Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
विवेचन अकरावें.
पानिपतची मोहीम १५ मार्च १७६० ला सुरूं झाली व १४ जानेवारी १७६१ ला संपली. ह्या दहा महिन्यांचा सविस्तर वृत्तांत मीं छापिलेल्या पत्रांखेरीज इतरत्र कोठें सांपडण्यासारखा नाहीं. (१) पानिपतच्या बखरींत नुसत्या पानिपतच्या लढाईचा कमजास्त विश्वसनीय असा वृत्तांत दिला आहे. (२) भाऊसाहेबाच्या कैफियतींत सदशिवराव आंबेपडदुराहून निघाल्यापासून पानिपतची लढाई होईतोंपर्यंत त्रोटक वृत्तांत आहे. (३) भाऊसाहेबाच्या बखरींत १७५४ पासून १७६१ जानेवारीपर्यंत हकीकत आहे. त्यांत ९० पासून १३२ पृष्ठांपर्यंतचा मजकूर पानिपतच्या मोहिमेसंबंधीं व खुद्द लढाईसंबंधीं आहे. (४) काशीराजाच्या बखरींत सुजाउद्दौल्याकडील पानिपतच्या मोहिमेचें वर्णन आहे. (५) मराठ्यांच्या पराक्रमकारानें छापिलेल्या पानिपतच्या अपूर्ण बखरींत पानिपतच्या लढाईचा बनावट वृत्तांत आहे. ह्या पांच बखरी पानिपतच्या लढाईसंबंधीं आजपर्यंत प्रसिद्ध झाल्या आहेत. पैकीं पराक्रमकारांची बखर बनावट असल्यामुळें (टीप २९० पहा) तिचा विचार करण्याचें येथें कारण नाहीं. बाकीच्या ४ बखरींपैकीं काशीराजाच्या बखरीवरून, आजपर्यंत जे स्वदेशी व विदेशी इतिहासकार झाले त्यांनीं, पानिपतच्या लढाईचें वर्णन केलें आहे. ग्रांट् डफ् चा देखील मुख्य आधार काशीराजाचीच बखर आहे. रा. नातू ह्यांनीं मात्र कोठें इतर बखरींचा उपयोग केला आहे. परंतु त्यांचा देखील कल इंग्रजइतिहासकारांच्या मताला मान देऊन, काशीराजाच्याच वृत्तांताकडे वळण्याचा दिसतो. तेव्हां काशीराजाच्या बखरीची ग्राह्याग्राह्मता ठरविणें अत्यंत जरूर आहे. काशीराजाच्या बखरींतील खालील गोष्टी इतिहासाला धरून नाहींत असें ह्या ग्रंथांतील पत्रांवरून कळून येण्यासारिखें आहे. (१) बाळाजी बाजीराव ख्यालीखुशालींत मग्न असे. १७३८ पासून १७६१ पर्यंत वर्षांतून आठ नऊ महिने बाळाजी पुण्याच्या बाहेर असे हें मीं मागें दाखवून दिले आहे. (२) सदाशिवरावाला रामचंद्र मल्हाराची लहानपणापासून शिक्षा होती म्हणून काशीराज म्हणतो; परंतु, सदाशिवरावाची व रामचंद्र मल्हाराची गांठ १७५० त पडली. त्यापूर्वी भाऊला बाळाजीची शिक्षा होती. (३) रघुनाथरावाच्या लाहोरच्या स्वारींत जनकोजी शिंदे होता म्हणून काशीराज लिहितो; तेंहि निराधार आहे. (४) उदगीरची लढाई काशीराजाला माहीत नव्हती असे दिसतें. (५) भाऊ उद्दाम झाला म्हणून काशीराजाचें म्हणणें आहे; परंतु, ह्या ग्रंथांत भाऊचीं गोविंदपंताला गेलेलीं पत्रें किती सौम्यपणानें लिहिलेलीं आहेत हें पाहिलें म्हणजे उद्दामपणाचा आरोप भाऊवर आणणें मुष्कील होतें. (६) दत्ताजी शिंदे नजीबखानाशीं युद्ध करीत असतां रणांत पडला व त्यावेळीं अबदली दूर अंतर्वेदीत होता अशी काशीराजाची माहिती आहे; परंतु, ती ह्या ग्रंथातील लेखांक १६५ वगैरेवरून निराधार आहे हें कळून येईलं.