Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[२०८]                                                                       श्री.                                                                   ३ सप्टेंबर १७४२.                                      

राजश्री कोनेर राम मजमदार गोसावी यांसी :-
128अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ रघोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत गेलें पाहिजे. विशेष. तुह्माकडून बहुत दिवस वर्तमान कळत नाहीं. राजश्री बाबूराव यांणीं मनुष्य आह्माकडे पाठविले ते प्रविष्ट जाहलें. आह्मी पत्र पाठविलें व कितेक कार्यभाग सांगितले, त्यांचा विचार कोणेप्रकारचा हें कांहीच कळों येत नाहीं. तरी सविस्तर लेहून पाठविणें. वरकड इकडील वृत्त तुह्मास वरचेवर पत्री लिहून पाठविलें आहे. राजश्री भास्करपंताकडोन मागाहून दुसरी पत्रें आली ती बजिनस तुह्माकडे जासुदासमागमें रवाना केली आहेत. त्यावरून सविस्तर अर्थ कळो येईल. सारांश गोष्ट, आह्मास फौजेसहवर्तमान मशारनिलेकडे जाणें जरूर. येविशीचा अर्थ साद्यंत पेशजी तुह्मास लिहिला आहे. व नेणुकप्रमाणें ऐवज लोकांचे पदरी घालून सत्वर आह्माकडे रवाना करावें ह्मणोन दोन चार पत्रीं लिहिलें आहे. त्याप्रमाणें जो विचार करणें तो तुह्मीं केलाच असेल. परंतु तुह्माकडोन पत्र येऊन वर्तमान कळो येत नाहीं, यास्तव वारंवार लिहिणे जरूर होतें. दुसरी गोष्ट, दिवसहि कांही बाकी राहिले नाहीत आणि आह्मास तो सत्वर जाऊन पोहोचले पाहिजे, यास्तव तुह्मी लोकांस पत्रें पाठवून नालबंदीचा ऐवज पदरी घालून दुसरेयाकारणे आह्माकडे रवाना करणें. वरकड, येथून रवानगीचा विचार तुह्मावर आहे, जे गोष्टीने दिवस गत न लागे तो अर्थ करणें. प्रस्तुत राजश्री सुलतानजी राव पालकर यांजकडून राजश्री निंबाजी यमाजी वीर व विठ्ठल मैराळ येथें आले होते. त्यांचे बोलीचालीचा प्रसंग ठीक करून एक लक्ष रुपये नालबंदी देविली आहे आणि राजश्री बाबूराव रघुनाथ यांसमागमें देऊन तुह्माकडे पाठविले आहेत. तरी, नालबंदीची व कापडाची अलाहिदा याद पाठविली असे त्याप्रमाणें सत्वर ऐवज यांसी देऊन रवाना करणें. तैसेंच राजश्री भिवजी वीर यांसीहि एक लक्ष नालबंदी देविली आहे. तरी आर्धी या उभयतांचे पदरी ऐवज पडलियानें, ही फौज सनिधची आहे, यांचा प्रमाणिकतेचा विचार आहे, दसरेयाकारणें सर्वांचे अगोदर आह्माजवळ येऊन पोंहचतील. याजकरितां सदर्हू ऐवज आधीं देऊन यांची रवानगी करणें. व राजश्री मानाजी पवार वगैरे पथकें यांसीहि पत्रावर पत्रें पाठवून, ऐवज प्रविष्ट करून, आह्माकडे रवाना करणें. वरकड, कितेक वर्तमान राजश्री बाबूराव रघुनाथ यासी सांगितले आहे. हे मुखोत्तरे सविस्तर तुह्मास सांगतील, त्याजवरून कळून येईल. जाणिजे. छ १४ हे रजब + देखतपत्र ऐवज यांचे पदरी घालून यांची रवानगी सत्वर करणें. ज्या ऐवजास बट्टा धरणेंपारणें पडे नेमणुकेप्रमाणें देऊन यांची रवानगी सत्वर करणें. आमचे कुच दसऱ्यास हितून आहे. नाजूक काम जानून बाबूराव रघुनाथ यास पाठविलें आहे. तर देखतपत्र यांची लिहिल्याप्रमाणें रवानगी करणें. अन् वाडा बेगी तयार करणें. कितेक वर्तमान बाबूराव सांगतां कळू येईल. कळले पाहिजे. बहुत काय लिहिणें. लोभ असू देणें. हे विनंति.
                                                                                                                                                                                          मोर्तबसूद