Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री. 

लेखांक २२९.


१७०१ श्रावण वद्य १२.

राजमान्य राजश्री सदासिव धोंडदेव यासि:-
रघुनाथ बाजीराव नमस्कार. सु॥ समानीन मया व अलफ तुम्ही विनंति पत्रें दोन पाठविलीं तीं प्रविष्ट जाहालीं.

बाळाजी विश्वनाथ यांची मोजदाद जिनसाची दिली होती, ते माघारे घेतली. त्यांणीं नेमणुकेशिवाय पाउणशें रुपये खर्च केला आहे. त्याचा ते फडशा हजुर करणार ह्मणोन लिहिलेंते कळलें. त्यास, तुह्मींहि तगादा न करणें. बाळाजी विश्वनाथ हजुर आल्यावर समजोन फडशा करोन घेतला जाईल. कलम १. व्यंकटराव पिलाजीचा व रतनजी पारसी याचा मजकूर लिहिला तो कळला. पुढें त्याजकडे पत्रें पाठवावयाचीं असेत. परंतु कोणी ममतेचा जाऊं लागेल त्याजबराबर पाठऊं. सबब जहाजाच्या शोधांत हमेषा राहावें. येकादो माणसांस नेहमीं तेंच काम पाहिजे. बारभाईंनीं वकील कलकत्यास रवाना केल्याचा वगैरे बातमीचा मजकूर लिहिला. तो कळला.

पकी बातमी लिहिली येईल तितकीच लिहित जाणें. बाजारी बातमी न लिहिणें. त्यांतहि जरूर असल्यास लिहिणें. परंतु ही बाजारी बातमी, असें लिहीत जाणें. कलम १.

तावदानाचा मजकूर लिहिलांत, कीं पहिल्या बेताची मिळत नाहीं. त्यास, थोडीसी जाजती असली तरी कार्यास येईल. त्याच मेजाची कसी मिळतील ?

जाजतीच मेजाची घेऊन पाठवणें.

कल्याणापैकीं कांहीं जिनस विकावयाचा होता तो आतां खासा स्वारी सुर्तेस आली. सबब फरोक्त करीत नाहीं ह्मणोन लि॥. त्यास कल्याणपैकीं आरसे आहेत त्यांपैकीं ज्यांची कलई उडाली असेल व पालखीस लागू होत असें असतील ते पालखीकरितां हजूर पाठविणें.

ह्मणजे दुसरे पाहिजेत तितकेच खरिदी करणें. बाकी ज्या आरशास कलई असेल ते विकणें व दुसराहि कल्याणपैकीं जिंनस असेल तो फरोख्त करणें. ज्यांत किफायत नजरेस येईल तेंच तुह्मी करणें. तुमची नजरही बरी आहे.

मिर्जा तेथें आहेत. त्यास तुह्मीं त्याजकडे सहजांत जाऊन त्यास पुसणें कीं, श्रीमंत सुर्तेस आले आहेत त्यास तुमचे चित्तांत जावयाचें आहे किंवा नाहीं. हा त्याचा भाव काढून हजुर लेहून पाठवणें. सरकारतर्फेनें हा त्यासी जाबसाल न बोलणें. तुह्मीं होऊन आपले तर्फेनें सहजांत त्यासी बोलोन, त्याचा शोध घेऊन लिहिणें. त्यासी आपले तर्फेनेंच बोलणें. कलम १

येकूण कलमें साहा लि॥ आहेत. त्या प्रें॥ करणें. जाणिजे. छ २५ साबान आज्ञाप्रमाण.

(लेखनावधि:)

पै॥ छ १४ रमजान, सन
समानीन, भाद्रपद व॥ २.