प्रस्तावना
विवेचन दुसरें.
पंधराव्या व सोळाव्या शतकांत आणि सतराव्या शतकाच्या पूर्वार्धांत महाराष्ट्रांची स्थिति फारच विपन्न झाली होती. त्या वेळचें वर्णन करितांना समर्थ म्हणतातः- "तीर्थक्षेत्रें मोडिलीं। ब्राह्मणस्थानें भ्रष्ट झालीं । सकळ पृथ्वी आंदोळलीं । धर्म गेला । यवनानीं हिंदु धर्माचा उच्छेद करून टाकिला तेव्हां "देव, धर्म, गो, ब्राह्मण ह्यांचे संरक्षण करण्यास" शिवाजी राजे अवतीर्ण झाले व त्यांनीं यवनांच्या सर्वोच्छेदक गतीचा प्रतिरोध केला. ह्या महत्कृत्याला अनुलक्षून समर्थ शिवाजीराजास लिहितात कीं, "तुम्हीं झाला म्हणून महाराष्ट्र धर्म कांहीं तरी राहिला;" व पुढें सप्रेम विनवणी करितात कीं, "आपण धर्मस्थापनेची कीर्ति उत्तरोत्तर अशीच सांभाळली पाहिजे." धर्मस्थापनेची कीर्ति संभाळण्यास काय करावें म्हणाल तर "अमर्याद फितवेखोर लोकांचा संहार करावा; न्यायसीमा उल्लंघूं नये; नेटके बंद बांधावे; तुरंग, शस्त्र आणि स्वार जमवावे" आणि सर्वांत पहिलें काम काय करावें तर "मराठा तितका मेळवावा; आणि जिकडे तिकडे महाराष्ट्रधर्म वाढवावा" आपला महाराष्ट्रधर्म वाढविण्यास आणखी उपाय कोणते तर "बहुत लोक मेळवावे । एक विचारें भरावें । कष्टें करून घसरावें । म्लेंच्छावरी॥" आणि इतकें करून झाल्यावर मग, "आहे तितकें जतन करावें । पुढें आणीक मेळवावें । महाराष्ट्र राज्य करावें । जिकडे तिकडे॥" समर्थांच्या ह्या उक्तींवरून कळून येईल कीं, सतराव्या शतकाच्या पूर्वार्धांत महाराष्ट्रांतील विचारी पुरुषांचीं मनें एका जबर कल्पनेनें भारून गेलेलीं होतीं. ती कल्पना कोणती तर महाराष्ट्रधर्माचीं स्थापना करणें ही. ही कल्पना सफल करण्याचें अवघड काम शिवाजीनें केलें. शिवाजीच्या एकंदर चरित्राची गुरुकिल्ली हीच कल्पना होय. ही कल्पना ध्यानांत ठेवून मग शिवाजीच्या व त्याच्या अनुयायांच्या कृत्यांचा विचार करावा म्हणजे त्या कालीं महाराष्ट्रांत व कर्नाटकांत जिकडे तिकडे मराठे निष्कारण धांवतांना परकीय इतिहासकारांना जे दिसतात ते मनांत कांहीं विशिष्ट हेतु धरून शिस्तवार मोहिमा करीत आहेत असें भासूं लागतील. शिवाजीला चोर व त्याच्या अनुयायांना गनीम म्हणून यवनांनीं टोपणनांवें दिलीं. त्यांचा वाच्यार्थ घेण्याची जी परकीय इतिहासकारांना खोड लागली आहे ती ते टाकून देतील व देव, धर्म आणि स्वराज्य ह्यांची स्थापना करणा-या पृथ्वीवरील महापुरुषांच्या मालिकेंत ह्या पुण्यश्लोक व परमप्रतापी पुरुषाला आडेवेढ न घेतां गोवूं लागतील. आतां हा महाराष्ट्रधर्म म्हणजे काय? ख्रिस्तीधर्म, महमुदीधर्म, यहुदीधर्म, ह्यांच्यासारिखाच हा महाराष्ट्रधर्म आहे कीं काय? तर तो तसा नाहीं. महाराष्ट्रधर्म म्हणजे हिंदुधर्मच कीं नाही? तर महाराष्ट्रधर्म म्हणजे हिंदुधर्महि केवळ नव्हे. महाराष्ट्रधर्माची व्याख्या हिंदुधर्माहूनहि जास्त व्यापक आहे. महाराष्ट्रांत त्या काळीं चालणारा हिंदुधर्म व भरतखंडांतील इतर प्रांतांत चालणारा हिंदुधर्म ह्यांच्यांत महदंतर होतें.