वजनांनी अवर्णनीय स्तुतिप्रद केल्यांनी राज्याम्यंतरी सर्वांस मान्य असेच पुरुष होऊन प्रपंची इहपर उत्कृष्ट जाले. त्यास, वडिलोपार्जित वागण्याच्या चाली कशा, त्यांणीं राज्य संपादिलें कसें, ह्मणाल, तरी:- कोणत्याही कर्मास प्रवृत्त होऊं नये. जालें असतां, त्यांत हानी होवो किंवा कांहीं घडो, परंतु ती मसलत शेवटास जाई तोंपर्यंत पिच्छा सोडूं नये. अशीं कर्मे कोणती केली ह्मणाल तरीः-- पो। वसई घेण्याविशीं श्रीमंत थोरले चिमणाजी बलाळ आपासाहेब यांणीं साहास केला तो काय लिहूं ? तत्रापि ऐशीं हजार मनुष्यें लहान थोर सरकारकामीं आलीं. ऐसी जघन्य कीर्ति वागती. ती वसई घेऊन फिरंगियास गोंवें एक ठाणें ठेवून, संपूर्ण राज्यांतून काढून दिलें. तैसेंच, सदाशिव चिमणाजी भाऊसाहेब पेशवे यांणीं दिल्लीपतीस स्पर्धा करून दिल्ली घेऊन, आपण सिंहासनस्थ होऊन, पुढें गिलच्यावरी जाऊन, मोठे जवांमर्दिनी लढाई दिली. त्या युद्धांत लक्ष्यावधी मनुष्यें गारत जालीं.

वरकड जीवजंतूंची संख्या कोणी धरली ? परंतु पराभव जाल्यामुळें, हिंदुधर्माचा लोप व्हावा असा प्रसंग प्राप्त जाला असतां, बाळाजी बल्लाळ नानासाहेब पेशवे यांणीं अभिमान धरून सरकारकामीं आले. त्यांचे घरीं लघु लघु लेकरें राहिली ! ती गौरवें सत्कारयुक्त आणोन त्यांची मर्यादा ठेवून, अपरतारतम्य चित्तवित्तानिशीं अंतःकरण पुरवून वाढविली. हिंदुस्थानांत राणोजी शिंदे व महादजी शिंदे यांस पाठवोन, विदुरापासून सुयोधनाचा मानभंग जाला, तद्वत् उभयतां शिंदे यांणीं दिल्लीपतीसहित पादाक्रांत सर्व राजे लहान थोर करून पुण्यास राजधानी इंद्रभुवनवत् केली ! ऐसे अभिमानी पुरुष ! त्यांचे वंशी आपण कीर्तिमान् आहात. त्यास, मागील इतिहासाचें कारण नसतां किंचित् लिहिणें बालबोधार्थ लागलें. आताः- केलें तेंचि करावें. त्याकरितां मरोनि उरावें. उरले त्यांणीं मोडलें तेंच घडावें ; हा धर्म मुख्यत्वें राजाचा. त्या राजांनी स्वहित साधून परलोकीं योग्य व्हावें. त्या योग्यतेस श्री हरिस्मरण अहर्निशीं असावे. दुसरे:- राजकारण करावें. तिसरें:-सावधान राहावें. चौथैः- साक्षेपी असावें. तो साक्षेप कोणता ह्मणाल तरि :- नाना युक्तिप्रयुक्ती बोलणें ; वादवेवाद जिंतणें ; समयीं समर्पक उत्तर देणें ; कलाकुशलता, हावभाव, नटनाट्य, कौतुक, गीत, नृत्य, वीर्य, शौर्य, विवेक, शुचिष्मतता, लिहिणें, बेरीजतेरीज, शब्दशब्दांग, देशपरत्वें भाषा, विनोद, साहित्य जाणावें. बोलोन करून दाखवावें. ऐसेप्रकारें साक्षेपी राहावें. व सेवकजनापासून लहानथोर अपराध जाला तरि, स्वामीनींच क्षमा केला पाहिजे; कारण, पदरची सर्व मनुष्यें जाणती असली तरि मुर्खत्व नाहीसें होईल; त्यास, मुळींच तो अज्ञान; त्यास नानाप्रकारें श्रम करून सज्ञानता आणली; तो कामाचें धोरण न जाणून चुकला; तेव्हां ज्या मनुष्यास या योग्यतेस सहस्रावधि द्रव्य खर्च केलें, तेव्हां ते मनुष्यसे जाले. ते मनुष्य तोडून आपलेकीरतां प्राण देणारे. त्याजला अपराध सोडला नाहीं तरिः-- लक्षावधि मनुष्यांत सूज्ञ उत्पन्न होणार. तें मनुष्य दैववश प्राप्त जालें तरि, इतबारी वागणार क्वचित् !!! तेव्हां पृथ्वीपति जो त्यांणीं सर्वांचा संग्रह केला पाहिजे. त्यांणी त्याग केला तरि त्या मनुष्याचा निर्वाह कसा होईल आणि चाकरीचे सूज्ञ मनुष्ये कोठून मिळणार ? याकरितां परंपरेचे कुलाशिलाचे मनुष्य अज्ञान असले तरि स्वामिसेवा जीवादारम्य करील. सज्ञानी मनुष्य नाना प्रकारें आपला मतलब साधून सर्वस्वाचा पराचा नाश जाला तरि करील. याची प्रचिति हल्ली सर्व राज्याराज्यांतरी वागती. तिचा विस्तार कशास ? सारांश, राजांनी आधी अंतः करण जाणावें, ही कला त्यास असली पाहिजे. जो पराचें अंतःकरण जाणील तोच राजा, राज्याधिकारास योग्य. असा जो राजा त्यांणीं न्यायनीतीनें वर्तावे. आपपर तेथें मनांत न आणावें. वास्तविक असेल तेंच करावें. अन्यथामार्गी लोकवार्तेवरी न जावें. समक्ष पाहिल्यावाचून न राहावें. अथवा निश्चयात्मकें शोधून पाहावें. मग जें सांगणे तें सांगावें. ज्या राज्यांत नीति बुडाली तें राज्य भ्रष्ट जालें, ऐसें जाणावें. परंतु काळ वेळ पाहावा. समय वोळखून चालावें. अधीरपणें नसावें. दुर्मदासी दूर ठेवावें. अपरिचितासी ओळखावें. दुरूनच बोलावें. उपाधीपासोन दूर असावें, उपाधीत न सांपडावें. लीनत्व पहिलेच घ्यावे. मूर्खत्व सोडून द्यावें. दोष अवगुणातें झांकावे. दुर्जन दंडून सोडावे. दरिद्रियावरि उपकार करावे. अमित भाषण बोलावें. कोणतेहि तर्हेतर्हेसि न जावें. कार्य करणें तेंचि करावें—अकार्यी मन न घालावें. होईल तेंचि करावें. न होण्याचे तें करण्याचा अभिमान धरूं नये. धरिल्या होय, ऐसें साधन पाहावें. साधनी फार न झटावें. दीर्घ प्रयत्न जाल्यास करावें. केलें कर्म न सोडावें. दुसरेयाचें अभीष्ट जाणावें. बहुत यत्नें करावें. न होय तरी नम्र असावें. दुःख कोणासहि न द्यावें. अपार पाठांतर करावें. सदासर्वदां तत्पर ईश्वरचरणारविंदवत् स्वामिसेवेंत राहावें. शांती मनीं ठेवून वर्तावें. सत्क्रियेनी चालावें. रानदंड उगाच न करावा. अपराधियास दंडोनी सोडावें. लोक पारखोनी सोडावे. पुन्हा मेळवून घ्यावे. ऐशा नानाप्रकारच्या युक्ती बैसोन कोण्ही बोलती; परंतु, प्रसंग नाना माघाड घेती ; ऐसे पुरुषीं न चालावें. सदासर्वदां स्वामिसेवा एकनिष्ठेनें करून कार्यकरितां श्रम करावे. श्रम करून कार्य करून घ्यावें. श्रम करितात त्यांस श्री अभयपूर्वक येश देतो, हा निश्चय मनीं सदृढ घरूनी चालावें. इहलोकीं भलेपणा मेळवून घेतला तर परलोकी मुक्तीस गेला; हें निश्चयत्वें मनीं धरून वर्तत जावें. यांत श्रेयस्कर सर्वोपरी जाणावें. * बहुत काय लिहिणें ? लोभ करीत जावा. हे विनंति.