प्रस्तावना
ग्रांट् डफ् नें अजीबात सोडून दिलेल्या मोहिमांचा येथवर विचार झाला. आतां ज्या मोहिमांचीं उल्लेख व वर्णनें त्यानें केलीं आहेत त्यासंबंधीं माझें म्हणणें काय आहे तें सागतों. १७५० पासून १७६१ पर्यंत ज्या मोहिमांची माहिती ग्रांट् डफ् नें दिली आहे त्या सर्वांत पानिपतच्या मोहिमेचें वर्णन त्याच्या त्या वेळच्या माहितीप्रमाणें त्यानें बरेंच विस्तृत दिले आहे. त्याच्याहिपेक्षां कीननें पानिपतचें वर्णन बरेंच सांगोपांग दिलें आहे. परंतु, ह्या दोन्ही ग्रंथकारांनीं काशीराजावरती सर्वस्वी भिस्त ठेवल्यामुळें त्यांचीं वर्णनें एकदेशीय व अपूर्ती झालीं आहेत. तीं अपूर्ती व एकदेशीय कशी झालीं आहेत ह्याचे विवेचन मीं पुढें केलें आहे. तेव्हां सध्यां ह्या मोहिमेला सोडून दुस-या मोहिमांकडे वळतों. उदगीरच्या मोहिमेचें व युद्धाचें वर्णन डफ् ने त्याच्या नित्याच्या नेमाप्रमाणें त्रोटक परंतु बरें केलें आहे. पानिपतच्या लढाई खेरीजकरून १७५० पासून १७६१ पर्यंत झालेल्या बाकी कोणत्याहि लढाईची तारीख देण्याच्या भानगडींत ग्रांट् डफ् पडला नाहीं; त्याप्रमाणें ह्याहि लढाईची तारीख त्यानें दिली नाहीं. ग्रांट् डफ् च्या वर्णनाशीं मी छापिलेलीं पत्रं ताडून पाहिलीं असतां वाचकांना कांहीं तफावत व बरीच नवीन माहिती दिसून येईल. शिंदखेडच्या मोहिमेसंबंधीं ह्या ग्रंथांत सरासरी ७० पत्रें छापिलीं आहेत. त्यांत लढाई होण्याच्या अगोदर झालेल्या कारस्थानाची बारीक हकीकत आहे. त्या हकीकतीशीं ग्रांट् डफ् ची हकीकत ताडून पाहिली असतां कांहीं तफावत व बरीच नवीन माहिती दिसून येईल. ग्रांट् डफ् नें ह्या मोहिमेची प्रस्तावना बरी केली आहे; परंतु, खुद्द लढाईचें वर्णन मुळींच दिलेलें नाहीं. पानिपत, उदगीर व शिंदखेड ह्मा तीन मोहिमांखेरीज नामसंकीर्तनापलीकडे ग्रांट् डफ् नें कोणत्याच मोहिमेचें वर्णन केलें नाहीं. अमक्या वर्षी अमुक मोहिम झाली व तींत अमुक अमुक व्यक्तींचा प्रमुखपणें संबंध येतो ह्या व्यतिरिक्त त्याच्या ग्रंथांत जास्त कांहींएक सांपडावयाचें नाहीं. हा असा प्रकार होणें एका प्रकारें अपरिहार्यच होतें. १७५० पासून १७६० पर्यंत ठळक ठळक अशा बेचाळीस मोहिमा झाल्या हें वरतीं सांगितलेंच आहे. ह्या प्रत्येकीचें यथास्थित वर्णन देऊं म्हटल्यास ग्रांट् डफ् च्या बखरीएवढी बखरहि पुरणार नाहीं. ह्याचा दाखला पाहिजे असल्यास ग्रांट् डफ् नें केलेलें पाणिपतच्या लढाईचें वर्णन घ्या. ग्रांट् डफ् च्या इतिहासाचा सबंध २१ वा भाग म्हणजे ग्रांट् डफ् च्या मुंबईच्या आवृत्तीचीं १५ पृष्ठें ह्या मोहिमेनें व्यापून गेलीं आहेत. लहानमोठ्या मोहिमांची सरासरी काढून दर मोहिमेस १० पृष्ठें धरिलीं तर ४२ मोहिमांस ४२० पृष्ठें लागतात. तेव्हां १७५० पासून १७६१ पर्यंतच्या मराठ्यांच्या हालचालींचा वृत्तांत मुंबई-आवृत्तीच्या ५० पृष्ठांत आणावयाला ब-याच मोहिमा न कळत गळाल्या असतांहि राहिलेल्या मोहिमांची त्रोटकच हकीकत देणें ग्रांट् डफ् ला भाग पडलें. तशांत, मराठ्यांच्या हालचाली एकाच विवक्षित प्रदेशांत होत नसून, एकाच काली, स्वदेश, कोंकणकिनारा, गुजराथ, खानदेश, त्या वेळचें निजामाचें राज्य, म्हैसूर, रजपुताना, दिल्ली, अंतरवेद, नागपूर, अयोध्या, काशी, प्रयाग, बुंदेलखंड इत्यादि निरनिराळ्या प्रांतांत होत असत. त्यामुळें दृष्टि फांकून जाऊन, दरवर्षीं एकाच मोसमांत होणा-या निरनिराळ्या मोहिमांचें व्यवस्थित आकलन होऊन वर्णन करितां येण्याचें काम केव्हांहि मोठ्या श्रमाचें व कुशलतेचें होण्याचा संभव आहे. तशांत त्याच्या हातून, मिळालेल्या कागदपत्रांचा व्हावा तसा उपयोग झाला नाहीं. ह्या व इतर कारणांनीं ग्रांट् डफ् च्या हातून जशी इमारत मराठ्यांच्या इतिहासाची मराठ्यांच्या दृष्टीने उठावी तशी उठली नाहीं. हाला मुख्य कारण ग्रांट् डफ् ने स्वीकारलेली पद्धत किंवा खरें म्हटलें असतां पद्धतीचा अभाव होय. अर्थांत १७५० पासून १७६१ पर्यंत बाळाजी बाजीरावानें जो अवाढव्य खटाटोप केला त्याचें ग्रांट् डफ् च्या संक्षित पद्धतीनें यथास्थित वर्णन होणें अगदींच अशक्य होतें. ह्या ग्रांट् डफ् च्या संक्षिप्त पद्धतीचें स्वरूप पुढील विवेचनांत स्पष्ट करून दाखवितों.