Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
२२. ब्रह्मेंद्रस्वामीच्या हयातींत मराठ्यांच्या राजकारणाचें अंतः स्वरूप व बहिःस्वरूप हें असें दोन प्रकारचें होतें. आतां ब्रह्मेंद्रस्वामी मराठ्यांच्या राजकारणाचा मुख्य सूत्रधार होता हा जर ग्रह खरा धरला तर सरंजामी सरदारीची पद्धत व साम्राज्य-वर्धनाचा उपक्रम ह्यांच्या मूळाशीं ब्रह्मेंद्र असला पाहिजे. परंतु ह्या दोन पद्धती बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीत अंमलात येत असतांना, ब्रह्मेंद्र कोंकणांत व कोंकणच्या आसपास परशराम येथील देवालय बांधण्याकरितां भिक्षा मागत हिंडत होता. साम्राज्य पसरविण्याचा उपक्रम शाहूच्या राज्यारोहणाच्या अगोदर अवरंगजेब जिवंत असतानाच होत चालला होता हें वर दाखवून दिलें आहे. तसेंच सरंजामी सरदारीची पद्धत शाहूला स्वपक्षपुष्टीकरणार्थ स्वीकारावी लागली, ह्याचेंहि स्पष्टीकरण वर केलें आहे. तेव्हां ह्या वेळच्या मराठ्यांच्या राजकारणाचीं हीं मुख्य रूपें घडविण्यांत स्वामीचें अंग बिलकुल नव्हतें हें उघड आहे.
२३. सरंजामी सरदारीची पद्धति व साम्राज्याची स्थापना ह्यांच्या मुळाशीं यद्यपि ब्रह्मेंद्रस्वामी नसला, तत्रापि ह्या दोन्ही संस्था वर्धमान स्थितींत असतांना त्यांच्यावर स्वामींच्या प्रतिभेचे ठसे उमटले जाण्याचा संभव आहे असें कोणाचें म्हणणें पडेल. परंतु बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीत मराठ्यांच्या राजकारणात ब्रह्मेंद्राचा म्हणण्यासारखा प्रवेश झालेला दिसत नाहीं. कां कीं, १७२७ च्या पूर्वी स्वामीचा पत्रव्यवहार मुदलांतच फारसा नव्हता किंवा कदाचित् असलाच तर तो प्रस्तुत कालीं आपल्याला अनुपलब्धीमुळें नसल्यासारखाच आहे. त्यामुळे १७२७ च्या पूर्वीचा स्वामीच्या मुत्सद्दीपणाचा माग लावण्यास कांहींच साधन उरलें नाहीं. १७२७ त स्वामी धावडशीस कायमचा रहावयास आल्यानंतरचा जो पत्रव्यवहार उपलब्ध झाला आहे त्यावरून मात्र, स्वामीच्या प्रतिभेचा ठसा मराठ्यांच्या राजकारणावर कितपत उमटला आहे, तें समजण्यास उत्तम सोय झाली आहे. ह्या पत्रव्यवहारावरून मराठ्यांच्या राजकीय चरित्राच्या प्राणभूत अशा ज्या सरंजामी सरदारी व साम्राज्यस्थापना-दोन संस्था त्या वर्धमान होत असतां त्यांत स्वामीनें काहीं फेरबदल करण्याची मसलत दिली होती असें ओढून ताणून म्हणण्यालाहि यत्किंचित् पुरावा सांपडत नाहीं. गुजराथ, खानदेश, व-हाड, माळवा, विजापूर ह्या प्रदेशांत मराठ्यांच्या ज्या खटपटी १७२० पासून १७४० पर्यंत बाजीरावाच्या कारकीर्दीत झाल्या, त्याशीं ब्रह्मेंद्राच्या मसलतीचा कांही संबंध होता असें म्हणण्यास एका अक्षराचाहि आधार मिळणे मुष्कील आहे. १७४० पासून १७४५ पर्यंत बाळाजी बाजीरावानें हिंदुस्थानांत व इतरत्र ज्या खटपटी केल्या त्यांच्यांशीं तर स्वामीचा काडीचा संबंध नव्हता. कां कीं, बाजीरावाच्या कारकीर्दीत स्वामीला जो मान मिळत असे तो बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीत मिळत नव्हता.