प्रस्तावना

२३ नोव्हेंबरी व ७ डिसेंबरीं झालेल्या युद्धाच्या अनुभवावरून पुढेंहि युद्ध झाल्यास पराजय येईल असें भाऊस वाटत नव्हतें असें ह्या पत्रांतील धीराच्या व आश्वासनाच्या गोष्टीवरून अनुमान काढण्यास जागा आहे. शत्रूचीं फळी फोडून दिल्लीकडे निघून जाण्याचा भाऊनें प्रयत्न केला नाहीं त्याचें तरी हेंच कारण असावें. धीराच्या व आश्वासनाच्या मोठमोठ्या गोष्टी भाऊ बोलत असतां ज्याअर्थी त्याचा १४ जानेवारी १७६१ ला पराभव झाला त्याअर्थी त्याचें वर्तन धीराचें व शांतपणाचें नसून उद्दामपणाचें व सान्निपातिक होतें असा कोणी कोणी तर्क काढितात. परंतु हा तर्क अवास्तव आहे. शांतपणाबद्दल भाऊची पूर्वीपासून ख्याती होती. सबंद १७६० सालभर गोविंदपंताचें वर्तन किती राग आणण्याजोगे होतें हे आतांपर्यंत दाखवून दिलें आहे. परंतु गोविंदपंताला लिहितांना भाऊच्या हातून एकहि वावगा शब्द पडलेला सापडावयाचा नाहीं. शिंदेहोळकरांच्याहि मजींच्या बाहेर भाऊ कधीं गेला नाहीं. त्यांनी सांगितल्या रस्त्यानेंच तो आग्रयाकडे गेला. सुरजमल जाटाचें व भाऊचें वाकडे आलें होतें हें खरें आहे; परंतु तें देखील भाऊनें बाहेर कोणाला दिसूं दिलें नाहीं. सारांश भाऊच्या हातून उद्दामपणाचें वर्तन होणें केवळ अशक्य होतें.

२३ डिसेंबरपर्यंत, कदाचित ४ जानेवारी १७६१ पर्यंत, भाऊच्या हालचालींचा व डावपेचाचा वृत्तांत दिला आहे. आतां भाऊचा प्रतिस्पर्धी जो अबदाली त्यानें डावपेच काय केले त्यांचाहि निर्देश केला पाहिजे. १७६० च्या मेंत अबदाली अनुपशहरीं जाऊन बसला. तेव्हांपासून २५ अक्टोबरपर्यंत जो अंतर्वेदींत अनुपशहर व शिकंदरा ह्या दोन ठाण्यांना सोडून कोठें गेला नाहीं. सुजाउद्दौला वगैरे साथीदार मिळवून आणण्याचें काम नजीबखानानें केलें. आगष्ट सप्टेंबरांत अबदालीची तर फारच हलाखी झाली होती. त्याच्या गोटांत सर्वत्र फुटाफूट होत चालली होती. सदाशिवरावाला अक्टोबरांत गोविंदपंतानें जर यथास्थित मनापासून मदत केली असती तर अबदाली अगदी ठार बुडाला असता. अबदालीने आपण होऊन अमुक एक डावपेंच केला व तो सदाशिवरावाला भोंवला असें कदाचितच उदाहरण सांपडेल. गोविंदपंताचा आळशीपणा व कुचराई अबदालीच्या कामास आली. दिली व पानिपत ह्यांच्यामध्यें अबदाली सांपडला असतां त्याला कोंडून टाकण्याचें व घाबरवून सोडण्याचें सर्वस्वीं गोविंदपंताच्या हातांत होतें. ते गोविंदपंतानें करावयाचें टाकल्यापासून अबदालीचा फायदा अतोनात झाला. अबदालीने अमूक एक डाव योजिला व त्यामुळें सदाशिवराव फसला असा प्रकार मुळींच झाला नाहीं. मराठ्यांच्या लष्करांत दुही झाली ती अबदालीच्या पथ्यावर पडली. ह्या दुहीचा अबदालीनें चांगला फायदा करून घेतला. मराठे आपल्यापेक्षां जोरदार आहेत हें अबदाली जाणून होंता. तेव्हां मराठे उपासमारीनें अर्धेमले होऊन जात तोंपर्यंत त्यांच्याशी युद्ध करावयाचें नाही हा जो फेबियन डावपेंच तो अबदालीनें चांगला उपयोजिला ह्यांत संशय नाहीं. १४ जानेवारी १७६१ च्या युद्धांत अबदालीनें कोणते पेच केले ते अस्सल पुराव्याच्या अभवामुळें निर्देशितां येत नाहींत परंतु ती लढाई होईतोंपर्यंत अबदालीने आपण होऊन अमूक एक योजना केली असेहि पण सांगतां येणें शक्य नाही. शत्रूच्या युक्तीपेक्षां मराठे गोविंदपंताच्या व मल्हाररावाच्या कुचराईमुळें ही मोहीम हरले हा सिद्धांत मात्र सर्वत्र मान्य व्हावा असा दिसतो.